कॉंग्रेसचे पोलीस महासंचालकांकडे निवेदन
गोवा भरती आणि रोजगार सोसायटीचे कामगार शाबी पेडणेकर व इतरांना धमक्या दिल्याच्या प्रकरणी पणजी पोलिसांत सादर केलेली पेडणेकर यांची तक्रार नोंदवून प्रदेश भाजपचे आयोजन सचिव सतीश धोंड व आमदार डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी काल पत्रकार परिषदेत केली.दरम्यान, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुइझिन फालेरो, कॉंग्रेसचे अन्य पदाधिकारी तसेच फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी उपोषणास बसलेल्या कामगारांची भेट घेवून पाठिंबा व्यक्त केला.
यासंबंधी आपण पोलीस महासंचालकांना पत्र पाठविल्याचे कवठणकर यांनी सांगितले. धोंड यांनी दिलेल्या धमकीमुळे पेडणेकर व इतर कामगार घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांनी पणजी पोलिसात तक्रार दिली आहे. सदर तक्रार नोंदवून चौकशी करण्यास पोलीस चालढकल करीत असल्यानेच पोलीस महासंचालकांना निवेदन सादर केल्याचे त्यांनी सांगितले. शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या धसास लावण्यासाठी उपोषणास बसलेल्या कर्मचार्यांना धमक्या देण्याचे धोंड यांना कसे धाडस झाले, असा प्रश्न कवठणकर यांनी केला. पोलीस महासंचालकांनी या गंभीर प्रकरणी त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
… तर कॉंग्रेस रस्त्यावर उतरणार
वरील कामगारांनी नोकर्यांसंबंधीची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारला दिलेली मुदत आज संपत आहे. या मुदतीत मागण्या पूर्ण न केल्यास कॉंग्रेस पक्ष त्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे कवठणकर यांनी सांगितले.
विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनीही या विषयाची गंभीर दखल घेतली असून ते विधानसभेतही आवाज उठवतील, असे कवठणकर यांनी सांगितले.