पणजी मतदारसंघ पोटनिवडणूक
पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांना पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसची उमेदवारी देण्यास पक्षातील महत्वाच्या नेत्यांनी हरकत घेतल्याने उमेदवारी कुणाला द्यावी या प्रश्नावर पक्षात संभ्रम निर्माण झाला आहे. पक्षाची चिंतन बैठक होण्यापूर्वी वरील उमेदवारीसाठी फुर्तादो यांच्या नावाला बराच जोर होता. आता एखादा नवा उमेदवार तयार करून पक्षाला पणजीत स्थान निर्माण करण्याचा विचार सुरू आहे. भाजपकडे संगनमत न करण्याची मानसिकता असलेला नव्या दमाचे उमेदवार तयार व्हावे, या दृष्टीने पक्ष विचार करीत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना कोणतेही विशेष प्रयत्न न करता पणजी मतदारसंघाते सुमारे साडेचार हजार मते मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघासाठी पक्षाच्या सर्व नेत्यांनी कंबर कसून काम केल्यास भविष्यकाळात कॉंग्रेसला फायदा होईल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
सांताक्रुझचे आमदार बाबुश मोंसेर्रात यांनी निवडणुकीसाठी आवश्यक असलेले साहित्यही तयार ठेवले आहे. परंतु त्यांची खरी भूमिका काय असेल याबाबतीत कॉंग्रेस नेते गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.