गोवा पर्यटन विकास महामंडळाला (जीटीडीसी) २०१३-१४ या आर्थिक वर्षी ५३ लाख ९२ हजार रु. एवढा नफा झाल्याची माहिती महामंडळाचे चेअरमन आमदार नीलेश काब्राल यांनी काल दिली. महामंडळाने व्यावसायिक तत्त्वावर काम केल्यानेच हा नफा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अविकसित क्षेत्रात असलेल्या वागातोर, हणजूण, बागा आदी ठिकाणच्या महामंडळाच्या रेसिडन्सीमध्ये पर्यटकांची संख्या वाढवण्यावर महामंडळाने भर दिल्यानंतर तेथे पर्यटकांची वाढलेली संख्या तसेच एक खिडकी योजनेमुळे जलसफरीसाठीच्या व्यवस्थापनात झालेल्या सुधारणामुळे महामंडळाचे उत्पन्न वाढल्याने महामंडळाला हा नफा झाला. आता अविकसित क्षेत्रात असलेल्या पाळोळे, बाणावली येथील रेसिडन्सींचा विकास केला जात असून त्यामुळे पुढील काळात महामंडळाचा नफा वाढण्याची शक्यता काब्राल यांनी व्यक्त केली.
झालेल्या नफ्यामुळे महामंडळाचा हुरूप वाढलेला असून या पार्श्वभूमीवर महामंडळाने डिचोली तालुक्यातील मये तलाव तसेच गोव्यातील अंतर्गत भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी त्या भागांत निवासी व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे काब्राल यांनी स्पष्ट केले.