फुटीरतावाद्यांना निमंत्रणामुळे भारताची संतप्त प्रतिक्रिया
पाकिस्तानी उच्चायुक्तांनी काश्मीरी फुटीरतावादी नेत्यांना चर्चेसाठी बोलावणे धाडल्यानंतर कडक प्रतिक्रिया व्यक्त करताना भारत – पाकिस्तान विदेश सचिव स्तरावरील चर्चेत भाग न घेण्याचा निर्णय काल भारताने घेतला. भारताच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप स्वीकाहार्य नाही, असेही भारताने स्पष्ट केले.
भारत किंवा फुटीरतावादी यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल, असे भारताच्या विदेश सचिव सुजाता सिंग यांनी बजावल्यानंतरही पाकिस्तानी दूताने फुटीरतावाद्यांशी बैठक घेतली. यामुळे अशा परिस्थितीत पुढील आठवड्यातील विदेश सचिव स्तरावरील बोलणी फलदायी ठरतील असे वाटत नसल्याचे भारताने म्हटले.
भारताच्या विदेश सचिव सुजाता सिंग व पाकिस्तानी विदेश सचिव अझिज चौधरी यांच्यात २५ ऑगस्ट रोजी इस्लामाबादेत चर्चा होणार होती. दोन वर्षांनंतर ही चर्चा होणार होती.
मुद्दाम शस्त्रसंधीचे उल्लंघन : जेटली
अमृतसर ः पाकिस्तानकडून जाणून बुजून नियंत्रण रेषेवर तसेच आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी काल म्हटले. यातून स्पष्ट होते की त्यांना भारताशी सलोख्याचे संबंध नको आहेत. गेल्या दहा दिवसांत ११ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याचे ते म्हणाले. आपले जवान पाकिस्तानच्या कुठल्याही प्रकारच्या शस्त्रसंधीचे चोख प्रत्यूत्तर देण्यासाठी समर्थ आहेत असेही ते म्हणाले.