उध्दव ठाकरे यांचा सवाल
अमेरिकेने ओसामा बिन लादेनला संपविण्याबाबत जी धाडसी कारवाई केली तसे धाडस भारत सरकार दाऊद इब्राहिम व हाफीज सईद यांच्याबाबत दाखवेल काय असा सवाल शिवसेनाध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केला आहे. असे धाडस जर भारताला शक्य नसेल तर दाऊद व हाफीज यांच्या नावाने बोटे मोडून काहीच उपयोग नाही अशी खोचक टिप्पणीही ठाकरे यांनी केली आहे. दाऊदचे फोनवरील संभाषण उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी दै. सामनामध्ये अग्रलेखातून सरकारवर शरसंधान केले आहे. दाऊद व हाफीज हे पाकिस्तानात तेथील राज्यकर्त्यांच्या पाठिंब्यावरच वावरत असून त्यासाठी पुरावे गोळा करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दाऊदच्या फोन टेपमध्ये नवीन काहीच नसून हा खेळ चालूच राहील अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.