Home बातम्या नाटक : प्रयोग आणि साहित्यमूल्ये

नाटक : प्रयोग आणि साहित्यमूल्ये

0

नाट्ययज्ञात साहित्यमूल्ये या समिधा तर प्रयोगमूल्ये हे घृत!

– विष्णू सूर्या वाघ 

नाटकाचा प्रयोग हा गोष्ट सांगण्याच्या कलेचाच भाग आहे. गोष्ट सांगण्याची कला ही अनादिकालापासून क्रमशः विकसित होत आलेली कला आहे. ‘नाट्यप्रयोग’ हा त्या विकासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा. कीर्तन, पुराण, प्रवचन या निरुपणप्रकारात वक्ता काहीतरी गोष्ट श्रोत्यांना ऐकवीत असतो. त्यांची परिणामकारकता वाढवण्यासाठी स्पष्ट वाणीचा, सुप्रयुक्त शब्दांचा, लवचीक आवाजाच्या चढ-उताराचा, हातपाय इत्यादी अवयवांच्या विक्षेपाचा, डोळे व चेहरा यांच्याद्वारा होणार्‍या भावनिदर्शनाचा उचित आणि प्रमाणशीर असा उपयोग करीत असतो. प्रवचनकार व पुराणिक बहुशः एकाच जागी बसून बोलतात. कीर्तनकार थोडाफार हालचालींचा फायदा घेऊ शकतो. या तिन्ही प्रकारांत सांगायच्या गोष्टीत पात्रे कितीही असली तरी त्यांचं प्रकटीकरण एकच व्यक्ती करीत असते, तर नाटकाच्या प्रयोगात सर्वच पात्रे साक्षात स्वरूपात प्रेक्षकांसमोर असतात. नाटकाच्या प्रयोगात ती स्वतः बोलतात, स्वतः कृती करतात. असे महत्त्वाचे फरक असल्यामुळे कीर्तन/निरुपण/प्रवचन यांच्याहून नाटकाच्या प्रयोगाचे स्वरूप अनेक दृष्टींनी गुंतागुंतीचे होते. हरिदास/पुराणिक/प्रवचनकार कथानकातील घटना केवळ शब्दांनी उभ्या करतात. नाटकात चित्र व स्थापत्त्य यांचा उपयोग करून ती निर्देशित केली जातात. पात्रयोजना, त्या पात्रांचे पोषाख व इतर सजावट (संगीत, प्रकाश इ.) यामुळे नाटकांतील तपशील अधिक उठावदार व स्वीकारार्ह होतो. कथानकाच्या आविष्करणात वास्तवतेचा आभास उत्पन्न करणे आणि तो सतत सारखा टिकवून ठेवणे हे पात्रयोजना, पार्श्‍वभूमिचित्रण व नेपथ्यरचना आणि वातावरणविचार यांवर अवलंबून असते. प्रयोगाच्या यशाला कारणीभूत होणार्‍या या मूलभूत गोष्टी आहेत.

पुस्तक आणि प्रयोग

‘नाटक’ हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यांपुढे नाटकाचे पुस्तक आणि नाटकाचा प्रयोग या दोन्ही गोष्टी उभ्या राहतात. पण पुस्तक वाचण्यासाठी असते, प्रयोग पाहण्यासाठी असतो. पुस्तक वाचताना वाचक एकटा असतो, स्वयंकेंद्रित असतो, अंतर्मुख असतो. याउलट प्रयोग पाहताना प्रेक्षक बहिर्मुख असतो. समूहाचा घटक असतो. यामुळे ‘नाट्यप्रयोग’ आणि ‘साहित्य’ यांचा परस्परसंबंध समजून घेणे फार गुंतागुंतीचे बनते. लेखकाचा आशय व रंगकर्मीचे आविष्करण, रंगभूमीवरील आविष्कार आणि प्रेक्षकांची ग्रहणशक्ती व अभिरूची, तसेच साहित्यमूल्ये व रंगमूल्ये यांमधील गुणपरिणामात्मक भेद इत्यादी अनेक संघर्षाचा आढावा घेत घेत नाटकाची प्रयोगानुकूलता व साहित्यमूल्य यांची सांगड घालणे शक्य आहे.
साहित्यमूल्ये आणि रंगमूल्ये यांचा विचार करताना पुन्हा एकदा आपण पुस्तक आणि प्रयोग यांच्यामधील अंतर अधोरेखित करूया. नाटक वाचणारा एकटा असतो. प्रयोग पाहणारा समूहात बसलेला असतो. वाचक एकटा असल्यामुळं त्यानं वाचलेल्या नाटकातील कल्पना, विचार व भावना यांचा त्याच्या मनावर होणारा परिणाम फक्त त्याच्याच आकलनानुसार त्याच्या एकट्यावरच होत असतो. प्रयोग पाहणारा प्रेक्षक हा अनेक लोकांत बसलेला असल्यामुळे प्रयोगाचा परिणाम त्याच्या बुद्धीवर व भावनेवर तर होतोच, पण त्याशिवाय आजूबाजूच्या प्रेक्षकांच्या मनावर झालेल्या परिणामावरील प्रतिक्रियांचीही त्याच्या स्वतःवरील परिणामात भर पडते. हे घडताना त्याच्या व इतरांच्या परिणामात्मक प्रतिक्रिया वेगवेगळ्या असू शकतील. इतरांना जे आवडेल ते त्याला आवडेलच असे नाही. म्हणजे, नाटकाचे पुस्तक वाचत असताना त्याची रसग्राहकता स्वतंत्र होती. व्यक्तिनिष्ठ होती. प्रयोग पाहत असताना ती निर्बद्ध झाली, समष्टीनिष्ठ झाली. एकटा पुस्तक वाचत असताना त्याच्या मानसिक परिणामांच्या प्रतिक्रिया केवळ आत्मसापेक्ष होत्या. प्रयोग पाहत असताना त्या संघसापेक्ष झाल्या. एकटेपणात त्याची अभिरूची अमर्याद होती, अनियंत्रित होती. प्रयोग पाहताना आजूबाजूच्या इतर प्रेक्षकांमुळे ती नियंत्रित व मर्यादित झाली. साथीदाराला आपलं वाद्य गाणार्‍याच्या स्वरांशी जुळवून घ्यावं लागतं त्याप्रमाणं त्याला आपलं शरीर व मन यांचे व्यापार समूहातील इतर शरीरांच्या व मनांच्या व्यापारांशी जुळवून घेणं भाग पडलं. वाचक या नात्यानं त्याचं अस्तित्व व्यष्टीरूप होतं. प्रेक्षक म्हणून ते समष्टीरूप झालं. स्वाभाविकच या फरकांचा परिणाम मूल्यांतरांत होणं अपरिहार्य आहे.

वाचक आणि प्रेक्षक

वाचक नाटक वाचतो तेव्हा त्यातील छापलेले शब्द तो आपल्या चर्मचक्षूंनी वाचतो. पण त्याचबरोबर आपली बुद्धी, कल्पना व अनुभव यांच्या मदतीनं कथावस्तूचं मूर्तस्वरूपही तो अनुभवत असतो. विषयाचा आविष्कार तो मनाच्या डोळ्यांनी पाहतो, मनाच्या कानांनी ऐकतो, अनुभवाच्या आठवणींशी त्यांचं संयोजन करतो, सारासार विचाराच्या निकषावर घासून त्याचं मूल्यमापन करतो व त्यामधील अनुकूल-प्रतिकूल संवेदनांनुसार आनंद-विषादात्मक प्रतिक्रिया व्यक्त करतो. अर्थात ही प्रतिक्रिया मानसिक असते, अपार्थिव असते. स्थलकालनिरपेक्ष, सूक्ष्म व व्यक्तिनिष्ठ असते. त्याचा अनुभव त्याच्यापुरता मूर्तस्वरूपातील असला तरी वस्तुतः तो अमूर्तच असतो. साहित्याचा रसास्वाद हा अशा रीतीनं व्यक्तिनिष्ठ अनुभूती असल्यामुळं साहित्यिक मूल्यं ही ऐंद्रीय संवेदनेपेक्षा मानसिक संज्ञेवर, भावनेपेक्षा बुद्धीवर, स्थूल व पार्थिव परिणामक्षमतेपेक्षा सूक्ष्म, मानसिक परिणामक्षमतेवर अधिक अवलंबून असतात.
नाट्यप्रयोगासारख्या समाजनिष्ठ व पार्थिव कलेची मूल्ये या पातळीवर राहू शकत नाहीत. प्रयोग पाहणार्‍या प्रेक्षकांचे अनुभव साक्षात व इंद्रियगम्य असतात. तो आपल्या चर्मचक्षूंनी प्रयोग पाहतो. शारीरिक कानांनी भाषण ऐकतो. नाटक वाचत असताना वाचक कथावस्तूचं जे मूर्तीकरण करतो ते त्याच्या व्यक्तिगत पातळीवरचं असतं. प्रयोग पाहताना प्रेक्षक जे ऐकतो व पाहतो ते त्या कथावस्तूचे मूर्तीकरण प्रयोगकाराच्या कल्पनेप्रमाणं अस्तित्वात आलेलं असतं. आपल्या अनुभवांशी त्यांचं संयोजन करणं एवढीच मानसिक प्रक्रिया प्रयोग पाहणार्‍या प्रेक्षकांकडून होऊ शकते. संवेदनात्मक अनुकूलता आणि अनुभवविषयक सुसंगतता यांच्या निकषांवर ते मूर्तस्वरूप कसाला लावून, पाहत असलेल्या प्रयोगाचे प्रेक्षक मूल्यमापन करीत असतो. स्वाभाविकच त्याच्या त्या मूल्यांचं स्वरूप पार्थिव, समाजनिष्ठ, स्थूल, स्थलकालपरिस्थितीनं मर्यादित, संज्ञेपेक्षा संवेदनेवर अधिक भर असलेलं, असं असतं.

दोन्ही मूल्यांची गल्लत

वाचक व प्रेक्षक, साहित्यिक मूल्ये व प्रायोगिक मूल्ये यांमधील हे मूलभूत फरक संक्षेपाने लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यातली तफावत समजून घेतली नाही तर एक ‘साहित्यप्रकार’ म्हणून नाटकाबद्दलचे आपले आकलनच थिटे पडण्याचा संभव असतो.
अनेकदा होतं काय, की काही नाटकं ‘साहित्य’ म्हणून फार वरच्या दर्जाची असतात, पण त्यांची प्रयोगक्षमता ठिसूळ असते. याउलट काही नाटकं कमालीची प्रयोगक्षम पण वाङ्‌मयीनदृष्ट्या अत्यंत हीणकस दर्जाची असतात. अशा नाटकांना काहीवेळा प्रचंड लोकप्रियताही लाभते व चांगल्या नाटकांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली दिसून येते. अनेकजण याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करतात. चांगले नाटक पडले की त्याचे खापर प्रेक्षकांच्या डोक्यावर फोडण्यात येते. प्रेक्षकांचीच अभिरूची हल्ली बिघडली आहे. अरबर चरबर फार्स पाहायलाच हल्ली लोक येतात. मध्यमवर्गाने नाटकाकडे पाठ फिरवल्यामुळे आणि अल्पमतीच बहुजन प्रेक्षक थिएटरात घुसत असल्यामुळे रंगभूमीचा साहित्यिक दर्जा घसरू लागला आहे, अशी विधाने कानावर पडतात.
प्रत्यक्षात साहित्यमूल्ये व रंगमूल्ये यांची गल्लत न करणे हेच प्रयोग व साहित्य यांच्यातील अनुबंध अधोरेखित करण्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. साहित्यमूल्ये व रंगमूल्ये ही भिन्न आहेत. त्यांचं साहचर्य असू शकतं, पण ती एकरूप नाहीत. त्यांच्यात समीपता असेल पण सरूपता नाही. आणि एकाच्या अभावी दुसर्‍याचं अस्तित्व असूच शकत नाही असंही नाही. साहित्यिक प्रकार म्हणून नाटकाचा विचार केला जातो त्यावेळी तो साहित्यिक मूल्यांच्या अपेक्षेनं करावा. प्रयोगाच्या दृष्टीनं नाटकाचा विचार केला जातो तेव्हा त्यातील रंगमूल्ये हेच प्रयोगक्षमतेचे निर्णायक गमक असले पाहिजे.

रंगभूमीवर संकेतांचा वापर

नाट्यप्रयोग हे पार्थिव माध्यम आहे तर नाट्यसाहित्य हे अपार्थिव आहे. पहिल्याची परिणामकारकता स्थूल आहे तर दुसर्‍याची सूक्ष्म. या दोन्हीतले अंतर भरून काढण्याचा प्रयत्न संकेतांची निर्मिती करून होत असतो. संकेतांवाचून कुठल्याही दृश्य कलेला व्यापकता येऊ शकत नाही. प्रत्येक कलेचा तो पाया आहे. किंबहुना सर्व मानवी व्यवहाराचा तो पाया आहे. भाषेतील शब्दांचे अर्थ हेसुद्धा संकेतमूलकच आहेत. हे मान्य केलं नाही तर भाषेला संवाहनाचं, प्रकटनाचं सामर्थ्यच उरणार नाही. सौंदर्यात्मक, सूचक, प्रमाणबद्ध, आटोपशीर आणि परिणामकारक प्रकटन हे कलात्मक आविष्काराचं साध्य आहे, असं म्हणता येईल. कुठलीही कला शेवटी काय करीत असते? कला करीत असते अमूर्ताला पार्थिव साधनांनी इंद्रियांच्या द्वारा मूर्त आणि ग्राह्य करण्याचा प्रयत्न. परंतु ही साधनं पार्थिव असल्यामुळं आणि त्यांच्यातून साध्य होणारी इंद्रियांची संवेदनक्षमता फार स्थूल असल्यामुळं मनोग्राह्य, संज्ञात्मक संकेतांची त्यांना जोड दिल्याशिवाय त्यांना सूक्ष्मता व सूचकता प्राप्त होत नाही.
संकेतांचं अस्तित्व आणि त्यांची परिणामकारकता कलावंत आणि रसिक यांच्या परस्पर समजुतीवर अवलंबून असतात. याबाबत त्या दोघांमध्ये मतैक्य नसेल तर संकेतांना काहीच अर्थ उरू शकणार नाही. हे संकेत कलावंत व प्रेक्षक यांची सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक पातळी, भौतिक ज्ञान व सौंदर्यात्मक अभिरूची यावर अवलंबून राहतात. त्यांच्या विकासानुसार संकेतांचा उद्गम, विकास किंवा निरास होत राहतो. संकेतांची अशी कितीतरी अवस्थांतरे मराठी रंगभूमीवर होत आलेली आहेत. उदा. गुंडाळणारे पडदे हा एकेकाळी रंगकर्मी व प्रेक्षक दोघांनाही मान्य असलेला संकेत होता. आज तो कालबाह्य झाला आहे. फार कशाला, तीन भिंतींचा फ्लॅटसीन ही कल्पनाही कालबाह्य बनली असून रंगमंचावरील मुक्ताकाशाचा अमूर्त वापरही आजचा चोखंदळ प्रेक्षक स्वीकारू लागला आहे. वास्तविक हे सगळं अनैसर्गिकच आहे, पण कलेच्या क्षेत्रात काटेकोर वास्तविकता असाध्य असते याची जाणीव प्रयोजक व प्रेक्षक दोघांनाही असते म्हणून उभयपक्षी मान्य असे संकेत तयार होऊ शकतात. प्रकटनक्षमता, सूचकता व परिणामकारकता वाढवणे, पसारा कमी करणे हा त्यांचा हेतू असतो. संकेतांच्या या स्थित्यंतरांमुळे रंगभूमीचे स्वरूप उत्तरोत्तर बदलत गेलेले आपल्याला पाहायला मिळेल. याचा परिणाम साहित्यमूल्ये व रंगमूल्ये या दोन्हींवर झालेला दिसतो. प्रयोगविज्ञान आणि साहित्यशास्त्र यांच्यातील अनुबंधामागे कलात्मक आविष्कारासाठी अनिवार्य असलेल्या संकेतचिन्हांचे योगदान मोठे आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही.
नाटकाचा प्रयोग आणि साहित्यमूल्य यांच्यादरम्यानचा अनुबंध आपण आतापर्यंत अवलोकून पाहिला. भरतमुनींनी नाट्यशास्त्रामध्ये या नाना प्रकारच्या रसदर्शनाचं वर्णन ‘नाना रसम् दृश्यते’ या एका वाक्यात केलं आहे. भरतमुनी ‘देवनाम्… क्रतुं चाक्षुशं…’ असं म्हणतात. याचा अर्थ- हा साधा यज्ञ नव्हे. क्रतुं म्हणजे काय, तर सोमरसाचं हवन करणे. असा विशेष प्रकारचा हा यज्ञ आहे आणि तो सोमपानातून निघणार्‍या धुंदीइतकाच आहे. एका लोकविलक्षण धुंदीत करायचा हा नाट्ययज्ञ आहे. गदिमांच्या भाषेत सांगायचं तर प्रेक्षकांच्या डोळ्यांतून हळूच या हृदयात पाय ठेवा असा हा समर्पणविधी आहे. जनमनापासून उठणार्‍या यज्ञदेवतेनं ‘वरं ब्रूही’ असं म्हणेपर्यंत सार्‍या जीविताची आहुती द्यावी लागते, असलं हे यज्ञकर्म आहे. आणि या यज्ञकर्मात पडद्यामागे असलेले महाभागांच्या बरोबरीनेच सहभागी झालेले असतात पडद्यापुढचे प्रेक्षक. रंगभूमीवर चालणारा सगळा खेळ आहे, आभास आहे हे ठाऊक असतानाही ते या खेळाचा एक भाग बनतात. घटकेपूर्वी फाटके कपडे घालून फिरणार्‍या व्यक्तीला रंगभूमीवर भरजरी कपडे घालून राजाच्या भूमिकेत स्वीकारतात. अशी ही कसल्याशा दिव्य मंत्रानं भारलेली यज्ञभूमी आहे. सारांश, नाटक हा एक यज्ञ असेल तर साहित्यमूल्ये या त्यातल्या समिधा आहेत आणि प्रयोगमूल्य हे या समिधांना पेटण्यासाठी पुरवलं जाणारं घृत आहे, असा या दोन्हीमधला हा अन्योन्य संबंध! 
(क्रमशः)