अखेर ज्योकीम लोवे यांच्या जर्मन संघाने विश्वचषक फुटबॉलमध्ये क्रांती घडवीत चौथ्यांदा झळाळत्या फुटबॉल विश्वचषकाला गवसणी घातली. एका अमेरिकी देशात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अजिंक्यपदाचा मान पटकावण्याची एका युरोपीय संघाची ही पहिलीच वेळ असल्याने फिलीप लेहम याच्या नेतृत्वाखालील जर्मन संघाच्या या अलौकीक यशाला सोन्याची किनार लाभली आहे. या संघाच्या या दिव्य अशा कामगिरीमुळे संघप्रशिक्षक लोवे यांना जर्मनीत ‘फुटबॉल देवा’ चा दर्जा मिळणार आहे. या आधी सेप्प हर्बर्गर (१९५४), हेल्मट शॉएन (१९७४) व फ्रान्झ बेक्नबॉर (१९९०) यांनी असेच यश जर्मन संघाला मिळवून दिल्यामुळे ते या दर्जास पात्र ठरले होते. रविवारी रिओ दि जानेरोच्या मारकाना स्टेडियमवर झालेल्या जर्मनी व लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना या संघांंतील तुल्यबळ लढतीतील खेळाने तेथे उपस्थित असलेल्या हजारो फुटबॉलप्रेमींबरोबरच जगभरातील कोट्यवधी फुटबॉल शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ही स्पर्धा महिनाभरापूर्वी सुरू होण्याआधीपासून २०१४ च्या ब्राझील वर्ल्ड कपचा मानकरी कोण ठरणार यांची भाकिते वर्तवणारे रकानेच्या रकाने जगभरातील वर्तमानपत्रांतून वाहत होते. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरही फुटबॉलचे पंडित मतप्रदर्शन करीत होते. या सर्वांमध्ये प्रामुख्याने बोलबाला असायचा, तो ब्राझील, पोर्तुगाल, स्पेन, हॉलंड, अर्जेंटिना अशा देशांच्या नावांचा. मात्र, गतकाळातील फुटबॉल सम्राट पेले, दिएगो माराडोना, रोनाल्डो, लिओनेल मेस्सी अशी वलयांकित नावे संघात नसूनही अतुलनीय सांघिक खेळाचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या जर्मनीने फुटबॉल पंडितांची भाकिते खोटी ठरविली. याचबरोबर या विश्वचषक स्पर्धेत विश्व क्रमांक एक स्पेन, पोर्तुगाल व सर्वाधिक पाच वेळा जगज्जेता बनलेल्या ब्राझील या दिग्गज संघाची धूळधाण झालेली पहावयास मिळाली. यापैकी स्पेनला प्राथमिक पातळीवरच गाशा गुंडाळावा लागला. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक गोल नोंदवण्याचा विक्रम रोनाल्डोच्या नावावर होता. त्या विक्रमालाही इतिहासजमा करण्याची किमया जर्मनीच्याच क्लोजने करून दाखविली. यामुळेही ही स्पर्धा जर्मनीसाठी संस्मरणीय ठरली आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधी यजमानपद भूषविणारा ब्राझील जगज्जेता ठरणार असल्याचा बहुतेकांचा अंदाज होता. त्याला तशीच कारणेही होती. गेली ३९ वर्षे ब्राझीलला त्यांच्या देशात कोणी पराभूत केले नव्हते. मात्र, प्रत्यक्षात स्पर्धेच्या निर्णायक अंतिम टप्प्यात मायभूमीवरच अवघ्या पाच दिवसांत दोन दारूण पराभव ब्राझीलच्या वाट्याला आले. एकप्रकारे हा त्यांच्यासाठी दैवदुर्विलासच ठरला आहे. प्रतिभासंपन्न स्ट्रायकर नेमार याची गंभीर दुखापत व थियागो डिसिल्वा याचे निलंबन या दोन गोष्टी ब्राझील संघाचा आत्मविश्वास उद्ध्वस्त होण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या. जर्मनीकडून उपांत्य लढतीत जी ७ – १ अशी धूळधाण उडाली त्याचे ओरखडे ब्राझिलियन खेळाडूंच्या अंगावरून कदापि नष्ट होणार नाहीत. त्यांच्यासाठी ते एक दुःस्वप्नच ठरणार आहे. केवळ एका वर्षापूर्वी ब्राझीलने शैलीदारपणे प्रतिष्ठेचा कॉन्फेडरेशन चषक पटकावला होता. मात्र, या स्पर्धेत त्यांची सुरूवात त्यांच्या लौकीकाला साजेशी नव्हती. पहिल्याच सामन्यात क्रोएशियाविरुद्ध त्यांच्याकडून स्वयंगोल झाला. तो सामना त्यांनी नशिबानेच ३ – १ असा जिंकला. कॅमेरूनसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध त्यांनी ४ – १ असा विजय मिळवला, तरी तेथे त्यांच्या बचावफळीच्या मर्यादा उघड्या पडल्या. चिलीविरुद्धच्या सामन्यातही ब्राझील पेनल्टी शूटआऊटवर विजयी ठरला. निर्णायक टप्प्यात थियागो सिल्वाच्या निलंबनाबरोबरच नेमार दुखापतग्रस्त होऊन संघाबाहेर गेल्यामुळे ब्राझीलचे कंबरडे मोडले. त्यामुळे उपांत्य लढतीत मनोधैर्य खचलेल्या ब्राझीलला जर्मनीच्या खेळाडूंनी अक्षरशः तुडवले. जर्मनीने अंतिम फेरीत पोचेपर्यंत धडाकेबाज खेळ केला, ब्राझीलला नामशेष केले. शांतचित्ताने त्यांनी आपल्या सांघिकतेचे दर्शन घडवताना जगज्जेतेपद हेच आपले लक्ष्य असल्याचे दाखवून दिले. फुटबॉलचा जादुगार मानल्या जाणार्या प्रतिभासंपन्न व लोकप्रिय मेस्सीकडून अर्जेंटिनाला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, जर्मन खेळाडूंनी त्याची व्यवस्थित कोंडी केली. संधी मिळूनही तो यशस्वी होऊ शकला नाही. अखेर जर्मनीच्या रूपात एका अव्वल संघाचीच सरशी झाली आहे. या संघाला मानाचा मुजरा!