– ऍड. सतीश सोनक
पृथ्वी, जल, हवा, अग्नी आणि अंतराळ या पंचमहाभूतांना वैदिक काळात देवासमान मानले जायचे. अरण्ये, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी या नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे हे प्रत्येक नागरिकाचे मुलभूत कर्तव्य असल्याचे भारताच्या संविधानात ठळक अक्षरात नमूद आहे. पण लक्षात कोण घेतो? ‘‘वो सब पुरानी बाते है’’ असं उघड उघड बोलणारे आज सर्वत्र आणि सिंहासनावरही आहेत. त्यामुळे हल्ली पर्यावरणप्रेमींना ‘विकासविरोधी’ ठरवून मुर्खात काढण्याचा प्रघात राजमान्य झाला आहे. या पार्श्वभूमीवर गोवा पर्यावरण चित्रपट महोत्सवाचे आयोजन हे एक प्रकारचे धाडस व प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न आहे. ‘कलाकृती’ या बिगर सरकारी संस्थेने विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवस चालणार्या या महोत्सवाचे आयोजन करणे हा एक अभिनव प्रयोग आहे. कारण वेगवेगळ्या संस्थांची नेहमी एकमेकांकडे फटकून वागण्याची प्रवृत्ती असते. स्वार्थ झटकून एकजुट करता येते हे या प्रयोगातून सिद्ध झाले. हा आदर्श इतरांनी गिरवला तर गोव्याला निश्चितच ‘अच्छे दिन’ येतील आणि तेही लवकरच येतील.
या महोत्सवातील दुसरी महत्त्वाची नवलाई म्हणजे या उपक्रमाकडे गोवा शासनाने व पणजी महानगरपालिकेने संशयाच्या दृष्टीने न पाहता सहकार्य व सहभाग देण्याच्या दिशेने पाऊल उचलले. ही फार मोलाची गोष्ट घडली. सहसा असे घडत नाही; कारण, पर्यावरणप्रेमी म्हणजे कामधंदा नसणारे ब्लॅकमेलर अशी खोडसाळ प्रतिमा निर्माण करण्यात अनेक पर्यावरणाच्या हितशत्रू धंदेवाईकांचे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या राजकारण्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. पर्यावरणप्रेमी संविधानाने सांगितलेल्या कर्तव्याचे पालन करतात हे त्यांचे सत्य रूप जोपर्यंत समाजापुढे मांडले जात नाही तोपर्यंत हेतुपुरस्सर तयार केलेल्या भ्रामक प्रतिमांची पिछेहाट होत नाही. खर्या प्रतिमेचा प्रचार करण्यासाठी आजच्या चित्रपटवेड्या युगात चित्रपटाच्या पडद्यासारखे दुसरे उत्कृष्ट व्यासपीठ नाही.
यंदाच्या महोत्सवात, एका चित्रपटातून सत्य सामोरे येईल की पर्यावरण रक्षणासाठी अनेक पर्यावरणप्रेमींनी आपल्या प्राणाची बाजी लावून वेळ प्रसंगी जीवदेखील गमविला आहे. हे लोक खरेखुरे आयडॉल्स आहेत. या महोत्सवामुळे बदनामीकारण गैरसमजूतींच्या निरगाठी उकलल्या जाऊन पर्यावरणाभोवती आवळलेल्या गळफासाची दोरी थोडी सैल होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
कला संस्कृती संचालनालयाचे प्रसाद लोलयेकर, सेंट्रल लायब्ररीचे कार्लुस फर्नांडिस, मानसी बांदोडकर, विनोद परब, दिनेश एकावडे, बेन्टो वाझ, सुलक्षा आणि शिवदास धारगळकर यांनी घेतलेल्या स्वयंस्फूर्त पुढाकारामुळेच कार्यक्रम स्थळी पर्यावरणविषयक पुस्तकांचे व चित्रफीतींचे प्रदर्शन आयोजित करणे शक्य झाले. पर्यावरण विषयक असे हे गोव्यातील पहिलेच प्रदर्शन. पर्यावरण चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी याची कृतज्ञतापूर्वक दखल घ्यायला हवी; कारण पर्यावरण चळवळीच्या पुढच्या वाटचालीत या बौद्धिक मेजवानीची अखेरपर्यंत सोबत होईल.
ज्यांना केवळ स्टार्सभोवती पिंगा घालण्यात जिवनाची इतिकर्त्तव्यता वाटते त्यांना या महोत्सवाचे कौतुक वाटणार नाही. या महोत्सवातील चित्रपट, लघुपट किंवा माहितीपटांमध्ये होर्डिंग्सवर दिसतात ते तारे, तारका नाहीत. ‘सत्य’ हेच नायक आणि ‘असत्य’ हे खलनायक असा त्यांचा बाज आहे.
पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी खोटेपणा विरोधात दिलेला लढा म्हणजे हा महोत्सव. या झुंजीचे वेगळेपण म्हणजे ती लढण्यासाठी रस्त्यावर उतरणे अनिवार्य नाही. ‘सृजनात्मक दृष्टीकोन’ या लढ्याचे भले मोठे आयुध आहे, आणि हे आयुध थेट हृदयास भिडते. कायदा हातात घेऊन जे प्रश्न सुटणार नाहीत ते हृदयाला हात घालून सोडविता येतात या श्रद्धेवर हा पर्यावरणीय महोत्सव आधारला आहे.
महोत्सवातील व्यथा मनोगतांचा कार्यक्रम चुकवू नका. पर्यावरण भूषण राजेंद्र केरकरांच्या संस्कारात संवेदनशील झालेल्या संस्कृती नाईक, सुखदा गावस, रश्मीता सातोडकर आणि अपूर्वा नाईक या म्हादई, मांडवी, झुवारी बनून तुमच्या डोळ्यांतून वाहतील.
कलाकृती संस्थेतर्फे महोत्सवापूर्वी लघुपट व माहितीपट निर्मिती स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थी व युवकांनी तिला प्रचंड प्रतिसाद दिला. पारितोषिक प्राप्त माहितीपट, लघुपट जेव्हा तुम्ही पहाल तेव्हा तुमच्या डोळ्यांचे सार्थक होईल.
गांडुळालाही रस्त्यावर चालण्याचा हक्क आहे व तो पायाखाली तुडविला जाऊ नये म्हणून सावधपणे पाऊल उचलणारी एक मुलगी ‘व्हाय कान्ट यू’ या चित्रपटात आहे. तुम्ही त्या चिमुरडीच्या प्रेमात पडाल. तुडुंब भरलेला कचरा उकीरड्यावर एक भुकेला मुलगा अन्न निवडत आहे हे वास्तव एका शाळकरी मुलाच्या कॅमेर्याने टिपलंय. ते पाहताना श्वास गुदमरतो. लघुपट व माहितीपट स्पर्धेची आखणी ते कार्यवाही या प्रदीर्घ वाटचालीत समन्वयिका प्रा. नीता तोरणे यांनी मोलाची साथ दिली.
या शतकात किती नवीन जमीन जंगल लागवडीकडे वळली आणि कुठली कुठली वनराई उद्ध्वस्त झाली याची सचित्र आकडेवारी एका माहितीपटात आहे. बेघर होणारी जनावरे आणि नष्ट होणार्या फुलाफळांच्या प्रजाती यांना सरकारची चुकीची धोरणे आणि समाजाची निष्क्रिय अनास्था कारणीभूत आहे हे हा माहितीपट स्पष्ट करतो. औद्योगिक प्रदूषणामुळे जगणे अशक्य होत असलेल्या नद्यांची कोरडी पात्र चित्रित करणारा लघुपट आपले डोळे ओले करतो. पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वतराजीतील निसर्गावर माणूस कसा अत्याचार करतो हे पाहिल्यावर आपण माणूस असल्याची लाज वाटायला लागते. पश्चिम घाटाचा विषय आज ऐरणीवर आला आहे. तो सर्वांना योग्य प्रकारे परिचित व्हावा म्हणून मुद्दामच या महोत्सवात त्या विषयक माहितीपटांचा समावेश करण्यात आला आहे. तो पाहिल्यावर तुम्ही सिनेमागृहाबाहेर जाल तेव्हा मन कोरडे किंवा अलिप्त राहणे असंभव आहे. पश्चिम घाटाला शोकांतिकेपासून वाचविणे किती तातडीचे आहे याचा संदेश या महोत्सवात मिळेल. ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ ही तुकोबांची शिकवण या निमित्ताने अडगळीबाहेर येईल.
‘जलाशये निर्मावी| महावने लावावी नानाविधे|’ ही ज्ञानदेवांची हाक महोत्सवात उपस्थित असणार्या गोवा सरकारच्या मंत्र्यांनी जर ऐकली तर गोव्याच्या नियोजित प्रादेशिक आराखड्याला खराखुरा अर्थ येईल. जलस्रोत खात्याच्या सहयोगाने या महोत्सवात खुला मंच आयोजित करण्यात आला आहे. त्यात आजची पाणीविषयक स्थिती काय आहे व भविष्यात कशी राहील याची अनुमाने मांडण्यात येतील. उद्योग व्यवसायाशी संबंधित आणि पर्यावरणप्रेमी यांना सरकारी प्रतिनिधींच्या मांडीला मांडी लावून या संदर्भात उद्याचा गोवा घडविण्याची ही संधी आहे.
वन आणि खाणी यांच्यामध्ये बफर झोन किती असावा या प्रश्नाची उकल या महोत्सवातील माहितीपट पाहून करता येईल. एका लघुपटात सच्चा पर्यावरण सैनिक नीलेशची मुलाखत आहे. केवळ कावरेच नाही, तर सार्या गोव्याचे दु:ख नीलेशने त्यात समर्पक शब्दांत मांडले आहे. खाणींच्या विषयाने गोव्याचे समाज, अर्थ व राजकीय जीवन ढवळल्यामुळे तो विषय या महोत्सवातून टाळणे अशक्यच आहे. साहजिकच हा महोत्सव तुम्हांला गोव्याच्या अस्तीत्वाच्या प्रश्नांना भिडण्याची साद घालणारा असेल.
रोटरॅक्ट पणजी क्लबच्या सहयोगाने आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धा संपन्न होणे हा या महोत्सवातील मानाचा शिरपेच आहे. एकेकाळी ही पथनाट्य गोव्यातील विद्यार्थी चळवळीचा कणा होती. या महोत्सवापासून स्फूर्ती घेऊन ते मोडलेले कंबरडे पुन्हा एकदा सावरेल का?
वाइल्ड ट्रॅक ऍडव्हेंचर्सच्या सहयोगाने ‘कॅमेरा इज माय टीचर देन् वर्ड्स’ ही फोटोग्राफी स्पर्धा या महोत्सवातील विशेष आकर्षण ठरेल. लायन्स क्लब पणजीच्या उत्साहामुळे ‘टाकाऊतून धनसंपदा’ ही मुलांसाठी स्पर्धा आयोजित करणे शक्य झाले. हा उपक्रम खरोखरच काळाची गरज आहे. पणजी महानगरपालिकेतर्फे ‘वेस्ट वाइज गार्बेज मॅनेजमेंट’ या विषयावर स्पर्धात्मक योगदान मिळणार आहे. या निमित्ताने महानगरपालिका घरोघरी पोचण्याची सुरूवात होईल. रोटरी पणजीचे अध्यक्ष मनोज पाटील यांना कचरासुरास आव्हान देण्याची खुमखुमी आली आणि त्यांनी म्हणूनच या स्पर्धेची संकल्पना महानगरपालिकेच्या गळी उतरवली. ‘टेरी’ने महोत्सवात ‘रिफ्यूज, रिड्यूस व रिसायकल’ ही शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. एनआयओतर्फे सागरी किनारेविषयक कार्यशाळा होईल. समुद्र व किनारे यांचे वरदान लाभलेल्या गोव्यात काहीजणांच्या आधाशीपणामुळे आणि बेपर्वाईमुळे ते वरदान कलुषित होत आहे. यावर उपाययोजना शोधण्यासाठी आणि त्या उपायाचा प्रचार करण्यासाठी ही कार्यशाळा बीजारोपण करेल.
महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला माननीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सोबत सर्व पर्यावरण कार्यकर्त्यांनी ज्यांच्या पायाशी बसावे अशा योग्यतेचे बिट्टू सहगल उपस्थित राहणे हे एक चांगले समीकरण आहे. गोवा व्याघ्र परिसर घोषित करण्याविषयी जी चालढकल चालू आहे तिला त्यामुळे आळा बसेल. व्याघ्र तज्ञ श्री. कारंथ यांच्या माहितीपटाचा या महोत्सवात आवर्जुन समावेश करण्यात आला आहे. प्रॉजेक्ट टायगरचे बिट्टू सहगल हे पर्यावरण क्षेत्रातील दुर्मीळ होत जाणारे उमद्ये वाघ आहेत. अशा आयडॉलचे दर्शन करून देण्याचे पुण्य आयोजकांच्या खाती जमा झाले आहे.
गोवा पर्यावरण चित्रपट महोत्सवास बॉलिवूडचे ग्लॅमर नसल्यामुळे महोत्सवाचे यश-अपयश किती प्रेक्षकांची गर्दी उसळली या तराजूत कुणी तोलू नये. हाउसफुल्ल करणे हा या महोत्सवाचा उद्देश नाही. पर्यावरणाचे पवित्र घटक असलेल्या पंचमहाभूतांविषयी ज्यांच्या मनात कृतज्ञता आहे त्यांना ती व्यक्त करण्याची संधी देणे हे महत्त्वाचे. देविदास आमोणकर, योगेश कापडी, प्रशांती आजगावकर यांचा ‘पर्जन्य’ महोत्सव सांगतेच्या प्रसंगीत नेमके तेच करणार आहे. पर्यावरण व कला क्षेत्र यांच्यामध्ये बफर झोन दुरू नये म्हणून प्रयत्न करणारी ही कलाकारांची मांदियाळी चित्रपट क्षेत्रात पर्यावरण रक्षणासाठी छावणी उभारत आहेत. त्यांच्यासारख्या अनेकांना त्या बांधकामात सहयोग म्हणून या महोत्सवाची लहानशी का होईना पण टिकाऊ अशी वीट देता येणे हे मला महोत्सवाचा सहआयोजक या नात्याने भाग्याचे वाटते.
या तीन दिवसीय दृकश्राव्य अनुभूतीच्या पोटी जर पर्यावरणाचा आक्रोश ऐकणारे कानसेन जन्मास आले तर त्यांच्या हृदयातील ठोक्यांच्या तालावर कदमताल करण्याची सर्वांनाच सुबुद्धी होईल. ही अपेक्षा केवळ स्वप्नरंजन नसून भविष्याचा वेध आहे. मंजील शोकधून बदलण्याची आहे. रत्नपारखी प्रेरणा माईणकर, डॉ. लक्ष्मी भरणे, आर्किटेक्ट रिता मोदी जोशी, डॉ. पृथ्वी आमोणकर, रिचर्ड डायस, राज सुतार आणि मी या सहआयोजकांनी या महोत्सवाच्या माध्यमातून आपला खारीचा वाटा दिला आहे. तुम्ही सार्यांनी मन:पूर्वक सहभाग दिला तर पर्यावरण वृक्षाच्या प्रत्येक फांदीवर ‘उज्ज्वल उद्याची’ सुरेल तान किलबिलाट करेल… तो वृक्ष जीवंत ठेवण्यासाठी आणि ते जीवन संगीत गाण्यासाठी सारे या!
………..