टेक जिहादी

0
304

इराक आणि सीरियामध्ये हाहाकार माजवलेल्या आयएसआयएससाठी सोशल मीडियाचा दुरूपयोग करणार्‍या एका तरुणाचा ब्रिटनच्या वृत्तवाहिनीने पर्दाफाश केला. त्यानंतर आपल्या सुरक्षा यंत्रणांना जाग आली आणि त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या. पण गेली अनेक वर्षे अशा प्रकारे जिहादींना चिथावत आलेल्या या मेहदी मसरूर बिस्वास नामक महाभागाचा थांगपत्ता भारतीय गुप्तचर यंत्रणांना मात्र नव्हता हे अजबच म्हणायला हवे. ट्वीटरवरून आयएसआयसाठी हजारो ट्वीटस् करणार्‍या या मेहदीचा १७,७०० जण पाठपुरावा करीत होते, त्याच्या ट्वीटस्‌वर नजर ठेवून होते आणि त्याच्याकडून मार्गदर्शन मिळवीत होते. त्याने केलेल्या ट्वीटस् आजवर लाखो वेळा पाहिल्या गेल्याचे दिसून आलेले आहे. ट्वीटरवरून जिहादींना अगदी तुर्कस्थानची सीमा ओलांडून इराकमध्ये कसे शिरायचे इथपर्यंतचे मार्गदर्शन करणारा हा तरूण बेंगलुरूच्या एका बड्या कंपनीत अधिकारी आहे हे तर अधिक धक्कादायक आहे. दहशतवादी म्हणजे कोणीतरी अल्पशिक्षित, परिस्थितीने गांजलेले तरूण चिथावणीखोरांना बळी पडून वाममार्गाला लागतात हा समज एव्हाना खोटा ठरला आहे. उच्चशिक्षित, उच्चभ्रू वर्गामध्येही दहशतवादी शक्तींना पाठिंबा मिळताना दिसतो आहे आणि समाजामध्ये संभावितपणे वावरणार्‍यांकडून पडद्याआडून देशद्रोही कारवाया सुरू असल्याचेही आढळून आले आहे. मेहदी बिस्वास हा असाच एक नवा म्होरक्या आहे. त्याच्या ट्वीटस्‌चा ट्वीटरवर पाठपुरावा करणार्‍या सतरा हजार जणांपैकी अनेकजण विदेशी जिहादी आहेत, जे आयएसआयएसला सामील झालेले आहेत. मध्यंतरी आयएसआयएसने काही पाश्‍चात्त्य नागरिकांच्या गळा चिरून ज्या नृशंस हत्या घडवून आणल्या, त्यावेळी विदेशी दहशतवादीच त्या कृत्यात सहभागी असल्याचे आढळून आले होते. असेच काही विदेशी दहशतवादी या मेहदीच्या ट्वीटर खात्यातून केल्या जाणार्‍या ट्वीट्‌स्‌वर नजर लावून होते असे आढळून आले आहे. या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश एका विदेशी वृत्तवाहिनीने करावा, त्याच्या गुगल आणि फेसबुक खात्यांच्या आधारे त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचावे आणि आपल्या गुप्तचर यंत्रणांना मात्र या सार्‍या प्रकाराचा माग काढणे सोडाच, सुगावाही लागू नये हे फार भयावह आहे. आपल्याला कौटुंबिक विवंचना नसत्या, तर आपणही आयएसआयएसला जाऊन मिळालो असतो अशी मुक्ताफळेही या मेहदीने उधळली होती. आयएसआयएसने प्रेरित झालेल्या अल्पसंख्यक तरुणांची संख्या भारतात वाढतच चालली आहे. मध्यंतरी मुंबईजवळच्या कल्याणचे तरूण थेट इराकमध्ये आयएसआयएसला जाऊन मिळाले आणि त्यांच्यासाठी लढले. मग इतर भागांतूनही आयएसआयएसला जाऊन मिळण्याचे प्रयत्न सुरू झाले. इराकमध्ये जाऊ पाहणार्‍या महाराष्ट्रातील काहींना हैदराबादला पकडण्यात आले, तर इतर भागांतील काहीजण जाऊही शकले. कोणी आयएसआयएसची टीशर्टस् घालून फोटो काढून घेते आहे, कोणी त्यांची पत्रके वाटते आहे, कोणी काश्मिरमध्ये निवडणूक प्रक्रिया जोरात सुरू असताना त्यावर बहिष्कार घालण्याची जनतेला आवाहने करीत भिंती रंगवते आहे. एकंदरित आयएसआयएसचे हे आकर्षण बरेच वाढल्याचे दिसते. स्वतःचा भौगोलिक प्रदेश असलेली ही एकमेव दहशतवादी संघटना आहे, म्हणूनच अवघ्या जगासाठी ती अत्यंत धोकादायक आहे. असे असताना अशा दहशतवादी संघटनेसाठी भारतामध्ये पाठीराखे निर्माण होणे आणि दिवसागणिक वाढत जाणे ही चिंतेची बाब आहे. बेंगलुरूच्या मेहदी बिस्वाससारखे उच्चशिक्षित, तंत्रज्ञान निपुण व बड्या कंपनीत अधिकारपदावर असलेले तरूण जिहादींच्या मोहजालात अडकतात आणि इतरांनाही त्यात सामील होण्यासाठी चिथावणी देतात यातून देशापुढे निर्माण झालेल्या नव्या धोक्याची कल्पना यावी. अशा वेळी आपल्या गुप्तचर यंत्रणांमध्ये अधिक सतर्कता येण्याची जरूरी आहे. दहशतवाद्यांना सोशल मीडियासारख्या मुक्त माध्यमात रान मोकळे झालेले आहे. अनेक दहशतवादी नेते ट्वीटर आणि फेसबुकवर आणि इतर सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवरून जहर ओकत असतात. लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद अगदी काल परवापर्यंत ट्वीटरवरून भारताविरुद्ध विष ओकीत असे. त्याचे ते ट्वीटर खाते बंद पाडायला वर्षे जावी लागली. हे असे होणार असेल तर असा अपप्रचार सुरूच राहणार. माहिती तंत्रज्ञानाच्या गैरवापराद्वारे सुरू असलेल्या देशद्रोही कारवाया थोपवण्यासाठी सज्ज होण्याची निकड मेहदी बिस्वास प्रकरणातून व्यक्त झालेली आहे एवढे खरे.