– दिलीप बोरकर
येत्या डिसेंबर महिन्यात गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा समारोप होतो की आरंभ होतो याचाच गोंधळ सध्या उडायला लागलेला आहे. गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील प्रत्येक दिवस हा गोमंतकीय जनतेसाठी सुवर्णयोग घेऊन येणारा असेल अशी एक कल्पना माझ्या डोक्यात होती. कारण, साडेचारशे वर्षाचा प्रदीर्घ काळ गोमंतकीय जनतेचा पोर्तुगीजांच्या गुलामगिरीत सरलेला आहे. पोर्तुगीजांच्या जुलुमातून मुक्त होण्यासाठी कित्येक गोमंतकीयांनी किती हालअपेष्टा भोगलेल्या आहेत हे ज्ञात आहे. तो इतिहास कथन करणारे स्वातंत्र्यसैनिक अजूनही हयात आहेत. असे असताना सुवर्णमहोत्सवी वर्षातील कुठलाच उत्साह गोमंतकीय जनतेत दिसत नसल्याने येत्या डिसेंबरात सदर वर्ष समाप्त होते की, आरंभ होणार आहे, असा गोंधळ उडू शकतो.
पोर्तुगीजांची गोव्याच्या भूमीवरील सत्ता अनुभवलेली गोमंतकीय पिढी अजून हयात आहे. पोर्तुगीजांचा जुलूम या पिढीने आपल्या डोळ्यांनी पाहिलेला होता. गोवा मुक्तीच्या काळात जन्मलेली गोमंतकीय पिढी आज भर पन्नाशीत आहे. त्यांनी जरी पोर्तुगीजांचे कारनामे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले नसले तरी, त्यांना ते ऐकून माहिती आहेत. त्या काळी पाच-दहा वर्षांची असलेली मुलें आज पंचावन्न-साठीची आहेत. त्यांनी पाहिलेला मुक्तीलढा अजूनही त्यांच्या स्मरणात असेल. याच पिढीने पन्नाशीतल्या पिढीला घेऊन या सुवर्णमहोत्सवी वर्षात खरं म्हणजे गोव्यात सुवर्णयुग निर्माण करण्यासाठी दर दिवशी काही ना काही कार्यक्रम राबवायला हवा होता. पण कुठल्याच पातळीवर गेले वर्षभर काहीच प्रयत्न झालेला नाही. कला आणि संस्कृती खात्याच्या अनुदानाने होणारे कार्यक्रम जरी सुवर्णमहोत्सवाच्या उल्लेखाने झाले असते, आणि त्या निमित्ताने एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाचे छोटेखानी भाषण जरी ठेवले असते, तरी गोव्याच्या मुक्तीचे महत्त्व एका-दोघांच्या कानी पडले असते. परंतु सुवर्णमहोत्सवी वर्ष गोव्यात चालू आहे की नाही याचीच अजून कुणाला कल्पना नाही.
केंद्र सरकारने म्हणे याच सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने काही कोटी रूपयांचे ‘पॅकेज’ गोवा राज्याला भेट म्हणून दिलेले आहे. गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवाची आठवण चिरंतन रहावी म्हणून गोव्यातील जनतेने काही तरी कार्यक्रम राबवावे हीच त्या मागची भावना आहे. पण ही रक्कम गोव्याच्या तिजोरीत आली आणि खर्च झाली हे सुद्धा कळायला मार्ग नाही. मडगावच्या रवींद्र भवनात झालेल्या सुवर्णमहोत्सवी समारोह कार्यक्रमांतर्गत पणजी शहर महानगरपालिका आणि इतर नगरपालिकांना ‘एकरकमी सुवर्णमहोत्सवी निधी’चे जे वितरण करण्यात आलेले आहे, तीच बहुतेक ही केंद्र सरकारची ‘भेट’ असावी! सुवर्णमहोत्सवी वर्ष संपता संपता नगरपालिकांना सुवर्णनिधी मिळाला हेही नसे थोडके! आता या पालिका पुढचे दोन महिने या निधीचा कसा वापर करतात, हेच पाहावे लागेल.
गोव्याच्या मुक्तीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष हे काही अकस्मात प्रकट झालेले वर्ष नव्हे. ते नजिकच्या काळात येणार आहे याचे भान आमच्या सरकारला होते. ते ‘न भुतो न भविष्यती’ असे धुमधडाक्यात साजरे करण्याची घोषणाही करण्यात आली होती. पण गेले वर्षभर कसल्या ना कसल्या घोटाळ्यातच सरकार गुरफटून गेल्याने सुवर्णमहोत्सवी वर्षाची आठवणही करायला या महाभागांपाशी वेळ नव्हता. मुक्तीचा सुवर्णमहोत्सव साजरा केल्याने त्यांना कुठल्याच प्रकारे फायदा होणार नव्हता. केंद्र सरकारकडून सुवर्णमहोत्सवाच्या नावाने जो कोट्यवधी रूपयांचा निधी आलेला आहे, त्याची वाटणी याच आमदारांमध्ये केली असती तरीसुद्धा त्यांच्याकडून महोत्सवासाठी योगदान लाभले असते की नाही, याचीच शंका आहे. कारण या लोकांना स्वातंत्र्याचे, मुक्तीचे महत्त्वच माहित नाही. ते जाणतात ते फक्त पोटाची खळगी भरणे आणि सत्तेचा दुरूपयोग करून संपत्ती गोळा करणे!
आमच्या लोकप्रतिनिधींकडून सुवर्णमहोत्सवाच्या कार्यक्रमांची अपेक्षा बाळगणे चुकीचेच आहे. कारण हे लोक राष्ट्रप्रेमाच्या संस्कृतीतून वर आलेले नाहीत. आजचे बहुतेक लोकप्रतिनिधी हे ‘रिंगा रिंगा रोझेस’ म्हणत केजी स्कुलातून शिक्षण घेऊन आलेले गोमंतकीय नागरिक आहेत. त्यांच्या एका खिशात भारतीय पासपोर्ट आहे आणि दुसर्या खिशात पोर्तुगीज पासपोर्ट आहे. राष्ट्रप्रेम अंगी बाणवायला देशी संस्कृतीशी या लोकांची नाळ जोडलेली असायला हवी होती. परंतु ज्यांचा मुख्य उद्देश फक्त पोट भरणे हाच आहे, ज्यांचे आयुष्य म्हणजे भोगवादच ठरून गेलेले आहे, येनकेन प्रकारेण् पैसा कमावणे हेच ज्यांचे ध्येय बनलेले आहे, त्यांना राष्ट्रप्रेमाच्या, राष्ट्रवादाच्या गोष्टी सांगणे म्हणजे वेळेचा अपव्ययच आहे. ज्यांना आपली मातृभाषा इंग्रजी वाटते, ज्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यानेच पोट भरता येते असे मनापासून वाटते, त्यांना मुक्ती सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या गोष्टी सांगणे म्हणजे स्वतःचेच हसे करून घेण्यासारखे आहे.
तरीसुद्धा आमच्या सारख्यांनी निराशावाद झटकून टाकून पुढे यायला हवे असे क्षणभर वाटून जाते. गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात शाळा माध्यमाने डोके वर काढले होते. गेली पन्नास वर्षे कोंकणी-मराठीवादामुळे जे लोक एकमेकांची तोंडे पहायला तयार नव्हते, ते इंग्रजी माध्यमाला विरोध करण्यासाठी एकत्र आलेले होते. गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात संपूर्ण गोव्यात हीच सुवर्णसंधी घेऊन वैचारिक मंथन घडवून आणले असते तर, राष्ट्रप्रेमाची ठिणगी हृदयात घेऊन असलेल्या कित्येक तरूणांना सुवर्ण गोमंतक घडविण्याची संधी देता आली असती. राज्य उभारणीसाठी राजकीय शक्तीची आवश्यकता महत्त्वाची असल्याने, आजच्या सर्व भ्रष्ट पक्षांना लाथा घाला आणि गोवा वाचविण्यासाठी समान विचारांनी भारावलेल्यांचा नवा पक्ष किंवा फ्रंट पुढे आणा असे सांगता आले असते. पण दुर्दैवाने ती संधी आम्ही घालवलेली आहे.
कोंकणी-मराठीवाद्यांना एका मंचावर आणण्याचे कार्य शशिकलाताई काकोडकर यांनी केले. त्याचे श्रेय त्यांना मिळायलाच हवे. पण त्याचबरोबर मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या दावणीला बांधला गेला. गोव्यातील जनतेमध्ये वैचारिक सुवर्णमंथन घडवून आणण्याची संधी त्याचमुळे वाया गेलेली आहे.
गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवात प्रत्येक शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाच्या भावनेची ठिणगी पडायला हवी होती. शिक्षण संचालनालयाने प्रत्येक शाळेत कसले ना कसले कार्यक्रम राबवायला हवे होते. आज ज्या गोव्याचे लचके आमचे लोकप्रतिनिधी तोडत आहेत, बेकायदेशीर खाण उत्खनन करून गोवा विद्रुप करीत आहेत, तो गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आमच्या गोमंतकीय पुत्रांनी काय काय हाल अपेष्टा काढलेल्या आहेत, त्याची माहिती या विद्यार्थ्यांना द्यायला हवी होती. पण त्यांना अज्ञानात ठेवण्यातच राजकीय धेंडांचे ‘भले’ सामावलेले आहे.