महापालिकेच्या कामगारांना बडतर्फ केल्याने नेत्यांसमोर पेच

0
101

संपावर गेलेल्या पणजी महानगरपालिकेच्या ३३३ कामगारांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतल्याने कामगार संघटनेचे नेते ऍड. अजित सिंह राणे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. ऍड. राणे यांना कोणत्याही परिस्थितीत प्रोत्साहन न देण्याच्या या निर्णयामुळे कामगार वर्गात फूट पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.सध्या महानगरपालिकेचे आयुक्त संजित रॉड्रिग्ज यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी केल्यास कामावर रुजू होण्याची तयारी कामगारांनी दर्शविली आहे. असे असले तरी त्यांची ही मागणी पूर्ण केल्यास वाईट पायंडा पडेल, असे महापालिकेचे म्हणणे आहे. या परिस्थितीवर प्रतिक्रीया विचारण्यासाठी ऍड. राणे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.
कदंब चालकांची नियुक्ती बेकायदा
कदंब ड्रायव्हर व अन्य कर्मचारी संघटनेने कदंबच्या व्यवस्थापकीय संचालकाना एक पत्र लिहून पणजी महापालिका कामगारांचा संप चालू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे कचरावाहू ट्रक चालवण्यासाठी कदंबच्या चालकांची जी नियुक्ती केली आहे, ती योग्य नसून ती बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे.
महापालिका कर्मचार्‍यांचा संप चालू असताना त्यांच्या जागी आमच्या चालकांची नियुक्ती करणे हे योग्य नसून त्यांना परत बोलावून घ्यावे, अशी विनंती वरील संघटनेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी एक पत्राद्वारे व्यवस्थापकीय संचालकांना केली आहे.
या पत्राची पत्र मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, कदंबचे चेअरमन जे. एल. कार्लुस आल्मेदा व मुख्य सचिव यांना पाठवण्यात आली आहे. महापालिकेचे ट्रक चालवणार्‍या कदंब चालकांना मारहाण झाली अथवा कुणी त्यांना जखमी केले तर त्याची जबाबदारी कदंब महामंडळावर राहील असेही या पत्रातून नमूद करण्यात आले आहे.