काश्मीर पूरग्रस्तांना मदतीसाठी कॉंग्रेसची समिती

0
92

जम्मू आणि काश्मीरमधील पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा करण्यासाठी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने शंभू भाऊ बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली असल्याचे कॉंग्रेस प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
ही समिती मदत निधी गोळा करून ऑक्टोबर महिन्यात सदर निधी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीकडे सुपूर्द करणार असल्याचे ते म्हणाले. मदत निधी गोळा करण्यासाठीची एकूण रूपरेषा ठरवण्यासाठी सदर समितीची येत्या एक-दोन दिवसांत बैठक होणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. उल्हास परब, आर्थुर सिक्वेरा, आल्तिनो गोम्स व दुर्गादास कामत हे या समितीचे अन्य सदस्य आहेत. माजी राज्यसभा खासदार जॉन फर्नांडिस हे मदत निधीसाठी सप्टेंबर महिन्याचे आपले पेन्शन देणार आहेत. ३०५०० रु. एवढे हे पेन्शन आहे. विरोधी पक्ष नेते प्रतापसिंह राणे यांनीही आपले एक महिन्याचे वेतन देण्याची घोषणा केली असल्याचे ते म्हणाले.
अवकाश वैज्ञानिकांचे अभिनंदन
दरम्यान, भारतीय वैज्ञानिकानी मंगळ मोहीम यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचा ठरावही प्रदेश कॉंग्रेस समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे कामत म्हणाले. मंगलयान प्रकल्पाला ३ ऑगस्ट २०१२ रोजी केंद्रात असलेल्या तत्कालीन कॉंग्रेस सरकारने मंजुरी दिली होती, असे कामत म्हणाले.