Home बातम्या ‘ऑपरेशन विजय’च्या वीरांचा गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवात सत्कार

‘ऑपरेशन विजय’च्या वीरांचा गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवात सत्कार

0

येत्या १६ डिसेंबर रोजी गोवा सरकारने केंद्रीय मंत्री एम. वीराप्पा मोईली तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे यांना निमंत्रित केले असून त्या दिवशी गोवा मुक्तिलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसेनानींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून गोवा राज्य कला व संस्कृती खात्याने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांचे प्रकाशन होणार असल्याची माहिती श्री. कामत यांनी दिली.

राजन नारायण लिखित ‘संपूर्ण स्वराज्य’, निष्ठा देसाई लिखित ‘आर्म्ड ऍग्रेशन’ तसेच मनोहर हिरबा सरदेसाई यांनी लिहिलेल्या गोमंतकाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास खंड १ व २ या पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित करण्यात येणार आहे. १७ डिसेंबर रोजी संरक्षणमंत्री ए. के. अँथनी यांच्या हस्ते आग्वाद किल्ल्यावर ‘विजय स्मारका’ची कोनशिला बसवण्यात येणार असून लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनाही त्यावेळी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर ‘ऑपरेशन विजय’ मध्ये सामील झालेल्या लष्करी जवानांचा सत्कार करण्यात येणार आहे. १८ डिसेंबर रोजी नव्या सेंट्रल लायब्ररी इमारतीचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून त्याचवेळी सुविख्यात गोमंतकीय वास्तुशिल्पकार चार्ल्स कुरैया यांना ‘गोमंतविभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. १९ डिसेंबर रोजी गोवा मुक्तिदिनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपील सिब्बल यांच्या हस्ते १९६१ पूर्वीच्या व १९६१ नंतरच्या टपाल तिकिटांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.

२० रोजी जुन्या सचिवालयापासून कांपाल येथील संचलन मैदानापर्यंत चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. १५ ते १९ डिसेंबर दरम्यान गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे. १९ डिसेंबर रोजी सर्व विद्यालयांतून प्रभात फेर्‍या काढल्या जातील, तर १८ रोजी मुक्तीदिनाच्या पूर्वसंध्येस उच्च माध्यमिक विद्यालयांचे विद्यार्थी रात्री मेणबत्ती मिरवणुका काढतील. १९ रोजी दिल्लीत संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये टी. बी. कुन्हा यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवाची दखल राज्यसभा व लोकसभेत त्या दिवशी घ्यावी, तसेच संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये स्वातंत्र्यसेनानी टी. बी. कुन्हा यांचे तैलचित्र लावावे या मागण्या गोवा सरकारने केंद्र सरकारकडे केल्या होत्या, त्या केंद्राने मान्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. डॉ. टी. बी. कुन्हा यांचे तैलचित्र तयार करून गोवा सरकार ते केंद्र सरकारकडे सुपूर्द करील अशी माहिती कामत यांनी दिली.