गोवा राज्य सहकारी बँकेने उद्या २ जानेवारीपासून पणजी व डिचोली येथील बँकेच्या शाखांमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.३१ मार्च २०१५ पर्यंत शहरातील २५ शाखांमध्ये एटीएम सेवा सुरू होईल. तर पुढील सहा महिन्यांच्या काळात राज्यातील सर्व शाखांमध्ये व अन्य जागांवर एटीएम सेवा केंद्रे उघडण्यात येणार असल्याची माहिती फळदेसाई यांनी दिली. या बँकेच्या एकूण ५८ शाखा असून आणखी दहा शाखा उघडण्यास आरबीआयने मान्यता दिली आहे.
केंद्र सरकारने राबविलेल्या किसान के्रडिट कार्ड योजनेखाली ग्रामीण भागातील शेतकर्यांना फायदा व्हावा म्हणून त्यांनाही एटीएम कार्डे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वरील योजनेखाली प्रत्येक शेतकर्याना ३ लाख रुपयेपर्यंत कर्ज दिले जाते. त्याना पैसे काढण्यासाठी बँकामध्ये यावे लागते ती गैरसोय दूर करण्यासाठी त्याना कार्डे देण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
पंचायत पातळीवर मिनी एटीएम केंद्र
दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली मिळणारे आर्थिक सहाय्य तसेच वीज व पाण्याची बिले भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत पातळीवर मिनी एटीएम केंद्रे उघडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
३१ डिसेंबर २०१५ पर्यंत बँकेने १५०० कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्याची माहितीही त्यानी दिली.
गोवा राज्य सहकारी बँकेच्या दमण आणि दीव येथे असलेल्या शाखा बँकेपासून वगळण्याची प्रक्रिया चालू असून आरबीआय अधिकार्यांच्या उपस्थितीत जानेवारी महिन्यात यासंबंधी बैठक होणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.