माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची तिसरी पत्नी सुनंदा पुष्कर हिचा मृत्यू विषबाधेमुळेच झाला असा नवा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. या मृत्यू प्रकरणामध्ये काही तरी काळेबेरे आहे या संशयाने त्यामुळे पुन्हा डोके वर काढले आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी सुनंदा पुष्कर मृत्युप्रकरणात खोटा अहवाल देण्यासाठी आपल्यावर दबाव आणला गेला होता असा दावा काही महिन्यांपूर्वी केला होता. आता त्यांच्याच नेतृत्वाखालील वैद्यकीय समितीने आपल्या अहवालामध्ये सुनंदा यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असे उघड केलेले आहे. ‘सुनंदा या खूप आजारी होत्या आणि त्यातून आलेल्या वैफल्यातून त्यांनी आत्महत्या केली’ असे जे चित्र यापूर्वी रंगवले गेले होते, ते सपशेल खोटे आहे हे तर आजवरच्या घडामोडींत स्पष्टच झाले आहे. सुनंदा यांचे ह्रदय, यकृत किंवा मूत्रपिंडाला काहीही झालेले नव्हते असे वैद्यकीय अहवाल सांगत असल्याने त्यांच्या ‘गंभीर आजारातून आलेल्या वैफल्या’चा सिद्धान्त खोटा ठरतो. सुनंदा यांच्या मृत्यूच्या आधल्याच दिवशी पती शशी थरूर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्यातील ट्विटर संदेशांची देवाणघेवाण चव्हाट्यावर आली होती आणि त्या विषयावरून दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली होती ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर या प्रकरणातील संशय वाढतो. पतीशी संबंध बिघडल्याने आयपीएल संघामधील मालकीसंदर्भातील आर्थिक व्यवहारांबाबतची माहिती सुनंदा उघड करण्याची शक्यता होती हा डॉ. सुब्रह्मण्यम स्वामींनी उपस्थित केलेला मुद्दाही दुर्लक्षिता येणार नाही. या सार्या प्रकरणाला सतत मिळत राहिलेली कलाटणी पाहिली, तर सुनंदा मृत्यूप्रकरणाच्या तपासात राजकीय हस्तक्षेप व दबाव होता का असा प्रश्नही उपस्थित होतो. दिल्ली पोलिसांच्या तपासकामासंदर्भात वैद्यकीय मंडळानेही काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. सुनंदा यांचा मृतदेह आढळला, तेव्हा त्यांच्या शरीरावर पंधरा जखमा आढळल्या होत्या. त्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी वास्तविक चौकशी करणे आवश्यक होते, परंतु ती केली गेली नाही. १७ जानेवारीला सुनंदा मृतावस्थेत सापडल्यानंतर हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडून क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आले होते, पण नंतर दोनच दिवसांनी ते पुन्हा दिल्ली पोलिसांकडेच हस्तांतरित करण्यात आले होते. सुनंदा यांच्या मृतदेहाशेजारी अल्प्राक्स या गोळ्यांच्या दोन स्ट्रीप्स सापडल्या व त्यांच्या अतिसेवनातून त्यांचा मृत्यू ओढवला असे आधीच्या वैद्यकीय अहवालात नमूद झाले होते, परंतु नव्या अहवालामध्ये त्या द्रव्याचा अंशही त्यांच्या पोटात सापडला नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे आणि भारतीय प्रयोगशाळांना हुडकता न येणार्या थेलियम, पोलोनियम २१० आदी विषारी घटकांपैकी एखाद्यातून सुनंदा यांचा मृत्यू ओढवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या अंगावरच्या जखमांपैकी दहा क्रमांकाची जखम ही सीरिंज टोचले गेल्याची असल्याचेही हा अहवाल सांगतो. या सार्यातून सुनंदा यांनी आत्महत्या केली की त्यांचा अत्यंत पद्धतशीरपणे काटा काढला गेला असा प्रश्न उपस्थित होतो. शशी थरूर हे गेल्या कॉंग्रेस सरकारमधले एक बडे प्रस्थ होते आणि आता मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी मोदींचे कोडकौतुक करायला सुरूवात केलेली आहे. मोदी हे बदलले आहेत, त्यांची ही २.० आवृत्ती वेगळी आहे अशी आरती थरूर यांनी ओवाळली होती आणि पंतप्रधानांनी आपल्या स्वच्छ भारत अभियानाचे आमंत्रण थरूर यांना देऊन त्याची परतफेडही केली आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर थरूर यांची बदललेली भूमिका विचार करायला लावणारी आहे. सुनंदा ही लेफ्टनंट कर्नल पुष्करनाथ दास या काश्मिरी लष्करी अधिकार्याची कन्या. श्रीनगरच्या दल लेक समोरच्या सेंटॉर हॉटेलमध्ये एकेकाळी स्वागतिका असलेली ही मुलगी आयुष्यातले अनेक चढउतार सहन करीत रॉंदवू स्पोर्टस्वर्ल्डमध्ये सातशे दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्यापर्यंत वर चढली. पण दुर्दैवाने तिची पाठ सोडली नाही. तिचे तिन्ही विवाह अपयशी ठरले. व्यंग असलेले बाळ पदरी आले. दुसर्या नवर्याच्या कर्जबाजारीपणाचे चटके सोसावे लागले, तिसर्या पतीशीही शेवटी बिनसले आणि एका भरकटल्या आयुष्याची दुर्दैवी अखेर झाली. निदान तिच्या मृत्यूचे खरे कारण तरी जगाला कळणार की नाही?