हे अपमान का सोसले जातात?

0
130

– डॉ. राजीव कामत, खोर्ली-म्हापसा
दि. २४ जुलैच्या विविध वर्तमानपत्रांतून चीनमध्ये चालू असलेल्या बास्केटबॉल स्पर्धेत भारताच्या दोन शिख खेळाडूंची पगडी उतरवली गेल्याची अपमानास्पद अशी बातमी वाचून मन खिन्न झाले. त्याचबरोबर देशाभिमान कसा बाळगावा याचा सतत डोस पाजणारे आपले राजकारणी कसे दांभिक आहेत, याचेही यथावकाश दर्शन घडले. खेळाबरोबरच अन्य कितीतरी आघाड्यांवर आपला सतत अपमान होऊनसुद्धा आपण फक्त मूग गिळून स्वस्थ बसत आहोत, ही खरेतर राष्ट्रीय शरमेची गोष्ट आहे. पण स्वतःपुरता विचार करणारे व स्वहित हेच ब्रीद मानणारे जोपर्यंत आपल्या देशावर राज्य करणार, तोपर्यंत अपमान सहन करीत जगण्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही.
पुढील काही गोष्टी वानगीदाखल आपणासमोर ठेवू इच्छितो –
१) क्रिकेट या खेळाचे आपल्या देशात होणारे लाड सर्वश्रूतच आहेत. कुठलाही सामना, अगदी केनया वा तत्सम संघाबरोबर जिंकला तरी संपूर्ण देशात उधाण येते. मग विविध वाहिन्यांवरून दोन तीन दिवस त्या विजयाचे तथाकथित तज्ज्ञांकडून सतत चर्वण केले जाते. भारतीय संघाने लॉर्डस् मैदानावर इंग्लंडला हरवल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव गोवा विधानसभेतही संमत झाला. विशेष म्हणजे पुष्कळजण विराट कोहली या खेळाडूबद्दल बोलले, ज्याने अजूनपर्यंत या इंग्लंडवारीत काहीच भरीव कामगिरी केलेली नाही. पण किती जणांनी या ‘पगडी उतार’ प्रकारावर निषेध व्यक्त केला? वास्तविक ही घटना दि. १२ जुलै रोजी जपानबरोबरच्या सामन्यात घडली होती. मग ती ज्ञात व्हायला २३ जुलै का उजाडावा लागला? या संघाबरोबर जे प्रादेशिक प्रशिक्षक आहेत, तेसुद्धा परदेशीच आहेत, ही लक्षात घेण्यासारखीच गोष्ट आहे.
२) माझे असे ठाम मत आहे की, येनकेनप्रकारे पैसा मिळविणे हेच आपल्या खेळाडूंचे ब्रीद आहे. इतर खेळांत जास्त पैसा मिळत नसल्याने अशा बाबी गंभीरपणे समोर येत नाहीत. पण क्रिकेट या खेळात अमाप पैसा मिळूनही हे खेळाडू केवळ जास्त पैशांसाठी मानहानीसुद्धा स्वीकारायला का तयार होतात हे अनाकलनीय आहे. या संदर्भात काही वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा आठवतो. नुकतेच शारजा क्रिकेट सुरू झाले होते आणि हे सामने फक्त भारत व पाकिस्तान या देशांच्या सहभागामुळेच चालायचे. आखाती देश असल्यामुळे तिथे पैशांचा नुसता महापूरच वाहायचा. तिथे स्पर्धेत भाग घेण्यासाठी दिलीप वेंगसरकरच्या नेतृत्वाखाली जेव्हा भारतीय संघ शारजा विमानतळावर उतरला, तेव्हा इमिग्रेशनच्या रांगेत उभ्या असलेल्या वेंगसरकर यांनी काहीतरी शब्द उच्चारले. हे शब्द त्या इमिग्रेशन ऑफिसरच्या कानी पडल्याबरोबर त्यांनी वेंगसरकरला तिथूनच भारतात परत जाण्याचे फर्मान काढले. दुर्दैवाची गोष्ट अशी की, त्यावेळी कुठलाही अन्य खेळाडू वेंगसरकरच्या बाजूने उभा राहिला नाही. सुनील गावस्करसारखा दिग्गज, जो त्या दिवशी संघाबरोबर नव्हता, तो तिसर्‍या दिवशी स्वतंत्रपणे संघात दाखल झाला व त्यानेसुद्धा वेंगसरकरलाच चूक ठरवले. वास्तविक इथे चूक किंवा बरोबर असा प्रश्‍न नव्हता. प्रश्‍न होता देशाच्या इभ्रतीचा. खरे तर निषेध म्हणून संपूर्ण संघाने माघारी परतायला पाहिजे होते. पण शेवटी पैसा हा वरचढ ठरल्याने देशाची शान पायदळी तुडवली गेली.
३) पुष्कळ वेळा आपण पाहतो की एखाद्या सामन्याच्या दरम्यान दोन खेळाडूंमध्ये बाचाबाची होते. समजा त्यातील एक खेळाडू हा भारतीय आहे व एक विदेशी. पण जेव्हा शिक्षा फर्मावली जाते, तेव्हा त्या विदेशी खेळाडूला कमी शिक्षा केली जाते किंवा निर्दोष सोडले जाते आणि भारतीय खेळाडूला कडक शासन केले जाते. यावर कोणीच आवाज उठवत नाहीत आणि जर उठवलाच तर तो एक कागदी निषेध असतो, ज्याची किंमत सर्वांनाच माहीत आहे.
४) मोदी सरकार स्थापन झाल्यापासून भारत पाक संबंधांबाबत बराच आशावाद व्यक्त केला जातो. नवाज शरीफ हे नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहिल्यामुळे या दोन्ही देशांचे संबंध सुधारणार अशी अटकळ बांधली गेली. दोन्ही पंतप्रधानांनी एकमेकांच्या मातोश्रींना दिलेल्या भेटवस्तूंवर अफाट चर्चा झाली. पण केवळ आईना भेटवस्तू देऊन दोन्ही देशांतील संबंध सुधारणार अशी आशा बाळगणे म्हणजे अवकाशातून चंद्र तारे तोडून आणण्यासारखेच आहे. इतके सर्व होऊनसुद्धा कालपर्यंत आपल्या सीमेवर पाककडून गोळीबार चालूच होता, ज्यात काही जवान व अन्य नागरिक ठार झाले आहेत. इतके होऊन काही भारतीय भारत-पाक क्रिकेट किंवा हॉकी सामने भरवण्याचे प्रयत्न करतात ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे आणि विरोधात असताना ‘पाकिस्तानचे यंव व त्येंव करू, त्यांना कायमचा धडा शिकवूं’ अशी वल्गना करत कॉंग्रेस सरकारला दोष देणारे आज सत्तेवर येऊनसुद्धा ‘कोणाचीही गय केली जाणार नाही, कडक किंवा तीव्र निषेध खलिता पाठवू, असे काहीच घडललेच नाही.’ अशी जेव्हा सारवासारव करतात, तेव्हा देशाभिमानी मन उद्विग्न होते.
५) आपण भारतीय स्वतःला देशाभिमानी, देशप्रेमी वगैरे विशेषणांनी गौरवून घेतो. पण काही प्रसंगांत आपणाला नक्की काय दर्शवायचे असते, हे आम्हा पामरांच्या आकलनशक्तीच्या बाहेरचे असते. उदाहरण म्हणून पुढील दोन स्पर्धांचा उल्लेख करण्याचा मोह मला आवरत नाही. त्या स्पर्धा म्हणजे ‘राष्ट्रकुल’ व ‘लुसोफोनिया’ या होत. इंग्लंडच्या राणीच्या अधिपत्याखाली एकेकाळी असलेले देश ‘कॉमनवेल्थ’ या सदरात मोडतात व ही स्पर्धा त्या देशांतर्गात भरवली जाते. तीच गोष्ट ‘लुसोफोनिया’ या स्पर्धेची. त्यांत पोर्तुगीज भाषिक व पूर्वपोर्तुगीज राजवट असलेले देश सहभागी होतात. या स्पर्धेत गोवा हे भारताचे छोटे राज्य कसे व का सहभागी होते हे एक कोडेच आहे. (पोर्तुगीज राजवट असलेली पॉन्डिचेरी, दमण, दीव, दादरा व नगरहवेली ही राज्ये सहभागी होत नाहीत.) यंदा तर या स्पर्धांचे आयोजन गोव्यात करून आपण गत गुलामगिरी स्मरणात ठेवण्यात किती कटिबद्ध आहोत याचेच दर्शन सर्वांना घडले. आणि एक राजकारणी म्हणून या स्पर्धेला विरोध दर्शविणारे विष्णू वाघ यांनी कवीच्या भूमिकेतून या स्पर्धेचे गुणगान करणारे स्वागतगीत लिहून आपल्या शिरपेचात एक तुरा खोवला. वास्तविक या दोन्ही स्पर्धा आपल्या पूर्वाश्रमीच्या गुलामगिरीची याद ताजी करतात व त्यामुळे आपण या खेळात सहभागी का व्हायचे हा प्रश्‍न उपस्थित होतोच. तेव्हा यापुढे अशा काही अप्रिय घटना घडल्या, जशी ही ‘पगडी उतार’ घडना, ज्यामुळे सबंध भारत देशाच्या स्वाभिमानावर घाला पडतो, तत्क्षणी त्या स्पर्धेवर बहिष्कार टाकून आपला निषेध नोंदवला, तर आपल्या भारत देशाची मान उंच राहण्यास मदत होईल.