कैलाश सत्यार्थी व मलाला युसुफजाई मानकरी
बाल हक्क क्षेत्रात कार्यरत असलेले भारताचे कैलाश सत्यार्थी व पाकिस्तानची मलाला युसुफजाई यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ६० वर्षीय सत्यार्थी हे आठवे भारतीय आहेत. त्यांच्यासमवेत हा पुरस्कार विभागून देण्यात आलेली पाकिस्तानची मलाला ही हा पुरस्कार मिळवणारी वयाने सर्वात लहान व्यक्ती ठरली आहे. पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी व महिला हक्कांसाठी प्राणघातक हल्ला सोसलेली मलाला युसुफजाई ही केवळ १७ वर्षांची आहे.
कैलाश सत्यार्थी यांचा जन्म मध्य प्रदेशमधील विदिशा येथे झाला असून ते बचपन बचाव आंदोलनाचे प्रणेते आहेत. त्यांनी तब्बल ८० हजार बाल कामगारांची सुटका करून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे. नोबेल पुरस्कार निवड सिमितीने सत्यार्थी यांच्या या योगदानाबद्दल त्यांची निवड केल्याचे म्हटले आहे.
भारताबरोबरच जगभरातल्या बाल मजुरांची व्यथा जगासमोर मांडण्यासाठी काढण्यात आलेल्या ग्लोबल मार्च अगेंस्ट चाईल्ड लेबरच्या आयोजनातही त्यांचे महत्वाचे योगदान होते.
दरम्यान सत्यार्थी यांनी आपला नोबेल पुरस्कार भारतीय जनतेला अर्पण करीत असल्याचे म्हटले असून पिळवणुकीचे बळी ठरणार्या बालकांसाठी अधिक जोमाने काम करणार असल्याचे स्पष्ट केले.
‘‘ भारतीय उपखंडात शांततेसाठी मलालाच्या साथीने मला काम करायचे आहे. मुलांच्या पिळवणुकीविरोधात मला साथ देण्याचे आवाहन मी तिला करणार आहे ’’
– कैलाश सत्यार्थी