– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव
संपूर्ण क्रिकेट विश्व फिल ह्यूजच्या अकाली व आकस्मिक मृत्यूमुळे शोकसागरात बुडाले असून गुरूवार दि. ४ डिसेंबर पासून सुरू होणार्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. ‘पूर्व नियोजित तारखेला कसोटी सामना खेळण्याच्या मनःस्थितीत ऑस्ट्रेलियन खेळाडू नाहीत.’ असे ऑस्ट्रिलियाच्या क्रिकेट संघटनेने जाहीर केले आहे. ब्रिस्बेन येथे सुरू होणारा हा सामना म्हणूनच पुढे ढकलण्यात आला आहे. ब्रिस्बेन आणि सिडनी या दोन शहरांच्यामधील मॅक्सविल हा फिलचा जन्मगाव. लगेचच कसोटी सामना खेळणे खेळाडूंना अवघड गेले असते. यावरून त्याचे राष्ट्र आणि त्या राष्ट्राचे खेळाडू यांचे फिलवर किती प्रेम होते याची कल्पना आपण करू शकतो.बहुधा आपल्या लक्षात येते की, ऑस्ट्रेलियन खेळाडू हे बरेचसे उद्धट आणि उर्मट असतात, पण फिल याला अपवाद होता, अत्यंत मितभाषी, शांत व सभ्य वृत्तीचा तो खेळाडू होता. म्हणूनच तो केवळ आपल्या सहकार्यांमध्येच नव्हे तर क्रिकेट जगतातला लोकप्रिय खेळाडू होता. आपण उत्कृष्ट फलंदाज आहोत, याचा दर्प त्याने कधीही मनाला लावू दिला नाही, म्हणूनच फिल ह्युजेसच्या अपघाती निधनाने अवघे क्रिकेट विश्व हळहळले.
विसाव्या वर्षी कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतक करण्याची करामत फिलने करून दाखवली होती. फिरकी गोलंदाजीला समर्थपणे तोंड देता यावे म्हणून त्याने विनंती करून शर्मा सरांचे नेट गाठले होते. हे शर्मा सर म्हणजे वीरेंद्र सेहवागचे कोच. फिलच्या चांगल्या स्वभावामुळे सेहवागनेही त्याला मदत केली होती.
फिलच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना भारतीय क्रिकेटचा विक्रमादित्य सचिन तेंडूलकर याने म्हटले आहे की,‘ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्यूजेस याच्या निधनाचे वृत्त ऐकून मला धक्काच बसला. आजचा दिवस हा क्रिकेटसाठी दुःखमय आहे. त्याचे कुटुंब, मित्र व चाहते यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ही अनपेक्षित अशी दुर्दैवी घटना आहे.’ ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टॉनी ऍबॉट यांचीही प्रतिक्रिया ही फार बोलकी आहे. ते म्हणतात, ‘आजचा दिवस क्रिकेटसाठी खूप दुःखमय असून त्यांच्या कुटुंबियांचे हृदयभंग करणारा आहे. त्यांच्या निधनाने कोट्यवधी ऑस्ट्रेलियन नागरिकांना धक्का बसलेला आहे. त्याने युवा असताना आमच्या देशाच्या राष्ट्रीय खेळाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्याविषयी संघातील सहकार्यांना कायम प्रेम आणि आदर असायचा, तो कायम क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात राहील.’
नियतीचा खेळ न्यारा असतो, असे म्हणतात ते काही खोटे नाही. फिल हा तसा अत्यंत सावध खेळाडू, नेमके ‘त्या’ सामन्यात त्याने जुने हेल्मेट वापरले, चांगले भक्कम अर्धे शतक त्याने खेळले आणि मग हा जीवघेणा अपघात ओढवला. आपटलेला चेंडू जरासा उशिरा आला आणि फटका मारून मान फिरवल्यावर चेंडू फिलच्या कानाच्या खालच्या भागावर आपटला. आघात इतका जबरदस्त आणि भयानक होता की, चेंडू आदळल्यावर फिलने पुढच्याच क्षणी वेदना अनावर झाल्याने हात गुडघ्यावर ठेवले आणि त्याच्या पुढच्याच सेकंदास तो तोंडावर खाली कोसळला. लगोलग खेळाडू त्याच्या मदतीला धावले, पण दुर्दैवाने फिल त्या क्षणापासून बेशुद्ध झाला, तो परत शुद्धीवर आलाच नाही. तब्बल तीन दिवस तो बेशुध्दावस्थेत होता आणि त्यातच काळाने त्याच्यावर झडप घातली.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिल ह्यूजेसच्या ज्या बाऊंसरने बळी घेतला तो बाऊन्सर घालणारा गोलंदाज होता शॉन ऍबॉर्ट. सिडनीतील शेफिल्ड शिल्डच्या सामन्यात न्यू वेल्सचा बावीस वर्षीय वेगवान गोलंदाज शॉन ऍबॉर्टचा तो बाऊन्सर फिल ह्यूजला काळाच्या पडद्याआड घेऊन गेला. या धक्क्याने सध्या शॉन ऍबॉर्ट जबरदस्त मानसिक दबावाखाली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याचे समुपदेशन सुरू आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया शॉनला या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करीत आहे, तर त्याच्याबरोबर या वेगवान गोलंदाजाचा हा शेवटचा बाऊन्सर ठरो, अशी प्रार्थना करीत आहेत.
ब्रायन लारा म्हणतो त्याप्रमाणे, ‘क्रिकेट हा अत्यंत धोकादायक खेळ आहे’ हे अशावेळी पटू लागते. किरकोळ जखमी, हातपाय फॅक्चर, कंबरदुखी हे तर क्रिकेटचे नेहमीचे रोग. पण एखादा खेळाडू मध्यम परिस्थितीतून महत्प्रयासाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत अव्वल ठिकाणी पोहोचतो आणि ऐन उमेदीच्या काळात एका बाऊन्सरमुळे तो निधन पावतो. हे सगळे सारे अनाकलनीय म्हणावे लागेल.
पूर्वी क्रिकेटच्या खेळात हेल्मेटचा वापर होत नसे, पण जसजसे खेळाडूला धोक्याने घेरले, तेव्हा हेल्मेटचा वापर होऊ लागला. तरीही काही फलंदाज अति धाडस म्हणून म्हणा किंवा चौकार, षटकारांना हेल्मेटमुळे व्यत्यय येतो, म्हणून म्हणा हेल्मेटशिवाय खेळत असतात. फिलने तर जुने का होईना, पण भक्कम असे हेल्मेट वापरले होते. पण नियतीने आपला खेळ केला व फिलची खेळाची कारकिर्द संपुष्टात आणली. शांत, सभ्य, मनमिळाऊ अशा अव्वल दर्जाच्या कामगिरीचा क्रिकेटपटू फिल गेला आणि सार्या क्रिकेटविश्वाला हळहळ वाटली. त्याला भावपूर्ण आदरांजली!