Home बातम्या वास्कोत बार्ज बांधणीवेळी स्फोटात कामगार ठार

वास्कोत बार्ज बांधणीवेळी स्फोटात कामगार ठार

0

शनिवारी सकाळी १०.५५ वाजता ही दुर्घटना घडली, अशी माहिती तेथे त्यावेळी उपस्थित असलेल्या इतर कामगारांनी दिली. वॉटरवेज शिपयार्डतर्फे तेथे १८०० टन क्षमतेची ‘शांतम’ ही बार्ज बांधण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आलेले आहे. विशेष म्हणजे आज रविवारी तिचे जलावतरण होणार होते.

बार्ज बांधून ठेवलेल्या जेटीवर सुमारे वीस – बावीस कामगार काम करीत होते. त्याचवेळी अचानक बार्जच्या खालील कप्प्यात प्रचंड स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता एवढी जबरदस्त होती की, जेटीवर काम करणारा संजय सिंग चौहान (२४) हा मूळ उत्तर प्रदेशच्या महू जिल्ह्यातील मजुवारी येथील कामगार उंच फेकला गेला व शेजारील चॅपेलच्या छपरावर आपटून जागीच ठार झाला. यावेळी बार्जवर काम करणार्‍या रामसिंग चौघन (२२) याला आपली बोटे गमवावी लागली, तर नरेश बहत चौहान (३०) या कामगाराची स्थिती नाजूक आहे.

या स्फोटामुळे बार्जच्या उजव्या बाजूला तेरा मीटर लांब व अडीच मीटर रुंदीचे भोक पडले असून लोखंडी प्लेट व पट्‌ट्या यांचे तुकडे होऊन मुख्य रस्त्याच्या पलीकडे असलेल्या डोंगरावर म्हणजे सुमारे पन्नास मीटर लांबवर जाऊन पडले आहेत. रस्त्यापलीकडे असलेल्या क्रॉसला बसवलेल्या काचांचा स्फोटाच्या धक्क्याने खच पडला, तर चॅपेलची तावदाने व दरवाजा तुटून पडल्याचे दिसून आले. सदर दुर्घटनेपासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या डोंगराच्या टेकडीवर नव्याने उभारण्यात आलेल्या कॉलनीतील काही दोघे गंभीर जखमी; पोलिसांकडून गुन्हा नोंद

घरांची तावदाने स्फोटाच्या हादर्‍याने फुटून पडली. स्फोटाचा प्रचंड आवाज ऐकून तेथून दोन कि. मी. अंतरावर असलेल्या पंचायत परिसरतील लोक भीतीने दुर्घटनास्थळी धावून आले.

‘शांतम’ या बार्जचे अंतिम टप्प्यातील काम सुरू असतानाच हा स्फोट झाला. बार्ज पूर्णपणे बांधून जलावतरणासाठी तयार होती व तिच्या पॉलिशिंगचे काम सुरू होते. बार्जच्या मधल्या भागातील शिडीजवळ स्फोट झाला. बार्जच्या तळभागात निर्माण झालेल्या वायूचा स्फोट झाला असावा असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. वास्को पोलीस तपास करीत आहेत.

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल परब, उपनिरीक्षक जॉन फर्नांडिस, चिखलीच्या उपसरपंच मारिया मास्करेन्हस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. रुग्णवाहिकेतून जखमींना इस्पितळात हलवण्यात आले. चॅपेलच्या छपरावर मृतावस्थेत पडलेल्या संजय चौहान या कामगाराचा मृतदेह तासाभराने खाली उतरवण्यात आला.

वॉटरवेज शिपयार्डमधील ही दुसरी गंभीर दुर्घटना मानली जाते. सन २००७ साली बार्ज बांधणीचे काम सुरू असताना १८० किलो वजनाचा एक रॅम्प वरून खाली काम करणार्‍या उत्तर प्रदेशच्या उमाशंकर नावाच्या कामगाराच्या अंगावर पडून त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते. या कामगारावर नंतर कंत्राटदारांनी स्वखर्चाने उपचार करून त्याच्या गावी पाठवून दिले होते. तत्कालीन उपअधीक्षक देऊ बाणावलीकर यांनी त्यावेळी वॉटरवेज कंपनीचे प्रमुख कॅप्टन त्रियॉन यांना बोलावून घेऊन चौकशी केली होती. त्यावेळी त्रेयॉन यांनी सदर कामगाराला आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले होते. उमाशंकर याला कोणतीही आर्थिक मदत मिळाली नसून गेली चार वर्षे येथील काही कंत्राटदार त्याला अधूनमधून खर्चासाठी पैसे पाठवतात अशी माहिती येथील कामगारांनी दिली.

कॅप्टन त्रियोन यांचे पुत्र अनूप थरून व गौतम थरून यांनी कालच्या दुर्घटनेनंतर घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दुर्घटनेसंदर्भात काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३३६,३३७, ३०४ अ खाली गुन्हा नोंदविला असून या बार्जच्या बांधकामावर देखरेख करणारे पर्यवेक्षक व इतर संबंधित अधिकार्‍यांना अटक केली जाणार आहे.

दरम्यान, सदर कंपनीला पंचायतीने बार्ज दुरुस्तीसाठी परवाना दिलेला असताना पंचायतीच्या परवानगीविना नवीन बार्जचे बांधकाम केले जात होते, असा आरोप उपसरपंच मारिया मास्करेन्हस यांनी केला आहे.