गोव्यातील टॅक्सीवाल्यांनी सोमवारी विनाकारण संप पुकारून महामार्ग अडवून हिंसा केल्याचे ते म्हणाले. तसेच अशा प्रकारची हिंसा सहन केली जाणार नसल्याचे सांगताना कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही पर्रीकर यांनी दिला. टॅक्सीवाल्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सरकार आठवडाभरात सोडवणार असून बुधवारी सकाळी ९ वाजता त्यांना चर्चेसाठी आपण बोलावले असल्याची माहिती त्यांनी दिली.
जनसामान्यांत टॅक्सीवाल्यांची प्रतिमा चांगली नसल्याचे सांगताना सोमवारी त्यानी केलेल्या हिंसेमुळे ती प्रतिमा आणखी खराब झाल्याचे ते म्हणाले. टॅक्सीवाले मिळेल तसे भाडे आकारून ग्राहकांची फसवणूक करीत असल्याच्या तक्रारी असून या पार्श्वभूमीवर त्यांना ठराविक ठिकाणी भाडे घेऊन जाण्यासाठी ठराविक रक्कम (पॉईंट टू पॉईंट फेअर) ठरवून देण्यात येणार असल्याचेही पर्रीकर यांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या लाठी हल्ल्यात जखमी झालेल्या एका टॅक्सीवाल्याचे निधन झाल्याचे वृत्त आहे असे मुख्यमंत्र्यांच्या नजरेत आणून दिले असता ती एक अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नका, असे पर्रीकर म्हणाले.
विष्णूंची कार्यपद्धत मान्य नव्हती
आमदार विष्णू वाघ यांच्याकडून गोवा कला अकादमीचे अध्यक्षपद व गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्षपद का काढून घेतले असे पत्रकारांनी विचारले असता विष्णू वाघ यांची कार्यपद्धत आपणाला मान्य नव्हती म्हणूनच त्यांच्याकडील दोन्ही पदे काढून घेतली. कुणाला कुठली पदे द्यावीत व कुणाकडून कुठली पदे काढून घ्यावीत हा आपला अधिकार असल्याचे ते म्हणाले.