राज्याच्या कला, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात सक्रीय असलेल्या वास्को येथील सौ. मंदाताई नारायण बांदेकर यांचे काल पहाटे अल्प आजाराने वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. सुप्रसिद्ध उद्योगपती नारायण तथा नाना बांदेकर यांच्या त्या पत्नी होत.सौ. बांदेकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मडगाव येथील खाजगी इस्पितळात उपचार सुरू होते. काल पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी विविध क्षेत्रातील लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बांदेकर यांच्या निवासस्थानी सौ. मंदाताई यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, साबांखा मंत्री सुदिन ढवळीकर, वीजमंत्री मिलिंद नाईक, मंत्री दीपक ढवळीकर, दयानंद मांद्रेकर, सभापती राजेंद्र आर्लेकर, उपसभापती अनंत शेट, मंत्री मिकी पाशेको तसेच आमदार विष्णू वाघ, राजन नाईक, नरेश सावळ, गणेश गावकर, माविन गुदिन्हो, लवू मामलेदार, दिगंबर कामत, खासदार शांताराम नाईक, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्यासह उद्योगपती श्रीनिवास धेंपो, शिवानंद साळगावकर, अशोक चौगुले यांनी अंत्यदर्शन घेतले. तसेच स्थानिक नगरसेवक, राज्यातील विविध संस्थांच्या पदाधिकार्यांनीही त्यांचे अंत्यदर्शन घेतले.