प्रदेश कॉंग्रेस स्थापन करणार ‘ग्लोबल गोवन सेल’

0
78

विदेशात नोकरी व्यवसाय करणार्‍या गोमंतकीयांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेस बरेच योगदान दिलेले आहे. त्याचा विचार करून प्रदेश कॉंग्रेसने ‘ग्लोबल गोवन सेल’ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुइझिन फालेरो यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. सुमारे अडीच लाख गोमंतकीय आखाती देशात आहेत. तर जगभरात मिळून त्यांची संख्या सुमारे ५ लाख इतकी आहे. त्यांचे नातेवाईक राज्याच्या ग्रामीण भागात वास्तव्य करून आहेत. त्यांच्यासाठी सरकारने वेगवेगळ्या सुविधा, योजना उपलब्ध करून देण्याची गरज आहे. अनिवासी भारतीयांच्या पर्यायाने मूळ गोमंतकीयांच्या मुलांना येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी संधी प्राप्त करून देणे, वेगवेगळ्या व्यवसायासाठी या विदेशस्त गोमंतकीयांचा उपयोग करून घेणे, सरकारच्या योजनांचा लाभ देण्यासाठी जागृती करणे एनआरआय ग्लोबल गोवन चेंबर स्थापन करणे, या हेतूनेच वरील विभाग स्थापन करण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे फालेरो यांनी सांगितले.