राज्यात पर्यटकांचे प्रचंड लोंढे

0
87
जुने गोवे येथे काल उसळलेली पर्यटकांची प्रचंड गर्दी. तर दुसरीकडे रात्री उशिरा राज्यात दाखल होणार्‍या पर्यटकांच्या गाड्या. (छाया : किशोर नाईक)

अवशेष दर्शनास विक्रमी उपस्थिती : वाहतूक कोंडी कायम
नववर्ष १५ साजरे करण्यासाठी देशविदेशातील पर्यटकांचे लोंढे गोव्यात दाखल होत असून सनबर्न, सुपरसॉनिक या संगीत महोत्सवाबरोबर जुने गोवे येथील गोंयच्या सायबाच्या अवशेष दर्शनाचा लाभ हजारोंच्या संख्येने अजूनही भाविक घेत आहेत.गेले दोन दिवस देश-विदेशातील पर्यटकांचा ओघ गोव्याच्या दिशेने चालूच होता. काल यात प्रचंड भर पडल्याचे चित्र दिसून आले. सुपरसॉनिक तसेच सनबर्न या संगीत महोत्सवाला प्रचंड गर्दी होती. तीन दिवस चाललेला या महोत्सवाचा जल्लोष मोठ्या संख्येतील रसिकांनी अनुभवला. कालही दिवसभरात व रात्री राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड गर्दी दिसून येत होती. प्रमुख शहरात पार्किंग व्यवस्थेवर ताण आल्याचे दिसत होते. समुद्र किनार्‍यावरही पर्यटकांची गर्दी लक्षणीय होती.
सध्या गोव्यात गोंयच्या सायबाचे अवशेष दर्शन चालू आहे. यामुळे जुने गोवे येथील से कॅथेड्रलमधील सायबाच्या दर्शनासाठी काल उपस्थित राहिलेल्या भाविकांनी नवा उच्चांक प्रस्तापित केला. काल अंदाजे दोन लाख भाविकांनी दिवसभरात सायबाच्या अवशेषांचे दर्शन घेतले. यंदाच्या फेस्तालाही एवढी प्रचंड गर्दी नव्हती. शिवाय ८५ टक्के भाविक गोव्याबाहेरील होते. यात कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली तसेच विदेशी पर्यटक व भाविकांचा समावेश होता. नववर्ष सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असल्याने राज्यात प्रमुख शहरांबरोबर खेड्या पाड्यातही नववर्ष पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रवेश फी आकारली जात आहे. रंगमंच सजावट, विद्युत रोषणाई, आसन व्यवस्था, वाद्यवृंद तसेच गायक कलाकार यासाठी आवश्यक ती योजना वेळीच करण्यात आयोजक समिती गुंतली आहे. चर्चमध्येही नववर्षाच्या पूर्वसंध्येला प्रार्थना सभा तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. यात स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग असेल. चर्चच्या धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम सादर होणार आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला उपस्थित राहण्यासाठी पर्यटकांनी आताच गर्दी केली असून राज्यातील पंचतारांकित हॉटेल, स्टार हॉटेल्समधील बुकिंग हाऊसफुल्ल असल्याची माहिती उपलब्ध आहे. खाद्य पदार्थ, शीतपेये व विदेशी दारू किंमती या काळात वाढण्याची शक्यता असल्याचेही बोलतात. एकंदरीत पुढील दोन दिवसात गोव्यात पर्यटकांची गर्दी वाढत जाणार असून राष्ट्रीय महामार्गावरून जीव हातात घेऊन प्रवास करावा लागेल. आतापासूनच गोवा तसेच महाराष्ट्र पोलीस पथके ठिकठिकाणी कार्यरत असल्याचे दिसून येते.