डॉक्टरांच्या ५० जागांसाठी केवळ १५ उमेदवार

0
93

एका बाजूने सरकारी नोकर्‍या मिळवण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडत असताना आरोग्य खात्यात मात्र डॉक्टरांची ५० पदे भरायची असताना खात्याला केवळ १५च उमेदवार मिळू शकल्याचे आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.डॉक्टरांच्या ५० पदांसाठी खात्याने जाहिरात दिलेली असताना केवळ १५ उमेदवारच मुलाखतीसाठी आले. या सर्वांना सरकारी डॉक्टर म्हणून नोकरी तर मिळेलच शिवाय उर्वरित ३५ पदे रिक्त असून ती कशी भरावित असा प्रश्‍न निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
राज्यातील विविध आरोग्य केेद्रांत डॉक्टरांची पदे भरायची असून त्यासाठी खात्याला ५० डॉक्टरांची गरज आहे. विशेष करून ग्रामीण आरोग्य केंद्रात डॉक्टरांची पदे रिक्त असून त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी पदे भरण्याचा खात्याने निर्णय घेतलेला आहे. मात्र, गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतलेले विद्यार्थी एक तर पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात किंवा जास्त पैसे कमवता यावेत यासाठी विदेशात तरी जातात. त्यामुळे गोव्यातील सरकारी इस्पितळे व प्राथमिक आरोग्य केंद्रें येथे काम करण्यासाठी डॉक्टर्स मिळत नसल्याचे डिसोझा म्हणाले. या पार्श्वभूमीवर आरोग्य खाते आता सरकारी दरम्यान गोमेकॉत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बनल्यानंतर सक्तीने काही वर्षे सरकारसाठी सेवा द्यावी लागेल अशी अट घालून त्यांच्याकडून तशा प्रकारच्या बॉण्डवर सही घेण्याबाबत आपण विचार करीत असल्याचेही डिसोझा यांनी यावेळी स्पष्ट केले.