कोहली यांचा गोवा राज्यपालपदी शपथविधी

0
92
ओम प्रकाश कोहली यांना गोवा राज्यपालपदाची शपथ देताना मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शांतीलाल शाह. सोबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर.

ओम प्रकाश कोहली यांचा गोव्याचे राज्यपाल म्हणून काल एका साध्या समारंभात राजभवनवर शपथविधी झाला.
मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शांतीलाल शाह यांनी त्यांना शपथ दिली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यावेळी उपस्थित होते.
श्री. कोहली गोव्याचे १८वे राज्यपाल आहेत.
कोहली सध्या गुजरातचे राज्यपाल असून त्यांना गोवा राज्याचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे.
१९९४ ते २००० पर्यंत राज्यसभेचे खासदार राहिलेले कोहली यांनी गृहनिर्माण, नगरविकास अशा सभागृह समित्यांवरही काम केले आहे. १९९९ ते २००० काळात ते दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. हिंदी साहित्यात पदव्यूत्तर पदवी असलेल्या कोहली यांनी हंसराज महाविद्यालय व देशबंधू महाविद्यालयात मिळून सुमारे ३६ वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. ‘राष्ट्रीय सुरक्षा के मोर्चे पर’, ‘शिक्षा नीती’ व ‘भक्तिकाल के संतो की सामाजिक चेतना’ अशी त्यांची तीन पुस्तकेही प्रकाशित आहेत. दरम्यान, मुख्य सचिव बी. विजयन यांनी कोहली यांच्या नियुक्तीचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जारी केलेले फर्मान वाचून दाखवले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री फ्रांसिस डिसोझा, सभापती राजेंद्र आर्लेकर, उपसभापती अनंत शेट, विरोधी नेते प्रतापसिंह राणे, मंत्री, आमदार, सचिव, पोलीस महासंचालक आदि उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यानंतर राज्यपालांना पोलिसांनी मानवंदना दिली.