संरक्षण सहकार्यास बळकटी; आर्थिक भागिदारीचा विस्तार

0
129
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेतील वंशभेद विरोधी लढ्याचे नेते मार्टिन लुथर किंग यांच्या स्मृतीस्थळास भेट देऊन आदरांजली वाहिली.

भारत अमेरिका शिखर परिषदेत चर्चा
भारत व अमेरिकेदरम्यान, दहशतवादविरोधी कारवाया तसेच संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत तसेच व्यापार व आर्थिक भागिदारी अधिक विस्तारण्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यात चर्चा झाली.
जागतिक व्यापारात सुधार तसेच भारताच्या अन्न अनुदानाबाबतच्या चिंता मोदींनी ओबामांकडे व्यक्त केल्या. दोन्ही नेत्यांनी नागरी अणू ऊर्जा करार पुढे नेण्याबाबत व त्यासंबंधी समस्यांवर तोडगा काढण्याबाबत निर्धार व्यक्त केला.
भारतीय कंपन्यांना अमेरिकी बाजारपेठ देण्यासाठी ओबामा प्रशासनाने पावले उचलण्याची मागणी मोदींनी केली. भारताच्या आर्थिक विकासात अमेरिकेने सहभागी व्हावे अशी इच्छा असल्याचे मोदी म्हणाले. भारतात संरक्षणविषयक उत्पादनात सहभागी होण्याचे निमंत्रणही मोदींनी अमेरिकेला दिले. हवामान बदलाच्या संकटाशी मुकाबला सहकार्याने करण्याचा निर्धारही दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. मोदींच्या अमेरिका भेटीचा काल शेवटचा दिवस होता.
संरक्षण कराराच्या नूतनीकरणावर मतैक्य
भारत – अमेरिके दरम्यानचा संरक्षणविषयक कराराचा कालावधी आणखी दहा वर्षांसाठी वाढविण्यावर दोन्ही देशांनी काल तत्त्वत: मान्यता दर्शविली.
नवी दिल्ली तसेच पेंटागॉन येथील सूत्रांनी कराराच्या नूतनीकरणाबाबत दुजोरा दिला. दरम्यान, वाटाघाटी चालू असून अंतिम मसूद्यावर अजून एकमत झाले नसल्याचे कळते. कराराचा कालावधी पुढील वर्षी संपत आहे. या करारावर २००५ साली तत्कालीन संरक्षण मंत्री प्रणव मुखर्जी व अमेरिकेचे संरक्षण सचिव डोनाल्ड रामस्फिल्ड यांनी स्वाक्षणी केली होती. दरम्यान, काल अमेरिकी संरक्षण सचिव चुक हेगेल यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन संरक्षण क्षेत्रात सहकार्य तसेच दहशतवादाचा बिमोड करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. सुरक्षा संवाद, सेवास्तरीय विनिमय, संरक्षण कवायती, संरक्षण व्यापार, तंत्रज्ञान सहयोग अशा अनेक मुद्द्यांचा तत्कालीन करारात समावेश होता. गेल्या दहा वर्षांत अमेरिकेने भारताला सुमारे ६० हजार कोटी रुपयांची सुरक्षाविषयक उपकरणे विकली आहेत. मात्र यात कुठेच सहउत्पादन,सहविकास तसेच तंत्रज्ञान हस्तांतर घडलेले नाही. भारताने संरक्षण क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक २६ टक्क्यांवरून ४९ टक्क्यांवर नेली आहे. भारत ७० टक्के सुरक्षाविषयक गरजांची आयात करतो. गेल्या काही काळापासून अमेरिका भारताबरोबर २० हजार कोटी रुपयांचा संरक्षण सौदा करू पाहत असून यात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स व क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.