विद्यार्थ्यांना टॅबलेटस् वितरीत करण्याची सायबरएज योजना तात्पुरती स्थगित ठेवली असली तरी आता बारावीत पोहोचलेल्या सर्व विद्यार्थ्यांना जानेवारीपर्यंत लॅपटॉप वितरीत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली. यासाठी ३६ कोटी रुपये खर्च होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट्स देण्यात आल्या असल्या तरी त्याचा योग्य पध्दतीने कसा वापर केला जावा, याचे शिक्षकांना ज्ञान नव्हते. त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण देईपर्यंत सदर योजना स्थगित ठेवल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. सध्या बारावीत १८ हजार विद्यार्थी असून त्यांना इन्फॉटेकतर्फे लॅपटॉप दिले जातील, त्यासाठी ३६ कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या स्थगित ठेवलेल्या ‘टॅबलेट’ योजनेसाठी सहावी व नववी इयत्तेतील मिळून सुमारे ४९ हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरले होते.