महाराष्ट्रात प्रचारासाठी भाजपला वाघांची आठवण

0
99

विधानसभा प्रचारात वाजणार विष्णू वाघरचित गाणी
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका १५ ऑक्टोबर रोजी जाहीर झाल्या असून महाराष्ट्र प्रदेश भाजपतर्फे प्रचाराची रणनीती सध्या आखली जात आहे. प्रचाराची सूत्रे सांभाळणारे महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी गोव्याचे आमदार, साहित्यिक तथा प्रभावी वक्ते विष्णू सुर्या वाघ यांना पक्षाच्या प्रचारकार्यात महत्वाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आहे. श्री. वाघ यांनी ही विनंती मान्य केली असून भाजपच्या प्रचाराची गाणीही लिहून दिली आहेत.
लोकसभेला औंदा झाला
असा चमत्कार
हाताला पाडून दिल्लीत आलं
मोदी सरकार…
सबंध देशात घडलं जोशात
हितंबी घडंल रं
मराठी मातीत यावेळी नक्कीच
कमळ फुलेल रं…
हे श्री. वाघ यांनी लिहिलेलं प्रचारगीत ध्वनीमुद्रित करण्याचं काम मुंबईच्या स्टुडिओत सध्या चालू आहे. गणेश चतुर्थीनंतर महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि येत्या दिवाळीपूर्वी नवीन सरकार स्थापन होणार आहे तो संदर्भ घेऊन-
पहाट होईल अंधार जाईल
दिवाळी येईल गं
हाताला सारून घड्याळ फेकून
कमळ फुलेल गं
अशी कॅचलाईन वाघांनी दिली आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर इत्यादी महानगरात भाजपला असलेला उत्तर भारतीयांचा जनाधार लक्षात घेऊन वाघ यांनी काही हिंदी गीतांचाही अंतर्भाव प्रचाराच्या सीडींत केला आहे.
भ्रष्टाचार की जडें मिटाओ
निर्धार यही अब करना है
महाराष्ट्र मे फिरसे यारों
बीजेपी को लाना हैं
हे गीत लोकप्रिय होईल असा विश्‍वास श्री. वाघ यांनी व्यक्त केला आहे. कोकणपट्टीतील विधानसभा मतदारसंघात प्रचार करण्यासाठी  ‘झिला रे कोंकणातल्या झिला रे- विकास तुजो करूंक आता भाजपा इलां रे’  हे गीत श्री. वाघ यांनी लिहिले आहे. त्याचप्रमाणे काही प्रसिध्द हिंदी व मराठी गाण्यांचीही पॅरडी तयार केली असून तिला चांगला प्रतिसाद मिळेल, असे श्री. वाघ यांनी सांगितले. कणकवलीचे विद्यमान आमदार प्रमोद जठार यांच्यासाठीही वाघांनी प्रचारगीते लिहिली असून त्याव्यतिरिक्त ते जठार यांच्यासाठी प्रचारसभाही घेणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे, पंकजा मुंडे, देवेंद्र फडणीस यांच्या मतदारसंघातही प्रचाराला जाणार असल्याचे श्री. वाघ म्हणाले.