आसाममध्ये बोडो बंडखोरांनी आदिवासींवर ठिकठिकाणी चढवलेल्या हल्ल्यातील बळींची संख्या ६८ वर गेली असून राज्यात अतिदक्षतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सोनितपूर येेथे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी केलेल्या गोळीबारात तिघे आदिवासी ठार झाले, तर चिरांग येथे आदिवासींनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात तीन बोडो गावकरी मारले गेले. कोक्राझार आणि सोनितपूरमध्ये संचारबंदी जारी करण्यात आली आहे.केंद्र सरकारने केंद्रीय निमलष्करी दलांच्या पन्नास तुकड्या आसामकडे रवाना केल्या असून गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सदर हिंसाचार हे दहशतवादी कृत्य असल्याचे म्हटले आहे. भारत आणि भूतानची सीमा बंद करण्यात आली आहे.
आसाममधील या हिंसाचाराच्या निषेधार्थ कोक्राझारमध्ये शेकडो चहा मळे कामगारांनी निदर्शने केली व मुख्यमंत्री तरूण गोगोई यांच्या प्रतिमा जाळल्या. काही आंदोलकांनी दुकाने पेटवून दिली, तर काही ठिकाणी रेलमार्ग रोखण्यात आले.
मंगळवारी रात्री सोनितपूर व कोक्राझार जिल्ह्यांमध्ये चार ठिकाणी बोडो हल्लेखोरांनी हे सशस्त्र हल्ले चढवले. सरकारच्या शांतीप्रस्तावास विरोध करणार्या एनडीएफबी (सोंगबिजित) गटाने हे हल्ले चढवल्याचा कयास आहे.