नगरगावी रंगलेले मराठी साहित्य संमेलन

0
557

– म. कृ. पाटील
बिल्वदल साखळी आणि गोवा राजभाषासंचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने, श्री शांतादुर्गामंदिराच्या सभागृहात प्रख्यात गोमंतकीय साहित्यिक पंडित महादेव शास्त्री जोशी नगरी म्हणजे आंबेडे – नगरगाव येथे रविवार दि. ७ डिसेंबर २०१४ रोजी बिल्वदल साखळी संस्थेचे दुसरे सत्तरी तालुका मराठी साहित्य संमेलन साजरे झाले. संमेलनास २५०-२६० दर्दी रसिकांची उपस्थिती होती. संमेलनाची सांगता होईपर्यंत आलेले मराठी रसिकप्रेमी आनंदाने भाषणे, चर्चासत्रातील भाषणे आणि नवोदित कवी-कवयित्रींनी सादर केलेल्या काव्याचा आस्वाद घेत उत्स्फूर्त दाद देत होते.
कर्तृत्वाने आणि विद्वत्तेने ज्यांनी भारतीय सांस्कृतिक कोशाच्या १० खंडांची निर्मिती, मुलांच्या करिता वेगळे सांस्कृतिक कोश असे विपुल प्रमाणात साहित्य निर्माण केले, त्या पंडित महादेव शास्त्री यांच्या जन्मगावी हे दुसरे साहित्य संमेलन होते. या संमेलनाचे उद्घाटन करताना डॉ. श्रीकृष्ण म्हणाले, वाचन व संस्काराची मुळे रुजविण्याची गरज भासत आहे. वाचन, मनन आणि लेखन अभिव्यक्तीतून माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण पूर्णत्वास जाते. नवोदित लेखकांनी स्वत:च्या समाधानाकरिता लिहिले पाहिजे. ऐकलेले, पाहिलेले आणि वाचलेले साहित्याचा समन्वय साधून लेखन केल्यास मनातील ताणतणावाचा निचरा होतो. मन स्वच्छ आणि साफ झाल्यावर काम करण्याची उमेद वाढीस लागते. पंडित महादेवशास्त्री जोशी, या विश्‍वव्यापी लेखकाच्या जन्मभूमीत साहित्य नवांकुर फुलविण्याचे कार्य करण्याची नवोदितांना मिळत असल्याबद्दल समाधान वाटते.या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास व्यासपीठावर प्रमुख वक्ते प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, अध्यक्षस्थानी लोककला संशोधिका प्रा. सौ. पौर्णिमा केरकर, आंबेडे नगरगावचे सरपंच वामनराव देसाई, श्री शांतादुर्गा देवस्थानचे अध्यक्ष शंकर गावकर, बिल्वदल साखळीचे अध्यक्ष व पत्रकार सागर जावडेकर, उपाध्यक्ष व संमेलन निमंत्रक म. कृ. पाटील, सचिव ऍड. करुणा बाक्रे, सच्चे मराठीप्रेमी माजी उपसभापती नरहरी हळदणकर आसनस्थ होते.
साहित्य निर्मिती, साहित्य चिंतन आणि मराठी साहित्याचे वाचन यांच्या संबंधी मोठी समस्या निर्माण झाल्याचे सांगत प्रमुख वक्ते प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांनी मराठी भाषेने प्राचीन काळापासून राखून ठेवलेल्या तीन कौशल्यावर प्रकाशझोत टाकला. मराठी साहित्य संमेलने, मराठी भाषेचे विविधांगी दिवाळी अंक आणि वाचन चळवळ या तीनही गोष्टींची सुरुवात प्रथम मराठी भाषेतून झाली. हीच भाषा म्हणून मराठी भाषेची शाश्‍वत कीर्ती आणि निर्मिती आहे. छोट्या छोट्या संमेलनांच्या माध्यमातून साहित्य निर्मितीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. वक्त्यांची विविध विषयांवरील भाषणे ऐकायला मिळतात. बुजुर्ग लेखक-कवीशी वार्तालाप करण्याची संधी मिळते. थोडेतरी ऐकलेले झिरपत अंत:करणात पोहोचते. मराठी साहित्यिक आणि साहित्य यांच्या पुस्तकांचे वाचन, मनन आणि चिंतन झाले तर थोडे तरी झिरपतेच झिरपते त्याचा उपयोग नवोदितांना हमखास होतो. शिक्षणात जिवंतपणा येण्याकरिता विविधांगी साहित्याचे वाचन नियमित व्हायला हवे. सत्तरीची साहित्य, सांस्कृतिक परंपरा
सत्तरीला साहित्य, संस्कृती, शौर्य, वीरश्री, शेती, राजकारण आदिबाबतीत वैविध्यपूर्ण अशी परंपरा लाभलेली आहे असे संमेलनाध्यक्षा तथा लोकसाहित्याच्या संशोधिका, कवयित्री प्राध्यापिका सौ. पौर्णिमा केरकर म्हणाल्या. नवोदितांना साहित्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी त्यांचा आत्मविश्‍वास, धाडस वाढविण्याची गरज आहे. माणसाला विचाराच्या आदान प्रदानातून जीवन जगण्याचे बळ मिळते. साहित्यात विविध स्तरावरील विविधांगी नात्याचा विचार अभिव्यक्त झालेला असतो. पंडित महादेवशास्त्री जोशी, पांडुरंग पिसुर्लेकर, गुरुनाथ नाईक, जयसिंगराव राणे, दीपाजी राणे सारख्या कर्तृत्वानांची जन्मभूमी आहे. अतिशय समृद्ध संपन्न अशी पर्यावरणीय संपदा लाभलेली आहे. तरीपण सत्तरीतील महिलांना लेखन निर्मितीस अपेक्षेप्रमाणे प्रोत्साहन मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. सत्तरी ही शूरवीरांची भूमी. लोकसंस्कृतीची बीजे याच भूमीत, सह्याद्रीच्या कुशीत वसली आहेत. स्वातंत्र्य सैनिकांची संख्या जास्त असल्याने ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सत्तरीवासियांनी सार्थ अभिमान बाळगावा अशी नररत्ने या भूमीत जन्मली असल्याने त्यांचा वारसा चालविण्याचे दायित्व युवा पिढीने उचलावे, असे उद्गार संमेलनाध्यक्षा पौर्णिमा केरकर यांनी काढले.
माहितीपूर्ण परिसंवाद
महिलांची स्पंदने या परिसंवादात कवयित्री चित्रा क्षीरसागर यांनी स्वयंरोजगार आणि स्वयंसाहाय्य गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक सक्षमीकरण करावे यासंबंधी विचार मांडले. महिलांच्या समस्या आणि त्यातून निर्माण होणार्‍या वेदना, त्रास, अवहेलना यावर मात करून आपले जीवन अधिकाधिक समृद्ध व सुखी कसे होईल हे सांगताना महिलांसंबंधी असलेल्या कायद्याची माहिती दिली. भारतीय संविधानातील कायदे महिलांकरीता कसे उपयोगी आहेत, त्याच्या सहाय्याने जीवन जगणे सुसह्य होऊ शकते याकरीता प्रत्येक महिलेला कायद्याचे प्राथमिक ज्ञान आणि माहिती असायला हवी.
लोकसाहित्याच्या नवोदित अभ्यासिका सरोजनी गावकर यांनी कोणतीही मदत, पाठबळ नसताना मागच्या पिढीने जीवापाड जपलेल्या लोककला, साहित्य आणि संस्कृतीतून मानवी जीवनाचे अनेक बहुआयामी पैलू अभ्यासताना दृष्टीस पडतात. हा सांस्कृतिक वारसा आजच्या पिढीने सांभाळायला हवा. त्यांचा संग्रह करण्यासाठी योगदान द्यायला हवे.
‘मुलींना लिहिता करता येते का?’ या विषयावर आपले विचार प्रकट करताना दाबे शासकीय विद्यालयाच्या अध्यापिका भाग्यरेखा गावस यांनी पालकवर्गाला मार्गदर्शन केले. पालकांनीच आपल्या मुलींना सक्षम बनविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. आज अनेक महिला घरकाम करतात. त्यांना ‘कामवाली बाई’ म्हणून संबोधले जाते. अशा महिलांच्या स्पंदनांचा वेध घ्यायला हवा तेव्हाच त्यांच्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. अनेकांच्या घरी कामे करून अर्थार्जन करत प्रपंच चालविताना होणारी त्यांची तारांबळ, तारेवरची कसरत साहित्यात प्रकर्षाने उमटायला हवी. दिवसभराच्या स्पंदनांना खर्‍या अर्थाने विविध मार्गातून वेगळी वाट निर्माण करून देण्याचा प्रयत्न झाल्यास मराठी साहित्यात वास्तववादी साहित्य आणि वेगळ्या विचारसरणीची भर मौलिक ठरेल असे परिसंवादाच्या अध्यक्षा प्रा. स्नेहा म्हांबरे यांनी सांगितले.
तरुणाईवरील परिसंवाद
‘तरुणामध्ये साहित्याची आवड’ या परिसंवादात ज्येष्ठ कथाकार नारायण महाले, पत्रकार वळणदार अक्षर मार्गदर्शक राघोबा पेडणेकर, ग्रंथपाल संजीव आजगावकर, अध्यापिका गौतमी चोर्लेकर आणि स्नेहल गावकर यांनी विचार मांडले. शालेय अथवा महाविद्यालयीन स्तरावर अध्यापन करताना आशयाशी सलग्न असलेल्या घटकाचा उल्लेख करताना संदर्भाकरीता पुस्तकांचा उल्लेख करावा. विद्यार्थ्यांना त्या पुस्तकासंबंधी माहिती रंजकतेने सांगत त्याची उत्सुकता, जिज्ञासा आणि कुतूहल विकसित केल्यास वाचनालयातील पुस्तकांनाही बरे वाटेल. विद्यार्थीही स्वयं अध्ययनाने ज्ञान आत्मसात करतील.
पं. महादेवशास्त्री जोशी पुरस्कार
‘बिल्वदल साखळी’ या संस्थेने या वर्षापासूनच असामान्य कतृत्वान साहित्यिक पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या नावे साहित्य पुरस्कार सुरू केला आहे. बिल्वदलच्या या पहिल्या पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ कवी प्रा. माधव सटवाणी यांना डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना कविवर्य माधव सटवाणी उद्गारले, ‘‘साहित्याची सेवा करताना कोणत्याही पुरस्काराची, सन्मानाची अपेक्षा न धरता कार्यकर्तृत्व केले. जमेल तेवढी मराठी साहित्याची सेवा केली. चांगल्या उत्कृष्ट साहित्याचा गौरव होत असतो. तसाच माझ्या साहित्य सेवेचा झाला. पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या नावाने मला मिळालेल्या पुरस्काराने मनस्वी आनंद झाला; पण त्याचबरोबर आपल्यावरील जबाबदारी वाढली.
ऍड. भालचंद्र मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कवी संमेलन उशिरापर्यंत रंगले. गझल, चारोळी, मुक्तकाव्य, विडंबन काव्य आदी प्रकारांनी कविसंमेलनात बहारदार रंगत आली. या कविसंमेलनात पौर्णिमा केरकर, चित्रा क्षीरसागर, मोहन कुलकर्णी, माधव सटवाणी, अविनाश जाधव, प्रकाश ढवण, अन्नपूर्णा अभ्यंकर या बुजुर्गांसमवेत नवोदित कवी-कवयित्री गौतमी चोर्लेकर, शिवाजी दळवी, सविता शिरोडकर, सरोजनी गावकर, मानसी गावस, नीलम पर्येकर, पूर्णा गावकर, मधुरा वझे, शुभदा च्यारी, प्रशांत गावकर, प्रियांका च्यारी, लक्षिता बांदेकर, प्रदीप गवस, प्रज्वलिता गाडगीळ यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या कविता सादर केल्या.
साहित्य संमेलनाचे निमंत्रक आणि बिल्वदलचे उपाध्यक्ष म. कृ. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सत्तरीतील नररत्नांच्यावर कादंबरी लेखन, कथा लेखन करण्याचे आवाहन त्यांनी केले. बिल्वदलचे अध्यक्ष पत्रकार सागर जावडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत आणि परिचय करून दिला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतमी चोर्लेकर यांनी केले. या कार्यक्रमाला ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक प्रा. गोपाळराव मयेकर सहपरिवार उपस्थित राहिले. पौर्णिमा केरकर, डॉ. श्रीकृष्ण जोशी, माधव सटवाणी, कृष्णाजी कुलकर्णी आणि सागर जावडेकर यांना स्वत:चे ‘हे दान कसे मज पडले’ या पुस्तकाची प्रत सप्रेम म्हणून दिली. साहित्य संमेलन यशस्वी करण्यात आंबेडे-नगरगाव जनतेचे उत्तम सहकार्य आणि योगदानाबद्दल हार्दिक आभार!