Home बातम्या निवडणुकीच्या काळात गोव्यात जनजागृती घडवू

निवडणुकीच्या काळात गोव्यात जनजागृती घडवू

0

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आपण प्रसंगी उपोषणासही बसू असे सांगून रामदेव पुढे म्हणाले की, गोव्यातून निर्यात होणार्‍या खनिजावर जेवढी रॉयल्टी मिळते, त्याच्या पन्नास टक्के गोव्याला मिळायला हवी. मात्र, प्रत्यक्षात गोव्याला निर्यात होणार्‍या खनिजावरील केवळ दहा टक्के रॉयल्टी मिळते असे ते म्हणाले.

खाण माफिया, भू माफिया व ड्रग माफिया यांच्यापासून गोव्याला वाचवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन रामदेव यांनी केले. बेकायदा खाणींमुळे जे सात लाख कोटींचे गोव्याचे नुकसान झाले त्या पैशातून संपूर्ण गोव्यात सोन्याचे रस्ते बांधणे शक्य झाले असते, असे उद्गार त्यांनी काढले. भ्रष्टाचार व काळा पैसा याविरुद्ध आवाज उठवण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.

भारताने आपला खनिज माल चीनला निर्यात करणे बंद करावे व या देशी संपत्तीचा देशातच उत्पादनासाठी वापर केला जावा असे सांगून बाबा रामदेव म्हणाले की गेल्या काही वर्षांत राज्यात जो खाण घोटाळा झाला, त्याची जबाबदारी खाण मंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी. बेकायदा खाणी बंद पडल्या तर त्यामुळे कोणावरही उपासमारीची पाळी येणार नाही असे ते पुढे म्हणाले.

गेल्या पाच वर्षांत ज्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला व गोवा लुटला त्यांनाच जनतेने पुन्हा निवडून आणता कामा नये असेही बाबा रामदेव यांनी सांगितले. भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कायदा करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. कचरा व्यवस्थापनाकडे गोवा सरकारने दुर्लक्ष केल्याने सुंदर गोवा कुजू लागला आहे अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्राथमिक शिक्षणाच्या इंग्रजीकरणाविरुद्ध त्यांनी सरकारवर यावेळी तोफ डागली. ते म्हणाले की, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले गेले पाहिजे. स्वस्थ व समृद्ध भारताचे स्वप्न घेऊन आपण भारतभर फिरत असून त्यासाठी गोव्यात आलो आहोत. तेच उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून आपण गोवा बचाव संमेलन येथे आयोजित केले आहे, असे ते पुढे म्हणाले. या पत्रकार परिषदेला भारत स्वाभिमान ट्रस्टचे कमलेश बांदेकर, दिनेश वाघेला व पतंजली योग समितीचे डॉ सूरज काणेकर हे उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर बाबा रामदेव यांनी राज्यातील बिगर सरकारी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

गोवा बचाओ संमेलनाची म्हापशात जय्यत तयारी

 पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान संघटनेतर्फे दि. ११ रोजी ४.३० वा. आयोजित म्हापसा येथील गोवा बचाओ संमेलनाची जय्यत तयारी झाली असून टॅक्सी स्टॅण्डवरील या संमेलनात योगगुरू रामदेव बाबा भ्रष्टाचार, काळे धन, अवैध खाणी या विषयी गोमंतकीयांना मार्गदर्शन करणार आहेत.

योगऋषी रामदेव बाबा सध्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलना संदर्भात गोवा भेटीवर आलेले असून त्यांच्या गोव्यात विविध ठिकाणी सभा होत आहेत. या सभांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. म्हापसा येथील सभेलाही उत्तर गोव्यातील जनतेने मोठ्या संख्येने हजर रहावे असे आवाहन पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.