दोन व्यायाम प्रशिक्षकांना अटक
येथील प्रतिष्ठीत विबग्योर शाळेत गाजलेल्या सहा वर्षीय मुलीवरील बलात्काराला नवे वळण मिळाले आहे. हा बलात्कार ‘सामूहिक’ होता असे आता निष्पन्न झाले असून पोलिसांनी या प्रकरणी दोन व्यायाम प्रशिक्षकांना अटक केली आहे. दरम्यान, या पूर्वी गुन्हा नोंदविण्यात आलेल्या स्केटिंग प्रशिक्षकांचा थेट सहभाग या प्रकरणात नसल्याचे अनुमान पोलिसांनी काढले आहे.
सुरुवातीला हे प्रकरण बलात्काराचे म्हणून समोर आले होते. या प्रकरणी तपास करण्यास पोलिसांनी दिरंगाई केल्यामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या प्रकाराच्या निषेधार्थ बेंगलोरसह देशभरात निदर्शने झाल्यानंतर तपासाला गती देण्यात आली होती.
‘आता हा बलात्कार सामूहिक होता, असे निष्पन्न झाले आहे’ असे शहर पोलीस आयुक्त एम. एन. रेड्डी यांनी पत्रकारांना सांगितले.
लाल गिरी आणि वासिम पाशा अशी त्यांची नावे असून त्यांना अटक करून लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याआधी लोकांच्या रोषानंतर मुस्तङ्गा या व्यायाम प्रशिक्षकाला अटक करण्यात आली होती. बलात्काराची घटना २ जुलै रोजी घडली होती तर तक्रार १४ जुलै रोजी नोंद करण्यात आली होती. दरम्यान, थेट सहभाग नसला तरी त्यांच्या गुन्ह्यातील भूमिकेबाबत अधिक तपास करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर बंद ठेवण्यात आलेेली ही शाळा कालपासून पुन्हा सुरू झाली.
पिस्तुलाचा धाक दाखवून शालेय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
दहावीत शिकणार्या १६ वर्षीय मुलीवर पाच जणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याची घटना पश्चिम दिल्लीच्या उत्तमपूर भागात घडली. धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार करणार्या पाच जणांत तिघे अल्पवयीन आहेत. शिवाय बलात्काराची मोबाईलद्वारे चित्रफीत बनवून हा प्रकार उघड केल्यास सदर एमएमएस इंटरनेटवर टाकण्याची धमकी देण्यात आली, असेही तक्रारी म्हटले आहे.
ही घटना १९ जुलै रोजी विद्यार्थिनी शाळेला जात असताना घडली. मुलीच्या पालकांनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी प्रमोद नामक एका व्यक्तीस व त्याच्या ओळखीच्या दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. मुलीच्या तक्रारीनुसार ती शाळेत जात असताना चौघांनी, ज्यांपैकी तीन अल्पवयीनांशी ती परिचित होती, तिला सुरेंद्र पहलवान नामक व्यक्तीच्या घरी नेले व तेथे पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिघांना अटक केल्यानंतर पोलीस एक अल्पवयीन तसेच सुरेंद्र पहलवान याच्या शोधात आहेत.