रुग्णवाहिकेतून चंडिगढला रवानगी
अखेर दोन दिवसांच्या ध्रुमश्चक्रीनंतर हरयाणा पोलिसांनी स्वयंघोषित अध्यात्म गुरू रामपाल याला काल रात्री ९ वा. अटक करून चंडिगढला नेले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला उद्या २१ रोजी पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. रामपाल याला याआधी २००६ सालीही अटक झाली होती. रामपालचा भाऊ पुरुषोत्तम याला याआधीच अटक करण्यात आली आहे.दरम्यान, संकुलात काल पोलिसांना सहा मृतदेह सापडले असून पोलिसांनी रामपाल विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंद केला. आश्रम संकुलात ज्यांचे निधन झाले ते पोलिसी कारवाईचे बळी नसल्याचे स्पष्टीकरण राज्य प्रशासनाने दिले आहे. रामपालच्या अटकेसाठी पोलिसांनी मंगळवारपासून कारवाई सुरू केली होती. मात्र हजारोंच्या संख्येने त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून पोलिसांशी दोन हात केले. कालही समर्थक पोलिसांशी भिडले. या पार्श्वभूमीवर काल आश्रमातील कर्मचार्यांनी सहाजणांचे मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिले. सहापैकी चार मृतदेह महिलांचे असल्याचे सांगण्यात आले. या व्यतिरिक्त अन्य एक महिला व बालकाचे इस्पितळात आणल्यानंतर मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. यामुळे आता रामपाल समर्थक हळूहळू आश्रमातून बाहेर पडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
समर्थकांना आश्रमातून बाहेर काढण्यास पोलिसांनी प्राधान्य दिले असून आतापर्यंत दहा हजार समर्थक तेथून बाहेर पडल्याचे सांगितले.