बुधवार पेठ व्यापारी संघाच्या चौघांना अटक

0
112

वरचाबाजार-फोंडा येथील बुधवार पेठ मार्केटमध्ये सोमवार दि. २० रोजी रात्री १२ च्या दरम्यान नगरपालिकेची परवानगी न घेता जेसीबी मशिनचा वापर करून मार्केटमध्ये जाणारी वाट मोकळी करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार नगराध्यक्ष डॉ. राधिका नायक यांनी काल सकाळी फोंडा पोलिसात नोंदवली. फोंडा पोलिसांनी या प्रकरणी व्यापारी संघटनेचे माणिकराव मामलेदार नरेंद्र परब, कृष्णा च्यारी व जेसीबीचे चालक उपेंद्र प्रजापती यांना अटक केली.वाट मोकळी करण्यासाठी वापरलेले जीए ०५ बी ५५७० क्रमांकाचे जेसीबी मशीन जप्त केले आहे. नंतर न्यायालयाच्या आदेशान्वये प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर त्यांची सुटका झाली. आरोपींना कडक शासन करावे अशी मागणी पालिकेने केली आहे. पालिकेने काही दिवसांपूर्वी ही वाट रात्रीचीच बंद केली होती व त्यासंबंधी व्यापारी संघटनेने त्याचवेळी पोलिसात तक्रार नोंदवली होती असे व्यापारी संघटनेचे म्हणणे आहे. दोन्ही बाजूने विचार करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.