भारत बलशाली बनविण्याचे ध्येय : संरक्षणमंत्री

0
129
शारदा इंग्लिश हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष समारोहानिमित्त हायस्कूलला सहकार्य करणार्‍या व्यक्तिंचा सत्कार करताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर. सोबत मान्यवर. (छाया : नरसिंह प्रभू)

१९६१ साली भारतीय सैनिकांनी गोमंतकाला पोर्तुगीज जोखडातून मुक्त केले त्याची परतफेड करण्यासाठी संरक्षणमंत्र्यांच्या रुपाने गोमंतकाला संधी प्राप्त झाली आहे. हा बहुमान दोन्ही खासदारांना ‘कॅबिनेट’ मंत्री म्हणून मिळाला असून देशाला एक दिशेने नेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ध्येय साध्य करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. जगातील राष्ट्रामध्ये भारताला सर्वश्रेष्ठ मान मिळावा यासाठी आपले कार्य सुरू असून देशाच्या संरक्षण यंत्रणेला दिशा देण्याचे प्रयत्न चालू आहेत, असे प्रतिपादन देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी माशेल येथे केले.माशेल येथील शारदा मंदिर संचालित शारदा इंग्लिश हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या समारोप समारंभात खास अतिथी या नात्याने संरक्षणमंत्री पर्रीकर बोलत होते. येथील देवकीकृष्ण मैदानात खास उभारलेल्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री लक्ष्मिकांत पार्सेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने स्थानिक आमदार तथा कारखाने बाष्पक मंत्री दीपक ढवळीकर, सन्माननीय पाहुणे म्हणून स्थानिक सरपंच संकेत आमोणकर सुवर्ण महोत्सवी समिती अध्यक्ष श्यामाकांत खोलकर, शारदा मंदिर संस्थेचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र करंडे, पदाधिकारी सिध्दार्थ पलंग, उपाध्यक्ष प्रभाकर सातोस्कर, खजिनदार महेश आमोणकर, शारदा इंग्लिश हायस्कुलचे व्यवस्थापकीय समिती अध्यक्ष विनायक सातोस्कर, व्यवस्थापक मिलिंद तिंबले, मुख्याध्यापिका अरुणा आफोंसो, पालक शिक्षक संघ अध्यक्ष नोनू नाईक, पदाधिकारी वीरेंद्र हळर्णकर, प्रेमकांत फडते गांवकर, माजी विद्यार्थी संघटनाध्यक्ष बेनी फर्नांडिस व स्थानिक पंचसदस्य फ्रांसीस लोबो आदी मान्यवर उपस्थित होते.
सुवर्ण महोत्सवी वर्ष समारोहाच्या निमित्ताने संरक्षणमंत्री पर्रिकर व मुख्यमंत्री पार्सेकर यांचा अनुक्रमे प्रभाकर सातोस्कर व डॉ. रामचंद्र करंडे यांच्या हस्ते तर स्थानिक आमदार तथा मंत्री दीपक ढवळीकर यांचा श्यामकांत खोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री मा. पार्सेकर यांनी हायस्कूलने गेल्या ५० वर्षांत नामवंत दिग्गज देशाला दिले. मागील काळाचे अवलोकन करून भविष्य काळात आपल्या स्वत:च्या पायावर उभी राहणारी आत्मनिर्भर स्थिती निर्माण करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करुन त्या दृष्टीने शिक्षणाची सोय करावी असे आवाहन केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते येथील देवस्थान समिती पदाधिकारी, माजी शिक्षक कर्मचारी, तसेच सहकार्य दिलेल्या व्यक्तिंचा सत्कार करण्यात आला. स्थानिक आमदार तथा मंत्री श्री. ढवळीकर यांनी कदंब बसस्थानक, गंवडाळी खांडोळा पूल पूर्णत्वास येत असून खांडोळा येथील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीसाठी लवकरच पायाभरणी होणार असल्याचे सांगितले. हायस्कुलच्या गानवृंदाने सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. श्यामकांत खोलकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. गोविंद भगत यांनी पाहुण्यांचा परिचय, मुख्याध्यापिका अरुणा आफोंसो यानी वार्षिक अहवाल सादर केला. गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन तर मिलिंद तिंबले यांनी आभार व्यक्त केले.