आग्य्रातील मुस्लिमांच्या धर्मांतरणाचे संसदेत जोरदार पडसाद

0
83

पंतप्रधानांच्या हस्तक्षेपाची विरोधकांची मागणी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत एका संस्थेने आग्रा येथील सुमारे १०० जणांचे हिंदू धर्मात फेर धर्मांतर केल्याप्रकरणी विरोधकांनी काल लोकसभेत तसेच संसदेबाहेरही जोरदार आवाज उठवित संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.मात्र हा विषय संबंधित राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न असल्याचे सांगून केंद्र सरकारने आपले हात झटकले. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणीही विरोधकांनी केली होती. तथापि केंद्र सरकारने या प्रकरणात आपल्याला कोणतीही भूमिका नसल्याचा दावा केला. तसेच फेरधर्मांतर जबरदस्तीने नसून स्वेच्छेने झाले असल्याचा दावाही भाजपच्या नेत्यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी आग्रा पोलिसांनी रा. स्व. संघाशी निगडीत एका हिंदू संघटनेविरोधात एफआयआर दाखल केले आहे. धर्मजागरण मंच व त्या संघटनेचे नेते किशोर यांच्या विरुद्ध या संदर्भात तक्रार नोंद झाली आहे.
सदर फेरधर्मांतराद्वारे हिंदू धर्मात आलेल्यांना भूखंड, बीपीएल कार्डे आदी आमिषे दाखविण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
राज्यसभेत बहुजन समाजपक्षाच्या नेत्या मायावती यांनी बजरंग दलाने आग्रा येथील काही मुस्लिम कुटुंबांना हिंदू धर्मात आणल्याचा आरोप केला. या धर्मांतरासाठी त्यांच्यावर सक्ती करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. हा प्रकार घटनेचा भंग करणारा असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकारामुळे देशात जातीय तणाव निर्माण होणार असल्याचे त्या म्हणाल्या. कॉंग्रेसचे आनंद शर्मा यांनीही सरकारने याप्रकरणी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. यावेळी संसदीय व्यवहार राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी उत्तर प्रदेश सरकारने संबंधितांवर एफआयआर नोंदवले आहे.