Home बातम्या इफ्फी गोव्यात स्थिरावतोय…

इफ्फी गोव्यात स्थिरावतोय…

0

प्रा. मिलिंद म्हाडगुत

गोव्यातील इफ्फीचे हे आठवे वर्ष. या वर्षापासून इफ्फी काही प्रमाणात पणजीहून मडगावला स्थलांतरित होत आहे. काही प्रमाणात अशाकरिता की यंदा प्रथमच इफ्फीचा उद्घाटन सोहळा मडगावला संपन्न होणार आहे. त्याकरिता मडगावच्या रवींद्र भवनाचा कायापालट केला गेला आहे.

तसे पाहायला गेल्यास गेली दोन वर्षे इफ्फीचे काही चित्रपट मडगावलाही दाखविले जायचे. पण त्याचा विशेष गाजावाजा नसल्यामुळे कोणाला त्याचा पत्ताच लागत नसे. त्यामुळे या चित्रपटांना रसिकांकडून थंडा प्रतिसाद मिळाला होता. पण यंदा मुख्यमंत्र्यांनी स्वतः कंबर कसल्यामुळे प्रथमच मडगावला इफ्फीचे ग्लॅमर प्राप्त झाले आहे, आणि ही खरी तर स्वागतार्ह बाब आहे. गोवा हा छोटा प्रदेश असल्यामुळे इफ्फी केवळ पणजीपुरताच मर्यादित राहता कामा नये. यंदा इफ्फीने मडगावात प्रवेश केला आहे; पुढील वर्षी गोव्याची सांस्कृतिक राजधानी फोंडा येथेही इफ्फीचे चित्रपट दाखवायला हवेत. फोंड्याच्या राजीव गांधी कलामंदिरावरही नवा साज चढत आहे. त्यात इफ्फीत दाखविल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांकरिता लागणार्‍या खास प्रोजेक्शनचीही सोय आहे. त्यामुळे पुढील वर्षी इफ्फीच्या कार्यक्रम पत्रिकेवर फोंड्याचे नाव चमकल्यास आश्‍चर्य वाटायला नको.

पण काही का असेना, हो ना करता करता इफ्फीने गोव्यात आठव्या वर्षात पदार्पण करून दाखवलेच. २००४ साली जेव्हा इफ्फीने गोव्यात प्रवेश केला तेव्हा लोक साशंकता व्यक्त करत होते. इफ्फी गोव्यात टिकेल की नाही याबद्दल तर्क-वितर्क चालू झाले होते. आणि त्यांना कारणेही तशीच होती. गोव्यात म्हणावी तशी चित्रपट-संस्कृती वास करताना दिसत नव्हती. चित्रपटनिर्मितीला पूरक अशी अत्याधुनिक यंत्रसामग्रीही गोव्यात उपलब्ध नाही. गोव्यातील चित्रपटांनाही येथे बाजारपेठ नाही. अशा परिस्थितीत गोव्यात हा आंतरराष्ट्रीय महोत्सव टिकेल की नाही याबद्दल सर्वांनाच शंका वाटत होती. पण विपरीत परिस्थितीवर मात करूनही हा महोत्सव गोव्यात टिकला.

बंगालीबाबू हा महोत्सव कोलकात्यात नेणार अशी मध्यंतरी अफवाही उठली होती. गेल्या वर्षी तर यंदाचे हे इफ्फीचे गोव्यातील शेवटचे वर्ष अशी हूल उठविण्यात आली होती. पण हे सर्व अक्षय खोटे ठरले. याचे श्रेय अर्थातच द्यावे लागते ते मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना. त्यांनी विपरीत परिस्थितीला नियंत्रणात ठेवण्यात यश मिळविले यात शंकाच नाही. गेल्या वर्षी तर काही निर्मात्यांनी इफ्फीमध्ये चालू असलेल्या शॉर्ट फिल्म सेंटरविरुद्ध जोरदार मोर्चेबांधणी केली होती. याचा गोमंतकीय चित्रपटनिर्मात्यांना काहीही फायदा नाही असा ओरडा काही गोमंतकीय निर्मात्यांनीही केला होता. अर्थात हा डाव कोणत्या आधारावर आखला गेला होता हे कळायला मार्ग नाही. शॉर्ट फिल्मे ही काळाची गरज आहे हे नाकारता येणे शक्यच नाही. या शॉर्ट फिल्मद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे लघुपट बघायला मिळतात हेही नाकारण्यात अर्थ नाही.

२००८ साली मी या शॉर्ट फिल्म सेंटरच्या निवड समितीचा ज्युरी पॅनेलचा एक सदस्य होतो. त्यावेळी आम्हाला या शॉर्ट फिल्मद्वारे एवढ्या अफलातून कल्पना साकारताना बघायला मिळाल्या की आम्ही अक्षरशः अवाक् होऊन गेलो. ‘रोड’ या अफगाणिस्तानच्या लघुपटात ‘रोड’ची बदलती रूपे इतक्या प्रभावीपणे चित्रित केली होती की कोणीही थक्क होऊन जावे. आता यात गोमंतकीय निर्मात्यांना वाव नाही असे म्हटले जाते तेही अर्धसत्य आहे. हे सेंटर आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा एक विभाग असल्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे लघुपट निर्माण करणे आवश्यक असते. त्या दृष्टीने गोमंतकीय निर्मात्यांनी तयारी करायला हवी. पण खरे सांगायचे तर या शॉर्ट फिल्म सेंटरमुळे गोव्यात लघुपट निर्मितीचे प्रमाण वाढते आहे. चांगल्या दर्जाचे लघुपट निर्माण व्हायला लागले आहेत.

आता या सेंटरमधून गैरव्यवहार होतो असा जो एक आरोप करण्यात येतो त्याकडे मात्र दुर्लक्ष करता कामा नये. त्याकरिता गेल्या वर्षी या सेंटरवर नियंत्रण ठेवण्याकरिता एक ‘मॉनिटेरिंग कमिटी’ नेमण्यात आली होती. त्यामुळे गैरव्यवहारावर नियंत्रण आले की काय हे मात्र कळायला मार्ग नाही. पण काही का असेना, केवळ गैरव्यवहाराच्या संशयावरून शॉर्ट फिल्म सेंटर नको म्हणणे म्हणजे उंदीर नको म्हणून घर जाळण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे गेल्या सात वर्षांचा आढावा घेतल्यास इफ्फीत गोमंतकीयांना विशेष स्थान नसल्याचे दिसून आले आहे. दोन वर्षांपूर्वी इफ्फीत ‘गोवन पॅनोरमा’ हा खास गोमंतकीय वा गोमंतकात चित्रित केलेल्या चित्रपटांकरिता एक विभाग सुरू करण्यात आला होता. त्याद्वारे काही गोमंतकीय चित्रपटही दाखविण्यात आले होते. पण माशी कोठे शिंकली कोणास ठाऊक! गेल्या वर्षी हा विभाग बंद करण्यात आला. त्याचप्रमाणे २००८ साली गोव्यातील महत्त्वाच्या शहरांत इफ्फीनिमित्त खास कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यांना लोकांकडून प्रतिसादही चांगला लाभला होता. गोमंतकीय कलाकारांनाही आपली कला सादर करण्याची संधी मिळाली होती. पण २००९ साली या कार्यक्रमांना फाटा देण्यात आला. यामुळे गोमंतकीय कलाकार आपली कला सादर करण्यापासून वंचीत राहिले एवढे मात्र खरे.

२००७ साली इफ्फीनिमित्त गावोगावी गोमंतकीय चित्रपट दाखविण्यात आले होते. लोकांनाही यामुळे स्थानिक चित्रपट बघण्याची संधी प्राप्त झाली होती. पण पुढच्या वर्षी स्थानिक चित्रपट दाखविणे बंद करण्यात आले. खरे तर इफ्फीकरिता एक ठोस अशी पॉलिसी असायला हवी. गोवा सरकार जास्त पैसे खर्च करत असल्यामुळे इफ्फीची पॉलिसी तयार करण्याचा अधिकार गोवा सरकारलाच असायला हवा. पण इंडियन प्रिमियर सेक्शनसारखा एखाद दुसरा महत्त्वाचा विभाग सोडल्यास सर्व विभाग इफ्फीच्या केंद्रीय संचनालयाकडे असल्यामुळे गोव्याला दुय्यम भूमिका घ्यावी लागत आहे. यामुळेच इफ्फी गोव्यात होऊनही संपूर्णपणे गोमंतकीयांचा झालेला नाही. या दिवसांत महाविद्यालयांना व विद्यापीठांना सुट्टी नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचा सहभागही अल्प असतो. गोव्यात चित्रपट-संस्कृती रुजवायची असल्यास या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे आवश्यक ठरते. त्यात परत ‘इफ्फी’ हा पणजी वा मडगावपुरताच मर्यादित असल्यामुळे गोव्याच्या इतर भागांतील लोक अलिप्त राहिलेले दिसून येतात.

‘इफ्फी’बद्दल वातावरण निर्मिती करण्याकरिता काही ना काही कार्यक्रम करणे आवश्यक असते. इफ्फीच्या आयोजनाची जबाबदारी असलेली मनोरंजन संस्था याबाबत विशेष जागरूक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ‘इफ्फी’चा जल्लोष संपला की काय असा प्रश्‍न निर्माण होतो. या संस्थेच्या कार्यालयात एक प्रकारची मरगळ दाटल्याचे दिसून येत आहे. काही बाहेरचे निर्माते या इफ्फीला ‘गावरान मेळावा’ असेही हिणवताना दिसतात. त्यातील आयोजनातील त्रुटी बर्‍याच वेळा ठळकपणे लक्षात भरताना दिसतात. याचे प्रमुख कारण म्हणजे, चित्रपटाशी संबंधित नसलेल्या व्यक्तींची या इफ्फीच्या वा मनोरंजन संस्थेच्या समितीवर निवड करणे. बर्‍याच वेळा तर समितीचे लोक वावरताना दिसतच नाहीत. मनोरंजन संस्थेचे कर्मचारीच आयोजनाची जबाबदारी पार पाडताना दिसतात. यामुळेच की काय कोण जाणे, पण गेल्या सात वर्षांत इफ्फीच्या यशाचा आलेख आकुंचित होत गेला आहे.

आठ हजार- नऊ हजार प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे असे सांगितले जाते. पण बर्‍याच वेळा रिकाम्या चित्रपटगृहांनाच चित्रपट दाखविले जातात, असे दिसून येते. कला अकादमीत तर बर्‍याच वेळा हे दृश्य पाहायला मिळते. मग हे नोंदणी केलेले प्रतिनिधी जातात तरी कोठे असा प्रश्‍न उपस्थित होतो. का फक्त प्रेस्टीजकरता म्हणून हे लोक नोंदणी करतात अशीही शंका मनात डोकावून जाते. गेल्या वर्षी तर फक्त आयनॉक्स कोर्टयार्डात तेवढी गर्दी दिसत होती. कला अकादमीच्या परिसरात तर प्रेक्षकांपेक्षा तैनातीला असलेले पोलीसच जास्त दिसत होते. आणखीन एक खटकणारी बाब म्हणजे उद्घाटनाला वा समारोप सोहळ्याला येणारे चित्रपट तारे. गेल्या वर्षी आलेली वहिदा रेहमान काय किंवा मागे आलेला शाहरुख खान काय, ओठांत पुटपुटल्यासारखे काहीतरी दोन शब्द बोलतात व स्थानापन्न होताना दिसतात. २००५ च्या इफ्फीच्या उद्घाटनाला आलेल्या देव आनंदचा अपवाद वगळता हे चित्र सर्रासपणे दिसून आले आहे. त्यामानाने गेल्या वर्षी ममता बॅनर्जींनी केलेले भाषण खरोखरच रोचक होते. म्हणूनच उद्घाटनाला येणारे हे स्टार फक्त ‘बघणेबल’ असल्याचे जाणवायला लागले आहे. पण एवढ्या सार्‍या त्रुटी असूनही इफ्फीबद्दल आत्मीयता वाटायला लागली आहे. भविष्यात इफ्फी नवे वळण घेईल अशीही आशा वाटू लागली आहे. इफ्फीमुळे एरव्ही कधीही बघायला न मिळणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट बघायला मिळतात याकडेही दुर्लक्ष करता येत नाही. मात्र भविष्यात गोवा सरकारने इफ्फीची सूत्रे आपल्या हातात घ्यायला हवीत. त्याकरिता योग्य नियोजन करायला हवे. योग्य व्यक्तींची समितीवर नेमणूक करायला हवी. गोमंतकीय कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधीही द्यायला हवी. इफ्फी गोव्यात स्थिरावत चालला आहे, गोमंतकीय जीवनाचा अविभाज्य भाग बनायला लागला आहे यात शंकाच नाही. म्हणूनच त्यात आता व्यावसायिकता आणायला हवी. या आठव्या इफ्फीचे स्वागत करतानाच भविष्यात हा इफ्फी लोकाभिमुख होईल अशी आशा बाळगूया. दुनिया ही आशेवरच जगत असते हेच शेवटी खरे नाही का?