Home बातम्या तालक यांचे चित्रपट स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीवर

तालक यांचे चित्रपट स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीवर

0

राष्ट्रीय पुरस्कार विजेते कोकणी चित्रपट दिग्दर्शक राजेंद्र तालक यांच्या चार चित्रपटांचा महोत्सव करण्याचा निर्णय प्रुडंट मिडियाने घेतला असून ११ डिसेंबर ते १ एप्रिल या दरम्यान दर रविवारी चित्रपटाचे दोन खेळ प्रुडंटवरून दाखवण्यात येणार असल्याचे काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रुडंट मिडियाच्या सरव्यवस्थापक सोनिया कुंकळ्येकर यांनी सांगितले. यासंबंधी राजेंद्र तालक यांच्याबरोबर समझोता करार करण्यात आला असल्याचे त्या म्हणाल्या.

११ डिसेंबरपासून १ एप्रिलपर्यंत (१६ रविवारी) राजेंद्र तालक दिग्दर्शित ‘आलिशा’, ‘अंतर्नाद’, ‘सावरिया डॉट कॉम’ व ‘ओ मारिया’ हे चार चित्रपट दाखवण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. दर रविवारी सकाळी १०.३० वा. पहिला व नंतर संध्याकाळी ५.३० वा. दुसरा खेळ दाखवण्यात येणार आहे. वरील काळात सर्व चारही चित्रपट आठ वेळा दाखवण्यात येणार आहेत.

सर्वप्रथम ११ डिसेंबर रोजी ‘ओ मारिया’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. १८ डिसेंबर रोजी ‘आलिशा’, २५ डिसेंबर रोजी पुन्हा ‘ओ मारिया’, १ जानेवारी रोजी ‘सावरिया डॉट कॉम’, ८ जानेवारी रोजी ‘अंतर्नाद’, १५ जानेवारी रोजी ‘आलिशा’, २२ जानेवारी रोजी ‘ओ मारिया’, २९ जानेवारी रोजी ‘सावरिया डॉट कॉम’, ५ फेब्रुवारी रोजी ‘अंतर्नाद’, २२ फेब्रुवारी रोजी ‘आलिशा’, २६ फेब्रुवारी रोजी ‘सावरिया डॉट कॉम’, ४ मार्च रोजी ‘ओ मारिया’, ११ मार्च रोजी ‘अंतर्नाद’, १८ मार्च रोजी ‘आलिशा’, २५ मार्च रोजी ‘सावरिया डॉट कॉम’ व १ एप्रिल रोजी ‘अंतर्नाद’ असे चित्रपट आलटून पालटून दाखवण्यात येणार असल्याचे सोनिया कुंकळ्येकर म्हणाल्या. यावेळी बोलताना प्रुडंट मिडियाचे मुख्य संपादक संदेश प्रभुदेसाई यांनी सांगितले की, अशा प्रकारे कोकणी चित्रपटांचा एखाद्या वाहिनीवर महोत्सव होण्याची ही पहलीच घटना ठरणार आहे. या महोत्सवामुळे गोव्यातील लाखो लोकांना कोकणी चित्रपट पाहण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे ते म्हणाले. प्रुडंटवरून अंदाजे ८ ते ९ लाख लोक वरील चित्रपट पाहतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना वरील चित्रपटांचे दिग्दर्शक राजेंद्र तालक यांनी या महोत्सवाबद्दल आनंद व्यक्त केला. या महोत्सवामुळे गोव्यातील जनतेत कोकणी चित्रपटांविषयी जागृती होण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले. आपला ‘ओ मारिया’ हा चित्रपट ६० हजार लोकांनी थिएटरमध्ये जाऊन बघितला. आता प्रुडंटवरून आपले सगळेच चित्रपट लाखो लोकांना पाहता येणार असल्याचे ते म्हणाले. ही एक चांगली सुरुवात असून भविष्यात गोव्यातील अन्य निर्माता-दिग्दर्शकांनाही प्रुडंटवरून आपले चित्रपट दाखवण्याची संधी प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले. तालक यांच्या चित्रपटांचे निर्माते व एम. बी. क्रिएशन्सचे मालक भालचंद्र बखले हेही यावेळी हजर होते.

सर्वप्रथम ‘ओ मारिया’ या चित्रपटात नायकाची भूमिका केलेला कलाकार कॅविन डिमेलो याचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. ‘ओ मारिया’ चित्रपटात भूमिका केलेल्या अभिनेत्री मिनाक्षी मार्टिन्स, विनोदी अभिनेता जॉन डिसिल्वा, संजय तलवडकर, प्रुडंटचे वृत्तसंपादक व ‘ओ मारिया’ चित्रपटात वृत्तनिवेदकाची भूमिका केलेले प्रमोद आचार्य आदी मंडळीही यावेळी हजर होती.