– विजय प्रभू पार्सेकर देसाई, पेडणे
आज विजयादशमी. दुष्टांवर सृष्टांनी मिळविलेल्या विजयाची स्मृती कायम ठेवण्यासाठी नियुक्त केलेला एक दिवस. हा दिवस दसरा म्हणून सर्वांना परिचित आहे. ‘‘विजया दशमी, विजय पावली, विजयी झाली ही वाणी, सीमोल्लंघन करून गाठली परा, परांबा, परत्यनी. प्रसन्न झाली. कृपाकटाक्ष वरदानी.’’ नऊ दिवसांच्या युद्धात दैत्यमणीचा नाश करणार्या श्री देवी भगवतीचे दुसरे नाव विजया. म्हणून विजया दशमी. दुसरा मतप्रवाह आहे की या दिवशी रामाने रावणाचा वध केला. तिसरा मतप्रवाह म्हणजे याच दिवशी पांडवांनी कौरवांना यमसदनी पाठविले, त्याचाच हा विजयोत्सव दिवस म्हणून विजयादशमी. कुठलाही मतप्रवाह विचारात घेतला तरी हा दिवस सुष्टांनी दुष्टांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे हेच खरे.
अपरान्हकाली दशमी असेल तर त्या दिवशी दसरा साजरा करावा असे शास्त्र सांगते. एखाद्या वर्षी नवरात्र आठच दिवसांचे असते. यंदा ते तसे आलेले असल्यामुळे नवव्या दिवशी अपरान्ह काळी विजया दशमी साजरी होणार आहे. साडेतीन मुहूर्तातील हा सर्वोत्कृष्ट मुहूर्त. अपरान्ह काली असल्यास दुधात साखर.
एखाद्या वर्षी नवरात्र दहा दिवसांचे असते. दहा वर्षांपूर्वी तशी घटना घडली होती. तेव्हा विजयादशमी अकराव्या दिवशी आली होती. दशमी दिवशी श्रावण नक्षत्र असेल तो अधिक चांगला योग. त्याला विजय मुहूर्त म्हणतात.
जीवनास अनेक प्रकारच्या मर्यादा पडलेल्या असतात. सीमोल्लंघन म्हणजे अशा मर्यादांचा अडसर दूर करून, अनिष्ट बंधने दूर करणे. आपल्या पराक्रमाला, पौरुषत्वाला अटकाव करणार्या ज्या मर्यादा आणि सीमा आहेत, त्या पार करण्याचे सामर्थ्य द्यावे म्हणून आपण देवीची आज प्रार्थना करतो.
दुसरा असा एक मतप्रवाह आहे की, कृतघ्नतेचे परिमार्जन करू शकेल असे कोणतेही प्रायश्चित्त नाही. आपण कृतज्ञतेचे महत्त्व जाणणार्या सांस्कृतिक परंपरेचे पाईक आहोत. म्हणून मातृदेवतेपासून सृष्टीदेवतेपर्यंत सर्वांची पूजा करतो.
विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक. असा एक मतप्रवाह आहे की, रामाने रावणावर विजय मिळविला तो दिवस हाच. उत्तर भारतात रामलीला याच दिवशी रावणाचा वध करून समाप्त होते. पूर्वी याच दिवशी सरस्वतीपूजन करून मुलांना श्रीगणेशा शिकवित असत.
रावणाची दहा शिरे रामाने हरण केली म्हणून या दिवसाला दशहरा असेही म्हणतात. या दिवशी ग्रंथाचे, पोथ्यांचे, हत्यारांचे, राजचिन्हांचे पूजन करतात.
या दिवशी काही ठिकाणी शमीवृक्षाची पूजा करतात. याच दिवशी अज्ञातवास संपवून पांडवांनी शमी वृक्षाची पूजा करून, शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रे बाहेर काढली आणि शुभ संकल्प सोडला तो आयुष्यभर सन्मार्गाने वाटचाल करण्याचा.
शमी शमयते पापम, शमी लोदिन कण्टकाः
धारिण्यर्जुन बाणानां, रामस्य प्रियवादिनी
अश्यनाक महावृक्ष, महादोष निवारणम
दृष्टांना दर्शन देही, कुरू शत्रु विनाशनम
आपण या दिवशी आपट्याच्या झाडाची पूजा करून त्याच झाडाची पाने लुटतो. वर महावृक्ष म्हणून जो उल्लेख आहे तो याच झाडाचा. मात्र यातून आपणाला काही धडे गिरविण्यास मिळतात. कौत्स देवदत्त पैठणकर, विद्या संपादनार्थ परतंतू ऋषींच्या आश्रम शाळेत दाखल झाला. पोरगा हुषार. मात्र गरीब घरचा, तसाच सद्गुणी. अशी बाळे नेहमीच गरीबांच्या घरी जन्म घेतात. परतंतू आदर्श शिक्षक. श्रीमंताच्या मुलांना खास शिकवणी लावून गरीबांच्या मुलांना हुडूत करणारे आजचे (आदर्श?) गुरूजी नव्हेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर फी द्यावी लागायची. त्याला गुरूदक्षिणा असे भारदस्त नाव होते. परतंतूंनी गुरूदक्षिणा मागितलीच नाही. गरीब घरच्या मुलांकडे गुरुदक्षिणा कशी मागणार? मात्र कौत्स गरीब असला तरी स्वाभिमानी जरूर होता. तो गुरूदक्षिणा देणार म्हणून हट्टालाच पेटून परतंतूंचे दररोज डोके खाऊ लागला. एका क्षणी परतंतू एवढे कातविले की त्यांनी प्रत्येक विद्येचे एक कोटी असे शिकविलेल्या चौदा विद्यांचे चौदा कोटी द्यावेत म्हणून कौत्साला सांगितले. मात्र अट घातली. हे चौदा कोटी एकाच दात्याकडून आणून द्यावेत. एकापेक्षा जास्त दात्याकडून आणल्यास स्वीकारणार नाही.
कौत्स परतंतूचाच शिष्य. तो हार थोडीच मानणार. तो सरळ रघुकुळश्रेष्ठी रघुकडे गेला. रघु महान दानशूर. मात्र यज्ञयाग करून खजिना रिकामा झालेला. ऋषीमुनींनी राजाला आर्थिक संकटात घातले होते. म्हणून काय झाले, राजा आपले गृहछिद्र थोडेच उघडे करणार. राजाने कुबेराकडे कर्ज मागितले. कुबेर इंद्राचा खजिनदार. त्याने विनंती धुडकावून लावली. राजा रघुने सरळ इंद्रावरच स्वारी केली. बिचारा इंद्र पराभूत झाला. त्याने कुबेराला एखाद्या नगरीवर धनवर्षाव करण्याची आज्ञा केली. सुवर्णमुद्रा आपट्याच्या झाडावर पडल्या. राजा रघूने कौत्साला त्या नेण्यास सांगितले. कौत्साने मोजून चौदा कोटीच सुवर्णमुद्रा नेऊन परतंतू ऋषींना दिल्या. कौत्स म्हणजे राजकारणी नव्हे. खा खा खाणारा! राजा रघू म्हणाला,‘एखाद्याला दिलेले दान परत घेणे आपल्या कुळाला शोभादायक नव्हे. शेवटी राजा रघूने प्रजेला आदेश देऊन त्या सुवर्णमुद्रा नेण्यास सांगितले. तो दिवस होता विजयादशमीचा. आपण आजही आपट्याची पाने एक ना एक दिवस सुवर्णमुद्रांत परावर्तीत होतील या आशेवर जगत असतो. आशा नसेल तर जीवन व्यर्थ ठरते.