यावेळी त्यांनी सेंड्रीया, तिची आई, आजी, दोन भाऊ व एक मामेभाऊ यांना शयनगृहात बांधून घातले. प्रकरण काल उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास केला मात्र कोणाला अटक होऊ शकली नाही.
सविस्तर वृत्तानुसार दोन शस्त्रधारी तरुण घुसले. एक पुढच्या दरवाजाने तर एक मागच्या दरवाजाने आत आला. त्यांच्या हातात पिस्तुल व चाकू होता. आत घुसताच सेंड्रियाला पिस्तुलाचा धाक दाखवून अंगावरील दागिने काढून घेतले. नंतर त्यांनी घरातील इतर माणसांना धमकी दिली की, बाहेर आणखी तिघे जण असून आरडा ओरडा केल्यास सगळ्यांना ठार केले जाईल.
त्यानंतर सेंड्रीय, तिची आजी अँसेलिका (८७), आई रोझी पेरैरा (५७), भाऊ रुवेल्ट (२९), जोसेन (२१) तसेच मामेभाऊ अँथनी या सहा जणांना पिस्तुलाची भीती दाखवून तसेच चाकू गळ्याकडे ठेऊन शयनकक्षात नेले व दोरखंडाने हातपाय बांधले. त्यानंतर दुसर्या खोलीतील कपाटामधून रोख २५ हजार तसेच बांगड्या, कर्णफुले, अंगठ्या मिळून तीन लाख रुपयांचा ऐवज काढला व पळून गेले. जाताना त्यांना दूरध्वनीच्या ताराही तोडून टाकल्या.
घरात शिरलेले तरूण २० ते २५ वयोगटातील होते व कोकणी बोलत होते असे तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी जीन्स पँट व टी–शर्ट परिधान केले होते. दरम्यान, घरच्या मंडळींना दोरखंडाने बांधून ओढत नेल्यामुळे त्यांच्या अंगावर जखमा झाल्या आहेत. चोर पळून गेल्यानंतर काल सकाळपर्यंत सर्वजण बांधलेल्या अवस्थेतच होते. काल सकाळी कशीबशी त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली व कुंकळ्ळी पोलीस स्थानकावर संपर्क साधला. त्यानंतर पोलीस अधीक्षक अरविंद गावस, उपअधीक्षक उमेश गावकर, मायणा कुडतरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक सिद्धांत शिरोडकर पोलीस पथकासमवेत घटनास्थळी दाखल झाले. पणजीहून श्वानपथक मागविण्यात आले होते मात्र काही उपयोग झाला नाही. दिवसभर तपास चालू होता.