– सौ. संगीता प्र. वझे, बोरी – फोंडा
कामधेनू म्हणजेच आज प्रत्येक रस्त्यावर दिसणारी, ट्रॅफिक जॅम करणारी आणि म्हणूनच लोकांच्या शिव्या – शाप खाणारी गाय. तिची आजची परिस्थिती पाहता तिला कुणी ‘कामधेनू’ म्हणेल काय? पण ते सत्य आहे. ती समुद्रमंथनातून बाहेर आलेली, जमदग्नीच्या आश्रमात आलेल्या सहस्त्रार्जुनाच्या सैन्याला स्वतःच्या देहातून असंख्य सैन्य निर्माण करून सळो की पळो करून सोडणारी, उदरात तेहतीस कोटी देवांचा वास असलेली आणि म्हणूनच सर्वांना पूजनीय अशी गोमाता. पण अशा या गोमातेला स्वतःच्या हक्काचा गोठाही लाभू नये, त्यांना भटकी बनवावे? त्यांच्यावर एवढे अत्याचार होत आहेत, कत्तली केल्या जात आहेत.
भटक्या गुरांचा प्रश्न मार्गी का लागत नाही? आतापर्यंत कितीतरी बातम्या आपण या संदर्भात वाचल्या. गोप्रेमींनी ठिकठिकाणी जाहीर सभा घेतल्या. विधानसभेतही हा प्रश्न खूप गाजला. पण कसले काय, ठोस उपाय कुणालाच नाही करता आलेला! जिथे बघावे तिथे रस्ताभर गुरे. थंडीत असो किंवा पावसाळ्यात कुणाच्या दुकानासमोर, बसस्टँडसमोर, पार्किंगमध्ये खरेच या गोमातेच्या पुनर्वसनाचा प्रश्न एवढा जटिल आहे का की सुटता सुटू नये?
मुळातच भटक्या गुरांचा प्रश्न सोडवताना इतिहास लक्षात घेतला पाहिजे. मुळाच या गायी कुठल्या आणि त्या रस्त्यावर कशा पोचल्या ते बघूया! गोव्याचे जुने नाव ‘गोग्राम’ म्हणजेच गुरांचा प्रदेश असे मानतात. कधी काळी या गोव्यात गोपालन हा प्रमुख व्यवसाय होता. प्रत्येक घरात गोठाभर गुरे, भरपूर दूध – दुभते हिरवीगार माळराने, गुरांना रोज माळरानावर सोडायचे आणि आणायचे याची व्यवस्था केलेली असायची. खायला भरपूर चारा असल्यामुळे गोमाताही खूष आणि भरपूर दुध मिळाल्याने गोपाळही खूष! असे सुखकर होते. पण परिस्थिती हळूहळू बदलत गेली. बदल हा प्रकृतीचा नियम आहे. पण प्रत्येक बदलाला चांगली आणि वाईट बाजू असतेच. आज ती गोठाभर गुरेही नाहीत आणि त्यांच्यावर प्रेम करणारे गोपाळही नाहीत.
परिस्थिती बदलायला अनेक कारणे आहेत. आज विभक्त कुटुंब पद्धतीप्रमाणे एक व्यक्ती एक घर/फ्लॅट असे झालेय. त्यामुळे भराभर जिथे जागा मिळेल तिथे इमारती उभारल्या गेल्या. त्यामुळे गुरांना चरायला असलेली माळराने, मोकळ्या जागा नष्ट झाल्या. गुटगुटीत दिसणारी गोमाता पोटभर चारा न मिळाल्याने दूध कमी देऊ लागली. दिवसभर गोठ्यात बांधून ठेवणेही आजच्या महागाईच्या काळात शक्य नाही. म्हणूनच गोठ्यातली गोमाता रस्त्यावर दिसू लागली.
दुसरे कारण आज प्रत्येक व्यक्ती सुशिक्षित झाल्याने दुग्धव्यवसाय करणे किंवा गुरांची कामे करायला तरूण पिढीला लाज वाटते. उच्च शिक्षणाचा एक परिणाम असा आहे की चांगल्या कामाची लाज वाटते. अन्य कारणे म्हणजे गावठी गाईच्या दुधाचा दर आणि तिच्या पालन – पोषणाचा खर्च याचा ताळमेळ बसत नाही. म्हणूनच भरपूर दूध देणार्या जर्सी गाई व्यवसायासाठी आणल्या जातात. या गाईंना दूध देणारे यंत्रच म्हणू. गावठी गाईंच्या दुधाची तुलना या दुधाशी कधीही होऊ शकत नाही. गावठी गाईच्या दुधात सर्व प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. गावठी गाईच्या तुपाला तर आयुर्वेदात ‘अमृत’ म्हटलेले आहे. या गाईचे दूध तूप, दही, लोणी हे सर्व काही शास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण मानलेले आहे. पिशव्यांमधील दूध हे माणसांच्या आरोग्यास हितकारक नाही.
आज आपण रोज पाहतो, कुठेतरी एक जनावर रस्त्याच्या कडेला मेलेले दिसते. ते तिथेच सडून दुर्गंधी आली तरी स्थानिक पंचायत किंवा अधिकार याकडे लक्ष देत नाहीत. बरे, म्हणून या भटक्या गुरांना रस्त्यावर पडून मरण्यापेक्षा कोंडवाड्यात डांबणे कितपत योग्य आहे? आणि प्रत्येक वेळी गोहत्या किंवा गुरांवरील अत्याचारांबद्दल इतर धर्मियांवर आरोप करणार्या हिंदुत्ववाद्यांनी गोमातेसाठी काय केलेय? खरेच ही समस्या एवढी गंभीर का बनली आहे?
आज गोवा हे पर्यटनासाठी प्रसिद्ध होत असताना येथे ही भटकी जनावरे शोभतात का? खरेतर हा प्रश्न सहज सोडवला जाऊ शकतो. पणजीला झालेल्या एका जाहीर सभेला मी एक गोप्रेमी म्हणून गेले. तेथे बर्याच संस्था उपस्थित होत्या. त्यांनी सुचविलेल्या आणि मला पटलेल्या मुद्द्यांपैकी काही मी येथे लिहीत आहे –
१) गावठी गायीच्या दुधाचा दर वाढवावा, जेणेकरून तिचे पालनपोषण सुसह्य होईल.
२) गोपालनासाठी अनुदान लागू करावे.
३) गोव्यातील श्रीमंत देवस्थानांच्या तसेच वन खात्याच्या पडीक जमीनी आहेत, जेथे या जनावरांची सोय होऊ शकते.
४) गर्भश्रीमंत कुटुंबे किंवा मोठमोठ्या संस्था आपल्या ऐपतीप्रमाणे या गाईंना दत्तक घेऊ शकतात.
५) महागाईच्या काळात फक्त आवड म्हणून आजही गोव्यात गुरे पाळली जातात. या भटक्या गाई अशा गोपाळांना देऊन त्यांना गोठा बांधून देणे किंवा योग्य ती मदत करणे.
६) प्रत्येक घरातील ओला कचरा वेगळा करून तो गुरांना द्यावा किंवा गोपाळांनी गाई सोडून न देता प्रत्येक घरासमोर फिरवाव्यात म्हणजे त्यांच्यावर कचरापेट्या साफ करण्याची पाळी येणार नाही.
७) गोव्यातील सर्व गोप्रेमी संस्थांनाही सरकारने योग्य ती मदत करावी. गोप्रेमींनी घरोघरी प्रचार करून गावठी गाईचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे महत्त्व सर्वांना सांगावे.
८) मोठ मोठ्या बागायतदारांशी संपर्क साधल्यास ते आपल्या कुळागारातील चारा, गवत पुरवू शकतात.
आपल्या वेदात लिहिलेलेच आहे की, गोमातेची कुठलीही सेवा केल्याने पितरांचा उद्धार होतो, मुक्ती मिळते. चला तर मग सर्व गोप्रेमी, प्रत्येक गोमंतकीय एकत्र येऊन आपल्या पूर्वजांच्या उद्धाराबरोबरच भटक्या गोमातेला तिच्या हक्काचे घर मिळवून देऊया, गोसेवा-राष्ट्रसेवा!