‘फ्रेंड’ नावाची ‘शिप’

0
174

– ममता दीपक वेर्लेकर, द्वितीय वर्ष – कला, सेंट झेवियर्स कॉलेज, म्हापसा

मैत्रीचे नाते हे काही आपल्यासाठी नवीन नाही. यार, दोस्त, फ्रेंड, बडी ही याच नात्याची दुसरी नावे. पण, बदलत्या काळात हे नाते बदलले, त्याचे स्वरूप बदलले आणि त्याचबरोबर हे नाते निभावण्याची पद्धतही बदलली.

पण, मैत्रीबद्दलची आमची व्याख्या काय? तर मैत्री म्हणजे, ‘माझी एक मैत्रीण असते. ती माझ्याबरोबर घरी येते. आम्ही बसची तिकिट शेअर करतो. एकमेकींचे नोट्‌स झेरॉक्स करतो. ती माझं सगळं ऐकते. (कोणच कुणाचे ऐकत नाही!), ती माझं सिक्रेट जपते (अख्ख्या कॉलेजला ठाऊक असलेलं सिक्रेट!) त्याचबरोबर माझे इतरही फ्रेंड्‌स असतात – फेसबूक फ्रेंड, हाय-हॅलो फ्रेंड आणि जमलंच तर बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड.’ हा काही कल्पनाविलास नाही, तर मी स्वत: ३ जुलैच्या दिवशी टी. व्ही. वर पाहिलेल्या इंटरव्हिव्ह मधली सत्य परिस्थिती आहे. ही मैत्री नाही, स्वत:ची केलेली निव्वळ फसवणूक आहे.
‘फ्रेंड’ नावाच्या या ‘शिप’चा मॉडेल जरी बदलला तरी त्याला तेच जुने इंधन घालावे लागते – प्रेम, विश्‍वास आणि स्वातंत्र्याचे! त्यासाठी आधी स्वत:च्या मनाशी गट्टी जमविण्याची कला आत्मसात करायला हवी. स्वत:वर प्रेम, स्वत:वर विश्‍वास आणि स्वत:चे स्वातंत्र्य जोपासण्यास शिकल्यावर आपण दुसर्‍यांनाही ते सहज देऊ शकू.
‘फ्रेंड’ नावाच्या या ‘शिप’मध्ये केवळ आपल्याच वयाची मंडळी असावी असही नाही तर यात आपली आई, आपले बाबा, आपली भावंडं, आपले गुरुजन, सगळीजणं यात प्रवास करू शकतात. या मैत्रीची मंजिल जरी ठरवता येत नसली तरी, संसारात प्रवास करणार्‍या मुशाफिराला ती जन्मांतरीची साथ असते.
‘‘आपल्याला तीच माणसे आवडतात, ज्यांना ते आवडतं, जे आपल्याला आवडतं.’’ हे जरी खरं असलं तरी आपण अनेकदा आपल्याला न आवडणार्‍या गोष्टींचाही स्वीकार करायला हवा. याचा अर्थ असा नव्हे की, हे माझ्या फ्रेंडला आवडतं म्हणून मी केलं. स्वत:च्या आवडीला जोपासत एकमेकांच्या आवडीची केलेली कदर म्हणजेच मैत्री. सुखात साथ नसली तरी दु:खाच्या काळी मदतीला धावणे म्हणजे मैत्री. सगळा दिवस दमून घरी आल्यावर आपल्या ‘डॉगीने’ मारलेली उडी… ही पण मैत्रीच. स्वत:च्या मनात ज्ञानाची भर घालण्यासाठी पुस्तकांशी जोडलेले नाते, ही पण मैत्रीच. निसर्गाच्या हिरवळीत तल्लीन होणे ही पण मैत्रीच, प्रार्थनेतून देवाशी जुळणे – ही पण मैत्रीच. मैत्री हे काही अलग वेगळे नाते नाही. प्रत्येक नात्याचा पाया म्हणजेच मैत्री.
परंतु अपेक्षा आणि गैरसमज म्हणजे मैत्रीचा अंत. अविकारी मैत्रीत या शत्रूंसाठी जागा नसते. या विकारांपासून मुक्त मैत्रीच टिकून राहते.
थोर तत्वचिंतक सोक्रेटिसला त्याचा शेजारी म्हणाला, ‘‘तुमच्या मित्राबद्दल मी काय ऐकले ते तुम्हांला माहित आहे का?’’
सोक्रेटिस म्हणाला, ‘‘फक्त एकच मिनिट मला माझ्या मित्राबद्दल काही सांगण्यापूर्वी तू माझ्या तिहेरी चाळणीच्या परीक्षेत उत्तीर्ण हो!’’
सोक्रेटिस म्हणाला, ‘‘पहिली चाळणी सत्याची. तू मला माझ्या मित्राबद्दल जे सांगणार आहेस, ते सत्य आहे का?’’
शेजारी म्हणाला, ‘‘नाही. कारण ही गोष्ट मी ऐकलेली आहे.’’
सोक्रेटिस, ‘‘ठिक. दुसरी चाळणी – तू मला जे सांगणार आहेस ते चांगले आहे का?’’
शेजारी – ‘‘नाही. उलट.’’
सोक्रेटिस – ‘‘ठिक. तिसर्‍या चाळणीत तू उत्तीर्ण झालास तरी चालेल. तू माझ्या मित्राबद्दल जे सांगणार आहेस ते आपल्या दृष्टीने उपयुक्त आहे का?’’
शेजारी – ‘‘नाही… अ… खरं तर… म्हणजे…’’
सोक्रेटिस म्हणाला – ‘‘तू जे सांगणार आहेस ते खरं नाही, चांगलं नाही, व उपयुक्तही नाही, तर तू मला ते का सांगतो आहेस.’’
हां… मस्त आणि सरळ सोपा उपाय – गैरसमजापासून वाचण्याचा – ही तिहेरी चाळणी नक्की करून पहा.
तर… विश्‍वाच्या, जिव्हाळ्याच्या आणि स्वातंत्र्याच्या समुद्रात तरंगणार्‍या ‘शिप’च्या वाटेत, अडचणींच्या, स्वार्थाच्या आणि गैरसमजाच्या अनेक लाटा येतील. त्यांपासून वाचण्यासाठी ‘शिप’ची बांधणी मजबूत करायला हवी… जेणेकरून कठीण परिस्थितीच्या वादळाला सामोरे जाण्यास ती सक्षम ठरेल. शेवटी – मरणापूर्वी आपल्याला एकच खंत लागून राहिल – ‘‘मी माझ्या जीवनात किती मित्र तोडले… आणि अखेर किती मित्र जोडले?’’
………….