१६ वर्षानंतर भारताला हॉकीत सुवर्ण; ऑलिंपिक प्रवेश निश्‍चित

0
117

एशियन गेम्स
पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ‘शूट-ऑफ’मध्ये हरवून भारताच्या पुरुष हॉकी संघाने १६ वर्षांनंतर आशियाई मेळा सुवर्ण पदक पटकावले. नियमित वेळेतील १-१ गोलबरोबरीनंतर गतविजेत्या पाकिस्तानवर शूट-आऊटमध्ये ४-२ असा थरारक विजय मिळवित, भारताने गट पातळीवरील पराभवाचा वचपा घेतानाच, २०१६मधील रिओ ऑलिंपिक प्रवेशही निश्‍चित केला.
पुरुष हॉकी संघ, महिला चौकडीला सुवर्ण
पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून भारताच्या पुरुष हॉकी संघाने १६ वर्षांनंतर सुवर्ण पदक पटकावले तर महिलांच्या ४४०० मी. रिले संघानेही शानदार कामगिरीत मिळविलेल्या सुवर्णासह भारताने १७व्या आशियाई मेळ्यात काल एकूण चार पदके जिंकत गुणतक्त्यात नवव्या क्रमावर झेप घेतली.
पुरुष हॉकी संघाने दिवस गाजविताना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर थरारक विजय मिळवित २०१६मधील रियो ऑलिंपिकमधील प्रवेशही निश्‍चित केला.
प्रियंका पनवार, टिंटू लुका, मनदीप कौर आणि एम. आर. पूवाम्मा या चौकडीने महिलांच्या ४४०० मी. सांघिक रिलेचे आशियाई मेळ्यातील विक्रमी वेळेसह सुवर्ण पदक पटकावले.
भारतासाठी बव्हंशी यशस्वी ठरलेल्या या दिवशी मुष्टियोध्दे सतिश कुमार (९१+कि. ग्रॅ.) आणि विकास कृष्णन (७५ कि. ग्रॅ.) यांना कास्य पदकांवर समाधान मानावे लागले.
या चार पदकासह भारताने ५४ (९ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३६ कांस्य) पदकासह आधल्या दिवशीच्या अकरावरून नवव्या क्रमावर झेप घेतली. बलाढ्य चीनने ३२१ पदकांसह श्रेष्ठत्व राखले असून त्यापाठोपाठ द. कोरिया (२११) आणि जपानचा (१८४) क्रम आहे.
भारताने आणखी दोन सुवर्ण पदकांच्या अपेक्षा उंचावताना कबड्डीत पुरुष आणि महिला गटात अंतिम फेरी गाठली आहे.
दिवस गाजविलेल्या भारतीय हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी तथा गतविजेत्या पाकिस्तानवर शूट-आऊटमध्ये ४-२ असा थरारक विजय मिळवित १६ वर्षांनंतर आशियाई मेळ्यातील सुवर्ण पदकाचा दुष्काळ संपुष्टात आणला. या विजयासह भारताने गट पातळीवरील पराभवाचा (१-२) वचपाही घेतला. १९९८मधील बँकॉक एशियाडमध्ये भारताने अखेरचे हॉकी सुवर्ण पदक मिळविले होते.
सेओनहॅक हॉकी स्टेडियमवरील, उपखंडातील दोन तूल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमधील या उत्कंठावर्धक मुकाबल्यात उभय संघानी ६० मिनिटांच्या निर्धारित वेळेतील तोडीसतोड खेळी केली. निर्धारित वेळेतील १-१ अशा गोलबरोबरीअखेर भारताने ‘शूट-आऊट’मध्ये बाजी मारली.
पाकिस्तानने दमदार प्रारंभ करताना तिसर्‍याच मिनिटाला मुहम्मद रिझवानने नोंदलेल्या गोलवर आघाडी घेतली. तथापि, भारताने जोरदार प्रतिहल्ले केले आणि २७व्या मिनिटाला कोथाजित सिंगने बरोबरीचा गोल केला.
उत्तरार्धातही उभय संघानी गोलसाठी जोरदार आक्रमणे केली पण मिळालेल्या बर्‍याच संधी गमावल्याने सामना बरोबरी सुटला आणि ‘शूट-ऑफ’चा अवलंब करणे क्रमप्राप्त ठरले. ‘शूट-आऊट’मध्ये भारतातर्फे आकाशदीप सिंग,रुपिंदरपाल सिंग, बिरेंद्र लाक्रा आणि धरविर सिंग यांनी गोल केले तर मनप्रीत सिंगचा फटका निष्फळ ठरला. भारताच्या विजयात महत्वपूर्ण योगदान देताना गोलरक्षक तथा उपकर्णधार पी. आर. श्रीजेशने शानदार बचावाचे दर्शन घडविताना पाकिस्तानच्या अब्दुल हसीम खान आणि मुहम्मद उमर बट्टाचे फटके अडविले. मुहम्मद वकास आणि शफाकत रसूल यांनी पाकतर्फे गोल केले.
भारताने ऍथलेटिक्समधील वर्चस्व जारी राखताना महिलांच्या ४४०० मीटर्स रिलेत विक्रमी वेळेसह सलग चौथ्यांदा सुवर्ण पदक पटकावले. प्रियंका पनवार, टिंटू लुका, मनदीप कौर आणि एम. आर. पूवाम्मा या चौकडीने ३:२८.६८ या विक्रमी वेळेसह २०१०मधील सुवर्ण पदक विजेत्या भारतीय संघाच्या ३-२९.०२ या वेळेत प्रगती साधली. सीमा पुनियाने महिलांच्या थाळाफेकीत मिळविलेल्या सुवर्ण पदकानंतरचे भातराचे ऍथलेटिक्समधील हे दुसरे सुवर्ण होय. या प्रतियोगितेत जपानने रौप्य (३:३०.८०) आणि चीनने कांस्य (३:३२.०२) पदक मिळविले. २००२मधील बुसान एशियाडपासूनचे भारताचे महिलांच्या ४४०० मी. रिलेमधील हे सलग चौथे सुवर्ण पदक होय.
मुष्टियोध्दे विकास कृष्णन आणि सतिश कुमार उपांत्य फेरीत हार पत्करावी लागल्याने कांस्य पदकांवर संतुष्ट बनावे लागले. गेल्या ग्वांगझू मेळ्यात सुवर्ण पदक जिंकलेल्या विकासला कझाकस्तानच्या विद्यमान विश्‍वविजेत्या झानिबेन अलिमखानुलीकडून २-१ अशी तरी सतिशला कझाकस्तानच्याच इवान डायचकोकडून ३-० अशी हार पत्कावी लागली.