अनुक्रमे ६५.४६ व ७१ टक्के मतदान
झारखंड व जम्मू-काश्मीर या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यात काल अनुक्रमे ६५ व ७१ टक्के एवढे मतदान झाले. जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान झाले होते.
जम्मू काश्मीरमध्ये मतदानावर बहिष्कार घालण्याची हाक विभाजनवाद्यांनी देऊनही मतदारांनी त्याकडे दुर्लक्ष करीत उत्साही मतदान केले. कालच्या दुसर्या टप्प्यात १८ मतदारसंघांसाठी मतदान झाले. या दरम्यान कोणत्याही अनुचित घटनेची नोंद झालेली नाही. विविध मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या.या राज्यात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील गेल्या २५ नोव्हेंबर रोजी १५ जागांसाठी ७१.२८ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले होते.
कालच्या दिवशी मतदानासाठी हवामानही पोषक राहिले. बर्फवृष्टीही झाली नाही. सर्व मतदारसंघांमध्ये सुरक्षा व्यवस्थाही कडेकोट ठेवण्यात आली होती.
झारखंडमध्ये ६५.३४ टक्के मतदान
झारखंडमध्ये दुसर्या टप्प्यातील निवडणुकीत २० मतदारसंघांसाठी काल ६५.६४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी पी. के. जजोरिया यांनी दिली. पहिल्या टप्प्यात १३ मतदारसंघांसाठी ६१.९२ टक्के एवढे मतदान झाले होते.
यावेळी २२३ उमेदवार रिंगणात होते व त्यात अर्जुन मुंडा व मधू कोडा या माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश होता.