आनंदनगरी मांडू

0
143

– सौ. पौर्णिमा केरकर
मध्य प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे पाहण्यासाठी अवघ्या काही दिवसांसाठी आपण गेलो तर ते दिवस पुरण्यासारखे मुळीच नाहीत. त्यातून प्रवासाचे खास नियोजन करून जर आपण निर्णय घेतला तर निदान काही भाग तरी पाहू शकतो. त्यातील वेगळेपण अनुभवून आपल्या प्रवासाला न्याय देऊ शकतो. प्रवासाचा संबंध जसा प्रत्येक व्यक्तिमनाला अनुभवसमृद्ध करण्यासाठी आहे, तसाच तो नव्याने पुन्हा जुन्या गोष्टी शिकण्यासाठीसुद्धा आहे.या सार्‍या प्रक्रियेतून आनंदाची प्राप्ती होते. अशा आनंदाचा शोध घेण्यासाठी आम्ही सार्‍याजणी मिळून मध्य प्रदेशाची आनंदनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘मांडू’ला जाण्याचा विचार केला. आमच्या या ग्रूपमध्ये सार्‍या महिला आणि मुलीच होत्या. मध्य प्रदेशातील अंतर्गत भागात जाण्यासाठीचा सारा प्रवास हा बसचाच होता, त्यामुळे एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत जाताना ग्रामीण भाग, तेथील लोकजीवन बघता आले. सांस्कृतिक, नैसर्गिक, ऐतिहासिक संचिताने श्रीमंत असलेल्या ‘मांडू’मध्ये पाहण्यासारखी पुष्कळच स्थळे आहेत. या भागाला नैसर्गिक सौंदर्याची देणगी उपजतच लाभलेली आहे. एका बाजूला विंध्याचल पर्वत रांगा- या उंचीवरील सपाट जागेतच मांडू वसलेले आहे, तर दुसर्‍या बाजूला नर्मदेचे खोरे विसावलेले आहे. या ठिकाणच्या भौगोलिक रचनेमुळेच वातावरणात एक प्रकारची आल्हाददायकता भरून राहिलेली असते.
मांडूचा आमचा प्रवास जरी सकाळपासून सुरू झालेला असला तरी उज्जैन, भोपाल येथील ऐतिहासिक वारसा पाहूनच आम्ही पुढे जात होतो. त्यामुळे सकाळची कोवळी उन्हे झेलून, वैशाख वणव्याला सामोरे जावे लागण्याची पाळी येणारच होती. सर्व सहकारी मैत्रिणी परत परत एकच संवाद घोळवत होत्या- ‘तरी बरं आम्ही एसी बस केली, नाहीतर आमची पंचाईतच झाली असती. मला तर प्रवासच जमला नसता.’
काही गोष्टी आपल्याला गृहितच धराव्या लागतात, तडजोड करावी लागते तर कोठे त्या स्थळाचा आपण आत्मीयतेने आस्वाद घेऊ शकतो. वेगळ्या प्रदेशात, माणसांत मिसळायचे म्हणजे त्यांच्यातील वेगळेपणा शिकायचा. असे केले तर जगाच्या पाठीवर कोठेही जाण्याची भीती आपल्याला वाटणार नाही. एरव्ही सर्वत्र वेगळेपणा, वैविध्य आहे म्हणून तर या गोष्टी बघायच्या सतात, अन्यथा त्यात काहीही रस वाटला नसता.
दुपारपर्यंत आम्ही मांडूला पोहोचलो. एखाद्या मोठ्या प्रासादात पोहोचताना जसे मोठे दरवाजे प्रतीकरूपाने आपल्यासमोर येतात आणि आपण नियोजित स्थळी पोहोचलो आहोत याची साक्ष पटवितात, त्याच तर्‍हेने मांडूला पोहोचताच विविध दरवाजे आपल्यासमोर येतात. हे प्राचीन आणि प्रेक्षणीय दरवाजे ऐतिहासिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत. आलमगीर दरवाजा, दिल्ली दरवाजा- इतर सर्व दरवाज्यांच्या मांदियाळीतील ‘दिल्ली दरवाजा’ हा महत्त्वपूर्ण दरवाजा आहे. तो ‘मांडू’मध्ये प्रवेश करून दक्षिणेच्या बाजूने गेलो की गडावर पोहोचायला होते, तर याच रस्त्याने सरळ पुढे गेल्यानंतर मांडू गावात आपण प्रवेश करतो. आपल्याला ऐतिहासिक वारसास्थळे पाहायची असतात. सांस्कृतिक संचितांची श्रीमंती मोजायची असते, जमलेच तर आजच्या काळाशी त्याचे नाते जुळवून सांगड घालायची असते. म्हणूनच तर वेळ व आपली दृष्टीही नसते लोकजीवनाचा शोध घेण्याची. येता-जाता रस्त्याच्या आजूबाजूला असलेली छोटी-छोटी उसवलेली छप्परं, अर्धवट भिंतीची घरं, कडेकुशीला भर दुपारचीसुद्धा भिरभिरणारी उघडी-नागडी मुलं, जगण्यासाठी संघर्ष करणार्‍या महिला, गोवर्‍या घालणार्‍या कुमारिका… हे सारे चित्र मनात अस्वस्थता निर्माण करत होते.
हा परिसरच मुळी असा आहे की येथील मोठमोठे कलात्मक ‘महल’- कोणी आपल्या पत्नीच्या नावाने बांधलेले तर कोणी आपल्या प्रेयसीसाठी बांधलेले- लक्ष वेधून घेतात. त्यांत ‘शाही महल’, ‘जल महल’, ‘हिण्डोला महल’, ‘अशर्फी महल’, ‘रूपमती महल’, ‘बाजबहादूर महल’ आणि या सर्व महालांचा शिरोमणी शोभावा असा ‘जहाज महल.’ हे सारे देखण्या स्वरूपात या परिसराचे ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व वाढवतात. याच पार्श्‍वभूमीवर इथल्या ग्रामीण लोकमानसाची असलेली दयनीय अवस्था चिंतनीय वाटते. इथल्या नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी वळणार्‍या पावलांना इथल्या दबलेल्या मनाची, संघर्षमयी जगण्याची व्यथा तरी जाणून घेतल्याशिवाय कशी समजणार!
मध्य भारतातील प्राचीन प्रदेश असलेल्या मांडव्याने आपल्या पठारावर अनेक ऐतिहासिक स्थळांना स्थान दिलेले आहे. ‘मांडवगड’ हा गिरीदुर्ग याच पठारावर आहे. निसर्गसंपन्न आणि खूप जुन्या वैभवाची प्रतीके असलेली वैविध्यपूर्ण भव्य भवने या गडाने आपल्या अंगाखांद्यावर मिरवलेली आहेत. इतिहासात नावाजलेले, कलासक्त हृदयाचे मुस्लीम राज्यकर्ते अकबर, जहॉंगीर, शहाजहॉं यांनी या गडावरील मोहक वातावरणामुळे खूप दिवसपर्यंत विश्रांती घेणे पसंत केले. आपल्या प्रियतमेसाठी जागतिक उच्च दर्जाचे स्मृतिस्थळ उभारणारा मोगल सम्राट शहाजहॉं तर या मांडवगडाविषयी आपल्या आत्मचरित्रात लिहितो- ‘सुखप्रद हवा, पाणी आणि मनोरम दृश्ये या दृष्टीने मांडवगडासारखे सुंदर स्थान मला ठावूक नाही.’ अनेक मुसलमान सम्राटांच्या राजवटींनी या गडाचा इतिहास लिहिलेला आहे. इथल्या सार्‍याच वास्तूंवरती मुसलमानी राजवटींची मोहर उमटलेली बघताना याची साक्ष पटते. जीवन जगायचे तेही शाही थाटाचे. आपल्या बेगमांसाठी शाही महल व इतर सर्व व्यवस्था नीटनेटकी ठेवलेली. त्यांच्या पूजापाठासाठी खास बडदास्त ठेवलेली. मनोरंजन, नाचगाणी, निसर्गसौंदर्याचा साक्षात्कार घेण्यासाठीची चोख व्यवस्था; व या सर्वाचे असलेले नेटके व्यवस्थापन आपल्याला अचंबित करते. आयुष्याचा अगदी रसरसून उपभोग घ्यायचा. मग ते हम्माममधील स्नानसंध्येच्या माध्यमातून असो, नाहीतर ‘चंपाबावडी’च्या मार्गाने बाहेर जाऊन सौंदर्य न्याहाळत असो. नाट्यशाळेची अभ्यासपूर्ण निर्मिती हे हिलोला महालाचे स्थापत्त्यकौशल्य. तत्कालीन काळात येथील महिलावर्ग याच मार्गाने घोड्यावर, हत्तीवर बसून मार्गस्थ होत असत. या परिसरात मुसलमानांच्या जामी मस्जिदसारख्या स्थानाबरोबरच श्रीराम मंदिर, दिगंबर जैन मंदिर ही हिंदू-जैनांची धार्मिक स्थळेही आहेत.
वास्तुकलेचे एक वेगळेपण म्हणजे इथला इको पॉईंट. साधारण अर्धा कि.मी. अंतरावर, कुंपणाच्या अलीकडे उभे राहून जर आपण मोठ्याने आवाज दिला तर त्याचे प्रतिध्वनी आपल्या कानावर पडतात. हा आवाज परत परत ऐकायला खूप मजा येते. वास्तूकलेचे एक वेगळे तंत्र इथे आपल्याला अनुभवता येते. इथल्या सार्‍याच वास्तू पाहताना त्यांची निर्मिती ही निव्वळ आराम करण्यासाठी, रंजन-मनोरंजनासाठीच झालेली आहे याची प्रकर्षाने जाणीव होते. विस्तीर्ण पठारावर भिरभिरणारा वारा, हवेतील सुखद गारवा, कलात्मक आणि आनंदी मनोवृत्ती वाढवणारी स्थळे, या सांर्‍यामुळे हा परिसर येणार्‍या-जाणार्‍याला आपली वेदना विसरायला लावतो. वातावरणातील नैसर्गिक सौंदर्य जसे इथे आहे, त्याप्रमाणे त्या सौंदर्यात भर घातलेली आहे ती ‘राणी रूपमती’ महालाने. या महलाबरोबरीनेच ‘जहाज महल’ हे मांडवगडाचे देखणेपण आहे.
मांडवगडावरील सर्वात उंच जागी ‘रूपमती महल’ स्थिरावलेला आहे. शत्रूची टेहेळणी करणे हा जरी हेतू असला तरी राणी रूपमतीला नर्मदेचे दर्शन नियमित व्हावे ही बाजबहादूरच्या मनाची इच्छा होती. त्यानुसारच त्याने महालाची रचना केलेली आहे. रूपमतीसाठीच नर्मदेने साक्षात्कार घडवून आपले पाणी झर्‍याच्या माध्यमातून कुण्डात समाविष्ट केले. ते कुण्ड ‘रेवाकुण्ड’ म्हणून प्रचलित झाले. कपूर व मुंज असे दोन तलाव व या दोन तलावांच्या मधोमध असलेली भव्यदिव्य वास्तू जी जहाजाच्या आकाराची भासते म्हणून तो ‘जहाज महल.’ या नावाने प्रसिद्ध असलेला वास्तुकलेचा अप्रतिम नमुना हेसुद्धा पर्यटकांसाठी मांडवगडावरील एक आकर्षण ठरत आहे. गडावरच्या एकापेक्षा एक सरस, सुंदर इमारतीत हुशंगशहाचा मकबरा येतो. निलकंठेश्‍वर मंदिर, बौद्ध गुंफा, आकर्षक कलापूर्ण स्नानगृहे, धार्मिक स्थळे या सर्वांनी परिपूर्ण असलेली ही भूमी आजही पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरत आहे.
जैन संप्रदायातील भाविकांनी तर मांडवगडाला आपले तीर्थस्थानच मानले होते. नीलकंठेश्‍वर मंदिर परिसरातील थंड पाण्याचे झरे, वृक्षराजी, सभोवताली पसरलेली मोठी दाट असलेली चिंचेची झाडे या परिसराला व्यापून राहिलेली आहेत. हा परिसर फिरल्यानंतर जो थकवा जाणवतो तो घालविण्यासाठी आपल्याला इथे येऊन विसावा घेता येतो. गार पाणी, डोरेदार वृक्षांची सावली, पक्ष्यांचा किलबिलाट वातावरणात हळवेपणा आणतो. म्हणूनच खूप शांत व्हायला होते. थकवा दूर पळतो. तो काळ, त्या काळाचा डौल डोळ्यांसमोर येतो. प्रीती आणि भक्ती यांचे संचित इथे गवसते. प्रेमाची उत्कटता व त्याच उत्कटतेतून अविष्कृत झालेल्या कलाकृती मनाची हळवी, भावनाशील स्पंदने अधोरेखित करतात. इथल्या प्रत्येक वास्तूला आगळीवेगळी कलात्मक उंची आहे. विरह, प्रेम, त्याग, सेवा, भक्ती, साहित्य, संस्कृती, इतिहासाचा सुगंध इथल्या कणाकणांत भरून राहिलेला आहे. या भूभागाचे सौंदर्यच नजरेत भरणारे. थकवा दूर करणारे. निराशेचे दाटून आलेले मळभ दूर सारून ताजेतवाने करणारे. ऊर्जाप्राप्तीसाठी ही जागा पर्यटकांना खुणावणारी आहे.
शांत, निवांत जागेतील समाधान शोधण्यासाठी एकेकाळी या गडावर मोगल सम्राट येऊन स्थिरावले. सम्राट अकबर जेव्हा मांडवगडावर प्रवेश करते झाले तेव्हा त्यांनी दिल्ली दरवाजाचा वापर केला. हे सर्व दरवाजे इथल्या एकेकाळच्या दिमाखदार, वैभवशाली इतिहासाचे दालन आपल्यासमोर खुले करतात. कित्येक तत्त्ववेत्ते, साहित्यिक, इतिहास संंशोधकांना या जागेचा वापर साहित्यनिर्मितीसाठी योग्य वाटला. माळव्यावरील या पठाराशी नाते जोडून असलेले मुसलमान संस्कृती-संस्कार-विद्याप्रेमी होते व विद्वजनांचे, साहित्यिकांचे आश्रयदाते होते. महाकवी मंडन यांनी कित्येक शतकांपूर्वी लिहिलेले काव्यग्रंथ हे याच जागेला साक्षी ठेवून लिहिलेले होते असे सांगितले जाते. प्रेमाचे बंध- अनुबंध, नात्यातील हळवी स्पंदने टिपून माणसामाणसांत आपुलकी वाढविण्याचे काम या मांडवनगरीने तत्कालीन काळात मोठ्या प्रमाणात केले. सर्व क्षीण घालविण्यासाठी म्हणून इथे यायचे व या आनंदनगरीत समरस व्हायचे ही ओढ मनामनाला असायची. त्यामुळे दालने, कलाकुसरीचे झरोके येथील भव्यतेला आणि सौंदर्याला साद घालणारे आहेत. प्रेमाची मुक्त परिभाषा अभिव्यक्त करण्यासाठी तनामनाला हुरहुर लावणारी जागा हवी असते. श्‍वास-निःश्‍वास, मीलनाची आस, प्रणयभावनेचा धीट आविष्कार व प्रतीकात्मकतेने त्याचे प्रकटीकरण करणारी जागा म्हणजे मांडवगड- मांडूनगरी. संपूर्ण वर्षभर या परिसराचे वातावरण आल्हाददायक असते. पावसाळ्यात तर ते अधिक खुलून उठते. राणी रूपमती व बाजबहादूर यांची प्रणयगाथा फुलली, बहरली याच परिसरात. प्रेमाच्या उत्कट अभिव्यक्तीची स्पंदने टिपण्याची जागा म्हणजे मांडूनगरी. मांडवगड येथे आल्यानंतर निराशलेल्या मनाला नवसंजीवनी प्राप्त होते. ज्यांच्यासाठी म्हणून जगावं व भरभरून सौंदर्याचा आस्वाद घ्यावा अशा जागा येथे आहेत हे कळून चुकतं. इतिहासाबरोबरीनेच वर्तमानाशी जोडून घेत वाटचाल करतानाचा प्रवासही मग कंटाळवाणा होत नाही.