विधानसभा वृत्त

0
116

गुरांसाठी औषधे नसल्याचा विरोधकांचा दावा मंत्र्यांनी फेटाळला
दुभत्या गायी व अन्य सर्व गुरांसाठी लागणारी औषधे पशुसंवर्धन खाते व खात्याच्या डिस्पेन्सरीत उपलब्ध असून या औषधांचा कोणताही तुटवडा नसल्याचे काल पशुसंवर्धन खात्याचे मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गोवा विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर बोलताना त्यांनी वरील स्पष्टीकरण केले.
यासंबंधीचा मूळ प्रश्‍न नरेश सावळ यांनी उपस्थित केला होता. गुरांसाठी लागणार्‍या औषधांचा खात्याकडे तुटवडा आहे काय असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले होता. मात्र, पार्सेकर यांनी औषधांचा तुटवडा नसल्याचे सांगताच तसे असेल तर शेतकर्‍यांची गुरे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढत का आहे, असा सवाल सावळ यांनी केला. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही यावेळी गुरांच्या औषधांचा तुटवडा असून त्यामुळे गुरे दगावत असल्याचा आरोप केला.
यावेळी मंत्री पार्सेकर व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि नरेश सावळ यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
गुरांसाठी लागणारी प्रती जैविके, विटामीन बी-कॉम्प्लेक्स, केल्शियम व अन्य सर्व रोगांवरील औषधे उपलब्ध आहेत असे पार्सेकर हे सांगत असताना नरेश सावळ म्हणाले की, तसे असेल तर डिचोलीतील शेतकर्‍यांना ही औषधे का उपलब्ध होत नाहीत. यावेळी उत्तर देताना पार्सेकर म्हणाले की, सांगे व डिचोली तालुक्यात शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने गुरे खरेदी केलेली असून जास्त मागणीमुळे त्या तालुक्यात औषधांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. गेल्या वर्षी खात्याने औषधांवर दीड कोटी रु. खर्च केले. यंदा हा आकडा वाढवून तीन कोटींवर नेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी निविदा येत्या एक-दोन दिवसांत काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकर्‍यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी औषधांबरोबरच त्यांच्यासाठी असलेल्या अन्य सर्व योजनांवरील निधीतही वाढ करण्यात आली आहे. दुधावरील आधारभूत किंमत वाढवण्यात आली आहे. पशुपालन योजनेवरील निधीत व मदतीत वाढ करण्यात आली आहे. सरकार सर्व ती मदत शेतकर्‍यांना देत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मात्र, यावेळी वाद घालताना नरेश सावळ यांनी तसे असेल तर शेतकर्‍यांची गुरे का दगावतात असा प्रश्‍न केला.
यावेळी हस्तक्षेप करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की जर कुणाची गुरे दगावत असतील तर ते शेतकरी ६०० रु. मोजून तातडीने औषधे लाणू शकतात.
यावेळी सावळ व रेजिनाल्ड यांनी खात्यातील अधिकारी काम करीत नाहीत असा आरोप करून ते काम करतील इकडे लक्ष द्या, अशी मंत्र्यांकडे मागणी केली.
औषधी मासळीवर संशोधनाची गरज : वाघ
औषधी महत्व असलेल्या मासळीवर संशोधन होण्याची गरज आहे. मासळीच्या काही जाती नष्ट होत आहेत. या मासळीपासून अनेक पदार्थ कसे बनवावेत याचे ज्ञान असलेली मंडळीही काळाच्या पडद्याआड केली आहे. त्यामुळे नवी पिढीही पापलेट, इस्वण वगळता अन्य काहीही खात नाहीत, असे सांतआंद्रेचे आमदार विष्णू वाघ यांनी मागण्यांना पाठिंबा देणार्‍या भाषणात सांगितले. गोमंतकात मासळी उपलब्ध व्हावी म्हणून सरकारने मार्गदर्शन तत्वे तयार करावीत, अशी मागणी वाघ यानी केली.
कंत्राटी कामगार पद्धत रद्द करणे हे राष्ट्रीय धोरण आहे. परंतु आता उलट झाले आहे. प्रत्येक ठिकाणी कंत्राटी पद्धतीनेच नोकरभरती केली जाते. हे प्रकार बंद करण्यासाठी कामगार चळवळ सक्षम करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशा सूचना वाघ यानी केल्या. पत्रकारांसाठी असलेल्या मजिथिया वेतन मंडळाने केलेल्या शिफारशीच्या अंमलबजावणीच्या बाबतीत सरकारने चौकशी करून पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही वाघ यांनी केली.
कंत्राटी कामगारांना नियमित करण्यासाठी प्रयत्न हवेत : राणे
वेगवेगळ्या खात्यातील कंत्राटी कामगारांना सेवेत नियमित करण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी काल विधानसबेत केली.
नोकरीच्या निमित्ताने गोवा सोडून जाण्याचे प्रमाण गोव्यातील नागरिकांत बरेच वाढले आहे. पोर्तुगालला जाण्यासाठी आल्तिनो येथे पासपोर्टसाठी रांगा लागतात. केवळ नोकरीसाठीच ते जातात. भविष्यकाळात येथे मतदारच राहणार नाहीत अशी परिस्थिती उद्भवेल. त्यामुळे सरकारने गोमंतवासीयांनी गोवा सोडून जाऊ नये म्हणून काहीतरी उपाय काढण्याची मागणीही विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी काल विधानसभेत मजूर खात्यावरील एका सूचनेवर बोलताना सांगितले.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत भुयारी वीजवाहिन्या : वीजमंत्री
कुंकळ्ळी येथील औद्योगिक वसाहतीला वीजपुवठा करण्यासाठी भुयारी वीजवाहिन्या घालण्यात येत असून तेथे असलेल्या चार ३३ केव्ही फीडरांपैकी दोन फीडरांचे भुयारी वीजवाहिन्यात यापूर्वीच रुपांतर करण्यात आले असल्याची माहिती वीजमंत्री मिलिंद नाईक यांनी काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला उत्तर देताना दिली.
शेल्डे उपकेंद्रातून भुयारी वीजवाहिन्या घालून कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीला वीजपुरवठा करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचेही मिलिंद नाईक यांनी यावेळी एका उपप्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार गणेश गावकर यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला होता.