आमोणा पुलावरून नदीत उडी टाकलेल्या दोघा बहिणींपैकी एकीचा कालही शोध घेण्यात आला मात्र ती सापडू शकली नाही. दरम्यान, दुसर्या बहिणीस तात्काळ पाण्याबाहेर काढण्यात यश आले होते. दरम्यान, भावाने मारल्याने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे वाचलेल्या सुजाताने सांगितले होते त्यामुळे फोंडा पोलिसांनी भा.दं.सं. ३०६ कलमाखाली भाऊ रामचंद्र विठ्ठल गावस याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
नीता विठ्ठल गवस व सुजाता विठ्ठल गवस, रा. गुळे-सत्तरी यांनी नदीत उडी घेतली होती. पैकी सुजाताला तेथे काम करणार्या कामगारांनी वाचवले होते. आई, तीन भाऊ व चार बहिणी असा हा परिवार आहे. त्यांना वडील नाहीत. नीता गावस ही साखळी येथे सरकारी महाविद्यालयात बी. ए.च्या प्रथम वर्षात शिकत होती तर सुजाता ही सरकारी माध्यमिक विद्यालयात मोर्ले-सत्तरी येथे १० वीच्या वर्गात आहे. दरम्यान, रामचंद्रला अटक होण्याचीही शक्यता आहे. फोंडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक सी. एल. पाटील पुढील तपास करीत आहेत.