विधानसभा वृत्त

0
85

भूमीगत वीजवाहिन्यांच्या अंदाजपत्रकाचे काम सुरू
भूमीगत वीज वाहिन्या टाकल्यास वीज पुरवठ्यात सुधारणा होऊ शकेल त्यासाठी खात्याच्या अभियंत्यांना प्रकल्पासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्यास सांगितले असल्याची माहिती वीजमंत्री मिलींद नाईक यांनी काल विधानसभेत या खात्याच्या मागणीवरील चर्चेस उत्तर देताना दिली.
११ केव्ही वीजवाहिनी घालण्यास सरकार प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एपीडीआरपी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव असून या विषयावर मुख्यमंत्र्यानी संबंधितांबरोबर बैठकही घेतल्याचे त्यांनी सांगितले. वन क्षेत्रातील बिघडलेली फिडर्स बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या मार्च ते मे २०१४ काळात फक्त ३१५ मॅगावॅट वीज मिळाली. या काळात किमान ५०० मॅगावीट विजेची मागणी असते. ७५ मेगॉवॅट ही वीज एमव्हीएनएल. व ५० मॅगावॅट टाटा कडून घेऊन ग्राहकांची गरज भागविल्याचे वीजमंत्र्यांनी सांगितले.
गेल्या बारा वर्षांच्या काळात घरगुती विजेच्या दरात वाढ झालेली नाही. महागडी वीज खरेदी करूनही घरगुती वीज ग्राहकांना योग्य दरातच वीज दिल्याचे त्यांनी सांगितले.
लाईन हेल्पर व कनिष्ठ अिभियंता यांच्यात संगनमत असते त्यामुळे वीज खंडित झाल्यानंतर आमदारांना फोन येत असल्याची वीज मंत्र्यांनी कबुली दिली.
वीज कर्मचार्‍यांनी जनतेला चांगली सेवा दिली पाहिजे. याचा कर्मचार्‍यांनीही विचार करावा, असे नाईक म्हणाले. वीज खात्याच्या कारभारात एका रात्रीत सुधारणा होऊ शकत नाही. सर्व कारभार सुरळीत होईल, याची सरकार काळजी घेईल. खात्याच्या कर्मचार्‍यांनाही प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केल्याचे नाईक यांनी सांगितले.
गेल्या साडेसात वर्षांत वीज खात्यात नियोजन झालेच नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पुढील वर्षभरात वीज खात्याला ३०० ते ४०० कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले.
विजेच्या बिलांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जीइएलवर कामाची जबाबदारी देण्याचे ठरविले असून पुढील काही महिन्यानंतर बिलांचा प्रश्‍न सोडविणे शक्य होईल असे मंत्र्यांनी सांगितले.
उद्यानांसाठी दीड कोटींची तरतूद : वनमंत्री
पणजी (न. प्र.)
राज्यात नवीन उद्याने तयार करण्यास व जी उद्याने (गार्डन्स) आहेत त्यांचा सांभाळ करण्यासाठी चालू वर्षी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पर्यावरणमंत्री एलिना साल्ढाणा यांनी काल विधानसभेत दिली. प्रश्‍नोत्तराच्या तासाला अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी बोलताना आमदार प्रमोद सावंत यांनी चोर्ला घाटात बॉटनिकल गार्डन उभारण्याची मागणी केली तर आमदार सुभाष फळदेसाई यांनी साळावली येथील बॉटनिकल गार्डनात लेझर शोची व्यवस्था करावी अशी सूचना केली.
विरोधी पक्ष नेते प्रतापसिंह राणे म्हणाले की बागा व उद्याने यांच्यासाठी स्वतंत्र उद्याने व बाग खात्याची गरज आहे. यावेळी उत्तर देताना साल्ढाणा म्हणाल्या की चोर्ला घाट येथे बॉटनिकल गार्डन उभारण्याची जी मागणी करण्यात आलेली आहे त्याबाबत विचार करण्यात येईल.
फातोर्डा स्टेडियमकडील रस्त्याचे
रुंदीकरण डिसेंबरपर्यंत : मुख्यमंत्री
पणजी (न. प्र.)
फातोर्डा स्टेडियमजवळील शिल्लक राहिलेले रस्ता रुंदीकरणाचे काम डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.
वरील रस्त्याचे काम करणार्‍या कंत्राटदाराला शिल्लक राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबरपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे काय, असा प्रश्‍न सरदेसाई यांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री पर्रीकर यांनी वरील माहिती दिली. सदर रस्त्याचे काम करताना काही अडचणी आल्या होत्या. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे सगळे काम पूर्ण करता आले नव्हते. मात्र, ज्या अडचणी आहेत त्या आता दूर केल्या जात असून डिसेंबरपर्यंत व जास्तीत जास्त येत्या १५ मार्च २०१५ पर्यंत शिल्लक राहिलेले काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यासाठी सप्टेंबर महिन्यात आपण संबंधीतांबरोबर एक बैठकही घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नताशाचे विधानसभेत अभिनंदन
पणजी (न. प्र.)
गोमंतकीय टेनिसपटू नताशा पाल्हा हिची आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय टेनिस संघात निवड झाल्याबद्दल काल तिचे गोवा विधानसभेत अभिनंदन करण्यात आले. अभिनंदनाचा हा ठराव आमदार विष्णू वाघ यांनी मांडला. यावेळी बोलताना आमदार माविन गुदिन्हो, ग्लेन टिकलो, दिगंबर कामत, वनमंत्री एलिना साल्ढाणा व क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी नताशा पाल्हाचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी बोलताना क्रीडामंत्री रमेश तवडकर म्हणाले की गोव्यात असेच कुशल टेनिसपटू व्हावेत यासाठी राज्यात टेनिस स्टेडियम उभारण्यात येणार आहे. स्टेडियमसाठीचे काम चार-पाच महिन्यात सुरू होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.