‘कॉंग्रेसने केलेले आरोप तथ्यहीन’

0
106

१५ कलमी आरोपपत्राला भाजपाचे प्रत्युत्तर
कॉंग्रेसने राज्यातील भाजप सरकारवर ठेवलेल्या १५ कलमी आरोपत्रातील सर्व आरोप तथ्यहीन असून वैफल्यग्रस्ततेतून आले आहेत असे प्रत्युत्तर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांनी काल दिले.
गेल्या ७ वर्षांच्या काळात फालेरो गोव्याच्या राजकारणापासून अलिप्त होते. त्यांचा आत्मा दिल्लीत तर शरीर गोव्यात आहे. येथील कॉंग्रेस संघटना डबघाईस आल्याने कॉंग्रेस पक्षश्रेष्ठीनी त्यांना येथे पाठविले आहे. त्यामुळे झालेली त्यांची वैफल्यग्रस्तता आपण समजू शकतो. परंतु तथ्यहीन आरोप सहन करणे शक्य नाही, असे डॉ. मिस्किता यांनी सांगितले.भाजप सरकारवर आरोप करण्यापूर्वी त्यांनी तपशील गोळा करायला हवा होता. भाजप सरकारने ठराविक लोकांनाच सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून दिला. या फालेरो यांच्या आरोपावर विश्‍वास ठेवणे शक्य नाही, असे सांगून दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखालील एक लाख ३२ हजार लाभार्थींपैकी ४८ ख्रिस्ती तर ५ हजार लाभार्थी मुसलमान समाजातील असल्याचे मिस्किता यांनी सांगितले. फालेरो यांनी गोव्यासाठी दिल्लीहून येताना एकच चांगली योजना आणली ती म्हणजे पक्षातील ज्येष्ठ मंडळी राणे, रवी यांना पक्षापासून दूर ठेवण्याची, असा टोमणाही डॉ. मिस्किता यांनी हाणला.
गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ स्थापन करणारे गोवा हे पहिले राज्य आहे, असे सांगताच आतापर्यंत गुंतवणूक किती झाली असा प्रश्‍न विचारून मिस्किता यांना कात्रित पकडण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला, त्यावर २७ कंपन्यांचे प्रस्ताव आले आहेत. मागच्या सरकारने केलेल्या ‘सेझ’च्या घोटाळ्यामुळे ३२ लाख चौ. मी. जमीन अडकली आहे. त्यामुळे समस्या निर्माण झाल्याचे ते म्हणाले. गेल्या दहा वर्षांत कॉंग्रेसच्या काळात जेवढा अमली पदार्थ जप्त करणे शक्य झाले नाही, ते काम आपल्या सरकारने एकाच वर्षात केल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारची आश्‍वासने पोकळ : खंवटे
परिवर्तनाच्या गोष्टी सांगणार्‍या सरकारची सर्व आश्‍वासने पोकळ ठरली असून उत्तर गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. त्यात सुधारणा हवी असल्यास जनतेलाच भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी काल पत्रकार परिषदेत दिला.
आपल्या मतदारसंघातील पर्वरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक चोर्‍यांच्या तक्रारी घेऊन जाणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना घरी कुत्रे पाळण्याचा सल्ला देतात, अशा अधिकार्‍यांना पोलिसात काम करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी पदे रिक्त करावीत, असे खंवटे म्हणाले. पोलीस खात्यातील भ्रष्टाचार बराच वाढल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस स्थानकावर तक्रारीची नोंदही केली जात नाही, असे सांगून गृहमंत्र्यांनी या प्रकाराची गंभीरपणे दखल घ्यावी, अशी मागणी खंवटे यांनी केली. कॅसिनोसाठी गोव्यात येणारे लोक पर्वरी परिसरात रात्रीच्यावेळी धागडधिंगा घालीत असतात व पोलीस बघ्याची भूमिका घेण्याचे काम करतात, असे त्यांनी सांगितले. गेल्या विधानसभा अधिवेशनात भाडेकरूंची तपासणी एका महिन्यात करण्याचे आश्‍वासन दिले होते. तीन महिने उलटले तरी सुरुवातही केली नाही, असे ते म्हणाले. तक्रार घेऊन पोलीस स्थानकावर जाणार्‍यांना पोलीस नाऊमेद करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पोलीस हप्ते गोळा करण्यावरच अधिक लक्ष केंद्रित करीत असल्याचे खंवटे यांनी सांगितले. आपण सरकारला दिलेला पाठिंबा काही मुद्द्यांपुरता मर्यादित असून जनता भाजपच्या धोरणास आपला नेहमीच विरोध असेल, असे त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.
लोकायुक्त लवकरच
सरकार लवकरच माहिती आयुक्त व लोकआयुक्त नियुक्त करणार असल्याचे प्रदेश भाजप प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांनी सांगितले.
भ्रष्टाचार बाहेरून लोक येऊन करीत नाहीत तर गोमंतकीय अधिकारीच त्यात गुंतले आहेत. पर्रीकर यांनी भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले. आता पार्सेकर नव्यानेच मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांचाही प्रयत्न असेल, असे एका प्रश्‍नावर डॉ. मिस्किता यांनी सांगितले. अमली पदार्थ गैरव्यवहार प्रकरणी विधानसभा समितीने दिलेला अहवाल सरकारने मान्य का केला नाही, याप्रश्‍नावर पत्रकारांनी डॉ. मिस्किता यांना छेडले असता, सरकार योग्यवेळी त्यावर विचार करील, असे ते म्हणाले.