– म. कृ. पाटील
जानेवारी महिन्यात वेदमूर्ती घनःश्यामशास्त्री जावडेकर सभागृहातील एका बैठकीत पणजी कला अकादमी दर्यासंगमावर संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्यदिव्य ग्रंथसंमेलन आयोजित करण्याचा प्रस्ताव सागर जावडेकर यांनी मांडला आणि प्रस्तावाचे जोरदार स्वागत करत ग्रंथसंमेलन यशस्वी करण्याचा निर्धार उपस्थित सभासद व साहित्यप्रेमींनी केला. त्यानुसार जानेवारी महिन्यातच पणजी पाटो क्लबमध्ये बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत गोवा विधानसभेचे सभापती राजेंद्र आर्लेकर यांची संमेलनाध्यक्ष, तर सागर जावडेकर यांची सचिवपदी निवड करण्यात आली. वेगवेगळ्या समित्या व त्यांचे अध्यक्षही यावेळी निवडण्यात आले. ग्रंथसंमेलनाच्या ध्यासाने साहित्यप्रेमी कामास लागले. ग्रंथसंमेलनाची तारीख २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०१४ अशी निश्चित करण्यात आली. दरम्यान आवश्यक बाबींची पूर्तता करत आढावा घेतला जात होता. पत्रिका वाटप तसेच ग्रंथसंमेलनस्थळी पुस्तकविक्रेते आणि प्रकाशक यांना गाळेवाटप सूत्रबद्ध रीतीने होत गेले.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी सभामंडपाचे भूमिपूजन सभापती राजेंद्र आर्लेकर व पणजीचे नगराध्यक्ष सुरेंद्र फुर्तादो यांच्या हस्ते करण्यात आले. दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता व्यासपीठ, सभामंडप उभारण्याचा पायाभरणी झाला. बुधवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. ‘बिल्वदल साखळी’ संस्थेचा ध्वज दर्यासंगमावर उभारण्यात आला. सभापती व संमेलनाध्यक्ष राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
संत सोहिरोबानाथ ग्रंथसंमेलन
बुधवार, दि. २६ रोजी बिल्वदल साखळीचे कार्यकर्ते, सभासद तसेच मराठी भाषाप्रेमी, साहित्यिक आणि ग्रंथदिंडीत सहभागी झालेली वास्को, मोर्ले, केरी तसेच इतर भागांतील मंडळी आझाद मैदान पणजी येथे दुपारी ३ वा. एकत्र झाली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी श्रीफळ वाढवून दिंडीला हिरवा बावटा दाखविला आणि दिंडीला प्रारंभ झाला. टाळ, मृदंग, पखवाज, चिपळ्यांच्या गजरात, भजन गात आणि मराठीचा जयघोष करत दिंडी पणजी शहरातील नियोजित मार्गावरून दर्यासंगम कला अकादमी येथे पोहोचल्यावर सुवासिनींनी दीपारती ओवाळून तिचे स्वागत केले. हरिनामाचा गजर, भगव्या पताका, संत सोहिरोबानाथांचा चित्ररथ, ब्रह्मकुमार प्रजापतींचा चित्ररथ कासवगतीने येताना पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. संत सोहिरोबानाथ आंबियेंच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्यास सर्वजण कटिबद्ध असल्याची साक्ष पटली.
दर्यासंगमावरील ग्रंथसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला व्यासपीठावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, सभापती राजेंद्र आर्लेकर, सांत आंद्रेचे आमदार विष्णू वाघ, बिल्वदलाचे अध्यक्ष सागर जावडेकर आणि सचिवा सौ. अरुणा बाक्रे उपस्थित होत्या. स्वागतगीतानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. यावेळी मराठी भाषेची निःस्पृह सेवा करताना ज्यांनी स्वखर्चाने नियतकालिके काढली, दिवाळी अंक काढले, अनेक नवोदित कवी-लेखकांना मार्गदर्शन केले, त्या मराठी भाषेच्या संवर्धन व अभिवृद्धीकरिता झटलेल्या पाच व्यक्तींचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि बोधचिन्ह देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांत- अवधूत कुडतरकर, मोहन कुलकर्णी, रमेश कोलवाळकर, शिवानंद कृष्णा रिवणकर, गुरुनाथ नाईक यांचा समावेश होता. याचवेळी ‘कौमुदी’, ‘प्यादी’, ‘आकाशफूल’ या पुस्तकांच्या लेखिका वासंती नाडकर्णी तसेच ‘माणसांची खैर नाही’, ‘मातीचे डोहाळे’ या प्रकाश आणि चित्रा क्षीरसागर यांच्या पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.
उद्घाटनपर भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, ‘‘संत सोहिरोबानाथांचे साहित्य आणि त्यानुषंगाने वाचनसंस्कृती रूजविण्याकरिता गावोगावी त्यांच्या साहित्याचा प्रसार होणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामीण भागांत सुसज्ज आणि समृद्ध वाचनालयांची आवश्यकता आहे, जेणेकरून तेथील जनतेत वाचनसंस्कृती रुजविण्यास, विकसित करण्यास मदत होईल. त्यातून माणूस सुसंस्कृत होईल. वाचनसंस्कृती टिकवायची असेल तर जनजागृती व्हायला हवी. सुसंस्कृतपणा, उत्तम विचार, विवेकबुद्धी अंगी बाणवायची असेल तर पुस्तकाशिवाय पर्याय नाही. नवोदित कवी, लेखक व साहित्यिकांनी भरपूर वाचन करावे. त्यासाठी दर्जेदार व अभिजात पुस्तके विकत घ्यावीत. या ग्रंथसंमेलनाने थोडीफार जनजागृती केलीच आहे, येत्या वर्षात शासकीय पातळीवर संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या साहित्याचा प्रसार करण्यासाठी ग्रंथसंमेलन आयोजित करण्यात येईल.
वाचनसंस्कृती किंवा वाचनाच्या छंदामुळे दुरावलेल्या व्यक्तीही जवळ येतात. माझ्या स्वतःच्या वाचनालयात साडेतीन हजार पुस्तके आहेत. मुंबईच्या बॉंबे बुक डेपोमध्ये मी जातो. तेथील पुस्तके न्याहाळतो आणि विकत घेऊन गोव्यात येतो.’’ मुख्यमंत्र्यांनी आपल्या साहित्यप्रेमाला उजाळा दिला.
आमदार विष्णू वाघ म्हणाले की, ‘‘सचिवालयातील सुसज्ज ग्रंथालयाचा लाभ मंत्रिमहोदयांबरोबरच आमदार, जिल्हापरिषद सदस्य, नगरसेवक व ग्रामपंचायतींमधील पंचांनाही मिळणे आवश्यक आहे. शासनमान्य तथा खाजगी ग्रंथपालांना यथोचित वेतन देण्यात यावे. गावोगावी ग्रंथालये, ग्रंथसंमेलने आणि वाचक-लेखक मेळाव्यांचे आयोजन करताना मराठी ग्रंथांचेच संमेलन आयोजित केले जावे.’’
आपल्या भाषणात प्रा. अनिल सामंत ग्रंथाचे जीवनातील महत्त्व विशद करताना म्हणाले की, ‘‘मानवी जीवनाच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला ग्रंथवाचन पोषक ठरते. मानवी जीवनाचा वैचारिक, मानसिक, नैतिक आणि राजकीय पाया ग्रंथवाचनाने भरभक्कम होतो. मधमाशीप्रमाणे अनेक ग्रंथांतून ज्ञानाचे कण गोळा करत ज्ञानोपासना करता येते. ग्रंथ हेच आपले सोबती, सखा, वावदूक आणि मार्गदर्शक आहेत.’’
संमेलनाध्यक्ष राजेंद्र आर्लेकर म्हणाले की, ‘‘गोमंतकात प्रकाशक कमी असले तरी ग्रंथप्रेमी पुष्कळ आहेत. कवी, लेखक, वाचक आणि प्रकाशकांना एकत्र आणणे हा संत सोहिरोबानाथ आंबिये ग्रंथसंमेलनाचा मुख्य उद्देश होता. या ग्रंथसंमेलनाद्वारे आमचा हेतू साध्य झाला असे वाटते. लेखकांना प्रथितयश प्रकाशक भेटत नाहीत. पदरमोड करून ते आपले साहित्य प्रकाशित करतात. गोमंतकातही अभिजात आणि दर्जेदार, कसदार साहित्यनिर्मिती होत आहे. शेजारील राज्यांतील नामवंत प्रकाशक, त्यांची ग्रंथसंपदा व गोमंतकीय साहित्यसंपदा एकत्रित आणण्याचे कार्य या संमेलनाने शक्य झाले. संत सोहिरोबानाथांच्या ‘अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे’ या अभंग चरणाप्रमाणे अंतःकरणातील साहित्याचा दिवा सतत प्रज्वलित ठेवून समाजप्रबोधनाचे कार्य अविरत प्रवाहित राहील.’’
रात्री ८ वाजता निमंत्रित कवींचा काव्यवाचनाचा कार्यक्रम डॉ. महेश केळुसकर आणि आमदार व साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांच्या अध्यक्षतेखाली रंगतदार झाला. या संमेलनात २७ कवींनी भाग घेऊन आपल्या कविता सादर केल्या.
गुरुवार, दि. २७ रोजी ‘महाशिवरात्र’, ‘मराठी भाषादिन’ आणि विद्यार्थ्यांकरिता ‘पुस्तकांचा पाऊस’ अशा त्रिवेणी संगमातून कपिला षष्टीचा योग जुळून आला. विद्यार्थ्यांकरिता ‘मला आवडलेले पुस्तक’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात पुस्तकातील भाषा, लेखकाची लेखन-निवेदन शैली, आशय, मांडणी, सर्वसाधारण प्रभाव व वर्तन-परिवर्तन हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थी आणि पालकांकरिता विशेष कार्यक्रम म्हणजे राजीव तांबे यांनी दिलखुलासपणे, हसतखेळत, विद्यार्थी आणि पालकांशी केलेला वार्तालाप. मनातील अनामिक भीतीचा बागुलबुवा उभा न करता, आत्मविश्वासाने व सकारात्मक विचाराने कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते. लहानपणापासून मुलांवर नकारात्मक विचार बिंबवले जातात. तसे न करता मुलांना प्रत्येक कार्य, अभ्यास, खेळ, परीक्षा आदींकडे सकारात्मक नजरेने पाहायला आणि त्यानुषंगाने जगायला शिकवले पाहिजे. तद्नंतर सौ. कविता अशोक बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘भुईचाफा’ कविसंमेलन पार पडले. या संमेलनात अनेक कवींनी आपल्या आशयघन कविता सादर करून वाहवा मिळवली. प्रथितयश आणि नवोदितांनाही यातून प्रोत्साहन मिळाले. नवीन कविता रचण्याची नवी ऊर्जा, उमेद मिळाली.
भोजनोत्तर सत्रात ‘साहित्य ग्रंथ चळवळ’ या विषयावर डॉ. यशवंत पाटणे यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले की, ‘‘मानवी जीवनात साहित्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘ग्रंथ हेच गुरू’ या तीन शब्दांतील ‘हेच’ या द्वाक्षरी शव्दाला जास्त महत्त्व आहे. शालेय जीवनापासून पुस्तकाचा आपल्याला सहवास लाभतो. तेव्हापासून अंतिम श्वासापर्यंत ग्रंथ हे मित्र, सखा, सोबती, वावदूक, मार्गदर्शक अशा विविध नात्यांच्या विणीतून आपल्याला भेटत असतात. ग्रंथांच्या नातेसंबंधाची सुरेख गुंफण आपल्या आयुष्यात झालेली असते. मनातील विवेकदीप तेवता ठेवण्यासाठी वाचन केले पाहिजे. ग्रंंथातून आपल्या महान सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडते. ग्रंथ हे संस्कृतीचे रक्षक आणि संवर्धक आहेत. संत सोहिरोबानाथांच्या देवत्वावर जनतेने विश्वास ठेवला म्हणूनच ते देव झाले. संस्कृतीचे रक्षण व संवर्धन करण्याची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. ग्रंथ जीवनाला व्यापकता देऊन प्रसन्नता प्रदान करतात. ग्रंथसाहित्य व ग्रंथालय हे ज्ञानविस्तार आणि प्रसाराचे प्रभावी माध्यम आहे. शहर, खेडेगावचा सुसंस्कृतपणा हा त्या परिसरात उपलब्ध असलेल्या ग्रंथालये आणि ग्रंथसंपदेवर ठरतो. ग्रंथालये वाचनसंस्कृती रुजविणारी आणि अभिवृद्धीची प्रतीके असतात. माणूस, कुटुंब, समाज आणि देशाची जडणघडण वाचनसंस्कृतीतून घडते. समाजात चेतावृत्ती जागृत करून चैतन्य येण्यासाठी मने घुसळावी लागतात. प्रतिभावंत, साहित्यिक आणि कलावंतांची विचारधारा प्रवाही राहण्यासाठी जिवंत साहित्याची गरज असते. जिवंत साहित्य संस्कृतीचे संवर्धन करत शाश्वत आनंद देत असते. ग्रंथ मनाला वैचारिक खुराकाचा रतिब घालत आपल्याला बहुआयामी व्यापकता प्रदान करत असतात. घराला घरपण देण्यासाठी, शहाणपण येण्यासाठी, संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी, समाजप्रबोधनातून परिवर्तन घडविण्यासाठी साहित्य चळवळींची एकविसाव्या शतकातही नितांत गरज आहे.’’
पाचव्या सत्रात ‘जीवनामध्ये संतांचे महत्त्व’ या विषयावर बोलताना प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी समग्र संतसाहित्याचा धावता आढवा घेतला. ‘‘समाज हा एक रथ आहे. संतांनी या समाजरथाचे सारथ्य करून समाजप्रबोधन केले. ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम, नामदेव, एकनाथ, संत जनाबाई, मुक्ताई, बहिणाबाई चौधरी यांचे वाङ्मय म्हणजे मानवी जीवनाचे महत्त्व विशद करत अखंड तेवत राहणारी यज्ञकुंडेच. भारतीयांचे पंचप्राण जगविण्याचे, चेतविण्याचे कार्य संतांनी आणि त्यांच्या अभंगांनी केले. ‘अभंग’ म्हणजे कधीही न तुटणारे, कालातील वाङ्मय. ‘अक्षर’ म्हणजे ज्याचा कधी क्षय अथवा लोप, नाश होत नाही. असे चिरजीवित्व प्राप्त झालेले अक्षर वाङ्मय म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे, ज्ञानज्योतीने वैश्विक प्रकाशाकडे नेणारी दिनदर्शिकाच आहे. संत साहित्याची वाचन-पारायणे व्हायला हवीत. सध्या समाजाची भावना, संवेदनशीलता, सहृदयता बोथट झाली आहे. त्यांना धार करण्याचे महत्कार्य संत वाङ्मय करू शकते.’’
रात्री ‘भूपाळी ते भैरवी’ या कार्यक्रमात ग्रामीण भागातील लोकपरंपरा जी लोप होण्याच्या मार्गावर आहे, ती संगीतिकाच्या स्वरूपात गायन, वादन आणि नाट्यरूपात सादर करून सपंत आणि कदम मंडळीनी रसिकांची मने जिंकली.
शुक्रवार दि. २८ रोजी पहिल्या सत्रात ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात संयोजक अरविंद सायनेकर यांनी लेखक-कवींचा विद्यार्थ्यांशी वार्तालाप करून दोहोंमध्ये सुसंवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मनात उद्भवलेल्या शंकांचे निरसन उपस्थित लेखकांनी केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देत असता विद्यार्थ्यांच्या मुखकमलावर समाधानाची स्मितरेषा उमटलेली दिसली.
दुसर्या सत्रात ख्यातनाम लेखक तथा प्रभावी वक्ते राजीव तांबे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ‘‘सकारात्मक विचार मनात सतत बाळगा. नकारात्मक विचाराने तनमनाची शक्ती विनाकारण खर्च होते. बरेच विद्यार्थी अभ्यास, परीक्षा, प्रयोग, प्रात्यक्षिक, खेळाकडे नकारात्मक विचाराने पाहत नन्नाचा पाढा वाचतात. आपण मनाने एक गोष्ट ठरवतो तीच करतो. पण विचार बदलला की कृती बदलते आणि अपयश पदरी येते. चुकांमुळे सुधारण्याची अमूल्य संधी मिळते. स्वतःला बदलण्यासाठी अनुभव गरजेचा असतो. दृढ निश्चय आणि आत्मविश्वासामुळे कोणतेही अवघड काम सोपे वाटू लागते. कारण मनाची तयारी झालेली असते. आत्मविश्वासाच्या अभावामुळेच अंगाचा थरकाप होतो आणि अनामिक भीतीचे भूत मानगुटीवर बसते. ही आपल्या मनातल्या विचारांची फलश्रुतीच असते. सकारात्मक विचाराने तनमनाची शक्ती, ऊर्मी, ऊर्जा, जोम वृद्धिंगत होत जातो. कार्य करण्यात आवड, रूची वाढते. त्यामुळे मन आनंदतरंगावर डोलू लागते.’’
रात्री ८ वाजता ‘हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा’ हा कार्यक्रम हास्यसम्राट प्रा. निरंजन खिचडी यांनी अत्यंत रंगतदार बनवला. शालेय जीवनात ‘रडू नको रे चिमण्या बाळा, हसण्यासाठी जन्म आपुला’ ही कविता वाचली होती. यानिमित्ताने तिची आठवण झाली. प्राध्यापक निरंजन खिचडी म्हणजे एक अजब रसायन आहे. प्रत्येक वाक्यागणिक हसविणे यात त्यांचा हातखंडा. तसेच स्त्री-पुरुष संबंध, घरातील वातावरण, समाजातील लोकांच्या भावभावनांच्या सूक्ष्मातील सूक्ष्म अशा लकबी, सवयी याविषयी त्यांचे निरीक्षण जबरदस्त आहे. पुरुष आणि स्त्री मनाचे विविध पैलू, कंगोरे सांगत त्यांनी रसिक श्रोत्यांकडून हवी ती उत्तरे वदवून घेतली. ताणतणाव, चिंता, काळजी, राग, डिप्रेशन घालवायचे असेल तर चतुःसूत्रीचा वापर करण्यास त्यांनी सांगितले. कारण चिंता, ताणतणाव हे मानवी देहाचे कलेवरात परिवर्तन करतात; आणि चिंता कलेवराला ताब्यात घेऊन स्वाहा करते. यावर एकच उपाय म्हणजे नकारात्मक विचारांचा त्याग आणि सकारात्मक विचारांचा स्वीकार. डोक्यावर बर्फ, तोंडात साखर, हृदयात माया आणि हातात काम हे कसे घडते ते त्यांनी सोदाहरण पटवून दिले. मालकाने नोकराला एक काम सांगितले. ते त्याने पूर्ण केले नाही तर मालक मोठमोठ्याने खेकसतात, ओरडतात, अपशब्द वापरतात. त्यावेळी नोकर निर्विकार चेहर्याने मुखस्तंभासारखा उभा असतो. त्याच्यावर कोणताही आणि कसलाच परिणाम होत नाही. याउलट मालकाचे अंग थरथरते, घसा कोरडा पडतो, रक्ताभिसरण जलदगतीने कार्य करते, हृदयाची धडधड वाढते. तनमनाची ऊर्जा, शक्ती नाहक खर्च झाल्यामुळे मालकच विकलांग होतो. म्हणूनच डोक्यावर बर्फ ठेवून शांत चित्ताने कार्याचा सारासार विचार केल्यास ताणतणाव, चिंता, काळजी दूर होते. कार्यरत, कार्यमग्न राहिल्यामुळे कार्यपूर्तीच्या ध्यासाने चिंता दूर पळून जाते. शरीरातील ग्रंथी आणि पेशींची वाढ होत शरीराची कांती सतेज बनते. तक्रार करणार नाही, रागावणार नाही, नावे ठेवणार नाही असे मनाला समजावले तर घरीदारी, कार्यालयात, समाजात शांत, सुखी, समाधानी जीवन व्यतीत करता येते. याकरिता पुन्हा पुन्हा चतुःसूत्रीचा वापर करायला हवा. सतत दोन तास व्याख्यान देत त्यांनी लोकांना हसवत सुखाचा मूलमंत्र त्यांच्या गळी उतविला.
दि. १ मार्च रोजी ‘अनाथाची माता’ या कार्यक्रमात प्रख्यात समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांची प्रगट मुलाखत सौ. संगीता अभ्यंकर आणि सिद्धी उपाध्ये यांनी घेतली. सिंधुताईंनी आपला जीवनपट उलगडून सांगितला.